१. श्रावणसरी
सरींवर सरी श्रावणसरी
गोरी गोरी जोरकस एखादीच खरी
श्रावणसरींचा सुंदर नाद
चमकून तडिता देती साद
काळा काळा मेघ दाटून आला
थेंब थेंब बरसून रिकामा झाला
थेंबांतून आरपार शिरलं ऊन
एकीकडे पाऊस तर दुसरीकडे ऊन
ऊनपावसाच्या या मजेदार खेळात
इंद्रधनु खुललय निळ्या आभाळात
देवाची करणी पाणीच पाणी
हिरवी शेते गाती गाणी
मरगळ झटकून टाकती जीव
भन्नाट वारा घालतो शीळ
श्रावणात येतो सणांना पूर
गावागावांचा बदलतो नूर
पानोपानी फुलतो ताटवा
मोहित मनांना देतो गारवा
सरींवर सरी श्रावणसरी
अलगूज वाजे घरोघरी-
— रचना : स्वाती दामले.
श्रावण मास सुरू झाला. अऽहाऽ हा श्रावण म्हणजे आनंद, चैतन्य, सणांची पखरण! मनात आनंद अगदी भरून येतो आणि शब्दांवाटे बाहेर पडतो. मीही त्याला अपवाद कशी असेन ? घ्या तर मग शब्दांतून श्रावणाचे चैतन्य आणि आनंद झोके !
२. श्रावण
आषाढ सरला
श्रावण आरंभ
आता सुरु होती
सण समारंभ- १
श्रावण आरंभ
आनंद लहरी
सरसर आल्या
श्रावणाच्या सरी- २
आनंदे नाचती
सान आणि थोर
नभी इंद्रधनु
मनामध्ये मोर- ३
महिना सणांचा
नागपंचमीचा
बंधू भगिनीच्या
रक्षाबंधनाचा- ४
मंगळागौरीला
पुजी सुवासिनी
मनी इच्छा धरी
सुखी राहो धनी – ५
कृष्णजन्माष्टमी
खूश सारेजण
नारळी पुनव
हर्षाला उधाण- ६
आनंद मंगल
व्रते करुनिया
घेतात भाविक
पुण्य भरुनिया- ७
श्रावण मासात
चैतन्याचा ठेवा
ओंजळी भरून
प्रत्येकाने घ्यावा- ८
— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
३. निसर्गचक्र
सप्तरंगी उधळण करुनी
निसर्गचक्र नित्यच फिरते
सृष्टीलाही मोहोर फुलूनी
आसमंत दरवळत राहते..1
सप्त रंगाने मुदित न्हाऊनी
वसंत ऋतुचे आगमन होते
ऋतुराज गंधित रंगछटानी
शिशिराची पानगळ सरते… 2
ऋतुराजासवे सोनपाऊली
धरा रंगपंचमी झणी खेळते
सुगंध शिंपीत मेदीनिवरी
वसुधा रंगोत्सवात नाहाते… 3
वसंत ऋतुची चाहूल येता
आम्रतरुवरी कोकिळ गाते
पर्णफुलानवरी झोके घेता
रानपाखरे डोलत झुलते… 4
पक्षीगण गुंजारव करुनी
नाद अनाहत वनात घुमतो
मोर पदन्यासे पंख पसरूनी
नवपालवीने तरु मोहोरतो… 5
धरतीवरी रंगपंचमी पाहता
चित्त रोमांचित तनु बावरते
भूमीवरी फुलांचा सडा शिंपता
रूप अनोखे सृष्टीचे बदलते… 6
— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे
४. सांजवेळ (श्रावणातील)
तेव्हा सांजवेळ होता होता
शिवारात पावसाचा शिरवा
किती हा धुमाकुळीचा वावर
सावर ! दिशा आपुली फिरवा
थिरकावे फुलवून पिसारा
डौलाने मोरांनो कित्ता गिरवा
तेव्हाच झाली किरणांना सूर्याज्ञा
सृष्टीवरी नजर फिरवा
सप्तरंगी धनुष्य पडले नभी
रोखून पाही मधला हिरवा
बोले,जरा अधिकच मेहरबान
नाना छटा पानोपानी मिरवा
इतर रंगांनाही जोर चढला
कानगोष्टीत सांगती खोड
जिरवा रंगबिरंगी फुलांनी तोड
अंधारात आता सारे नीरवा (शांत)
— रचना : विजया केळकर. नागपूर
५. श्रावण राजा
हसरा उत्साही श्रावणमास
पडती रिमझिम पाऊसधारा
ऊन-पावसाच्या लपंडावात
होई ओलिचिंब नववधू धारा //१//
वनराईत आनंदतो मयूर
नाचतो थुईथुई पसरून पिसारा
घननिळ्या नभातून
थवा पक्ष्यांचा नयनरम्य नजारा //२//
पसरतो हिरवागार गालिचा
त्यावरी रानफुलांचा नक्षीदार काठ
सप्त रंगांची होता उधळण
नभी कमानी इंद्रधनुष्याची ललाट //३//
सण उत्सवांचा श्रावण राजा
व्रत वैकल्याचा देवादारी महिमा
लेकी येती हौसेने माहेराला
खेळाया फुगडी अन झिम्मा //४//
सुखावतो मनी बळीराजा
पाहुनी उभ्या हिरव्या शेताला
मंत्रमुग्ध होऊनी बाप्पाच्या आरतीत
मिसळून भक्तीत विसरे कष्टाला //५//
येतो असा श्रावण मास
नटवून जातो साऱ्या सृष्टीला
आनंद सुख देतो जनांना
येतो फक्त एकदा वर्षाला //६//
— रचना – सौ. वर्षा महेंद्र भाबल. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800