माझ्या एकेकाळच्या सहकारी आणि गेली काही काळ कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक म्हणून कार्यभार सांभाळीत असलेल्या सौ अर्चना शंभरकर (पूर्वाश्रमीच्या गाडेकर) यांचे काल सायंकाळी कॅन्सरने वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. आज नवी मुंबईतील खारघर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्चना मॅडम यांच्या आकस्मिक निधनाने खूप वाईट वाटले. अतिशय सस्मित, मितभाषी, कार्यतत्पर, लेखिका असलेल्या अर्चना मॅडम या प्रखर मातृभक्त होत्या. त्यांनी आणि त्यांच्या भावाबहिणींनी मिळून आईची स्मृती कायम राहण्यासाठी “विमल दिवस” हा उपक्रम सुरू केला होता. त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो.
अर्चना मॅडम यांना दिड दोन वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यावेळी मी त्यांना माझ्या पत्नीने कॅन्सर वर कशी मात केली, हे सांगून “कॉमा” हे पुस्तक पाठविले होते. त्यांचाही दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असल्याने त्या कॅन्सर वर नक्कीच मात करतील, अशी मला खात्री वाटत होती. दोन महिन्यांपूर्वीच आमची भेट ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी मिळून ठाण्यात आयोजित केलेल्या “पत्रकारांची पाठशाळा” या कार्यशाळेत झाली होती. त्याचवेळी त्यांच्या कडे पाहून मनात चर्र झाले होते. परंतु, अतिशय धैर्याने त्या काम करीत होत्या. न्यूज स्टोरी टुडे पोर्टल साठी त्या नियमित लेखन करीत असत. त्यानिमित्ताने आमचा संवाद होत असे. पण आता हा संवाद पुढे कधीच होणार नाही.
गेल्यावर्षी, डिसेंबर महिन्यात आमचे सहकारी डॉ संभाजी खराट हे साठीच्या दरम्यान कॅन्सरनेच गेले. दोनतीन महिन्यांपूर्वी दुसरे एक सहकारी संजय देशमुख हे हृदय विकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यू पावले आणि आता अर्चना मॅडम गेल्या.
नोकरीच्या निमित्ताने का होईना, एकत्र आलेल्या सर्वांशी च आपली नाळ जुळते असे नाही. पण हे तिघेही जण संवेदनशील मनाचे, लेखक असल्याने टिपिकल सरकारी पठडीतील अधिकारी नव्हते. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने अतीव दुःख होऊन, व्यक्तिगत हानी झाल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने माहिती खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
ईश्वर अर्चना मॅडम यांच्या परिवाराला हे दुःख पचविण्याची शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो ही प्रार्थना.

अल्प परिचय :
अर्चना शंभरकर यांचा जन्म २० डिसेंबर १९७३ रोजी चंद्रपूर येथे झाला होता. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथेच झाले होते. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मधून त्यांनी वृत्तपत्रविद्या आणि संद्न्यापन पदवी प्राप्त केली होती.
अर्चना शंभरकर या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायात वरिष्ठ सहाय्यक संचालक (वर्ग १) म्हणून ३१ ऑगस्ट २००९ रोजी रुजू झाल्या होत्या. नियत वयोमानानुसार त्या ३१ डिसेंबर २०३१ रोजी निवृत्त झाल्या असत्या.

महासंचालनालयाच्या सेवेत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी, काही मंत्र्यांचे संपर्क अधिकारी, वृत्तचित्र शाखेच्या प्रमुख, पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक आदी पदे समर्थपणे भूषविली होती. माहिती खात्याच्या तसेच अन्य साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा केवळ सहभागच नसे, तर त्या पुढाकार घेऊन असे उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असत. त्यामुळे त्या सर्व सामान्य लोकांमध्येही लोकप्रिय होत्या.

अर्चना शंभरकर यांची ‘सोलमेट’ ही कादंबरी तर ‘सारीनास’ हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. या शिवाय विविध विषयांवर त्या नियमितपणे लिहित असत.
विदर्भातील सुप्रसिद्ध कवियित्री दिवंगत विमल गडेकर यांच्या ज्येष्ठ कन्या असलेल्या अर्चना शंभरकर यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व आयआयटीत शिकत असलेला धाकटा मुलगा रिची, वडील भगवान गाडेकर, भाऊ डॉ. हेमंत गाडेकर, भाऊ अभिनेता जयंत गाडेकर, बहिण डॉ. मोना व बराच मोठा आप्त आणि मित्र परिवार आहे.

— लेखन : देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००.
आदरणीय शंभरकर मॅडम यांच्या कार्याचा आढावा आपण लेखातून घेतला आहे. त्यांच्या सर्व परिवाराची माहिती आपण दिली आहे. आपण त्यांच्यावर पोर्टलच्या माध्यमातून ओळख करून दिली आहे. माहिती व जनसंपर्क विभागामध्ये विविध पदावर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. शंभरकर मॅडम
गेल्यामुळे माहिती वजन संपर्क विभागात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची सदैव आपणास आठवण येणार आहे. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.
सरोदे परिवारा मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे.