अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर हे गाव नगर-मनमाड राज्यमार्गावरील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या पवित्र प्रवरा नदीच्या तीरावर वसलेलं मोठया लोकसंख्येचं हे गाव आसपासच्या छोट्या-मोठ्या खेड्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. एक व्यापारीपेठ म्हणून जितका कोल्हारचा नावलौकिक आहे तितकंच एक “आध्यात्मिक केंद्र“ म्हणून सुद्धा कोल्हार-भगवतीपूर हे गाव आता सर्वदूर माहीत झालं आहे, ते इथल्या ग्रामदैवत भगवतीमातेमुळे !
नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात तसंच देशभरात देवीभक्त आदिशक्तीची उपासना करतात. महाराष्ट्रातही या नवरात्रोत्सवात घट बसवले जातात. यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तिपीठांना देवीभक्तांची अलोट गर्दी असते. या साडेतीन शक्तिपीठांत तुळजापुरची तुळजाभवानी, कोल्हापुरची अंबाबाई, माहुरची रेणुकामाता आणि नाशिकजवळचं अर्धं पीठ म्हणजे सप्तश्रुंगीदेवी इथे सर्वजण आवर्जून जातात. परंतु, एकाच ठिकाणी या साडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन केवळ “कोल्हार-भगवतीपूर” या गावात होतं आणि यामुळे येणारे भाविक मातेच्या दर्शनाने धन्य होतात.
इथे भगवती मातेचं पुरातनकालिन मंदिर आहे. या मंदिराला प्राचीन इतिहास आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचं जुनं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचं होतं. मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात जमिनीच्या समतलापासून ४०-४५ फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीस पडला नाही तसंच मंदिरनिर्मिती संदर्भातील शिलालेखसदृश्य अन्य पुरावाही सापडला नाही. त्यामुळे मंदिर अनादीकाळातील असल्याची साक्ष पटते.
प्राचीनकाळी प्रवरा परिसर म्हणजे एक प्रकारचं दंडकारण्य होतं. श्रीराम वनवासात असताना या भूमीवर त्यांनी पूजेसाठी वाळूची पिंडी तयार केली. या ठिकाणी त्यांना श्री महादेव प्रसन्न झाले. पुढे याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. त्या मंदिरास कोल्हाळेश्वर नाव पडलं. कोल्हाळेश्वर वरून या गावास ‘कोल्हार’ नाव पडलं असं काहीजण मानतात. कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धार काम झाले आहे पुरातन कोल्हाळेश्वर महादेव मंदिराच्या जागेत बांधण्यात आलेले हे नूतन शिवमंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी ६५ लाख रुपये खर्च आला आहे.
या ग्रामदेवतेविषयी एक आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. कोल्हार गावात फार वर्षांपूर्वी ‘लोटांगण बाबा’ नावाचे गृहस्थ राहत होते. दरवर्षी ते वणीच्या गडावर सप्तश्रुंगीमातेच्या दर्शनाला कोल्हार-भगवतीपुरातून अक्षरशः लोटांगण घालत जात. पुढे त्यांना वयोमानानुसार वणीला लोटांगण घालत जाऊन देवीचं दर्शन घेणं अशक्य झालं. तेव्हा सप्तश्रुंगी गडावरील अंबामातेने त्यांना दृष्टांत दिला की, मीच दरवर्षी पौष पोर्णिमा ते माघ पौर्णिमा या काळात कोल्हार इथे येईन आणि दर्शन देईन. तेव्हापासून दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर इथे महोत्सव साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारं हे भारतातील एकमेव जागृत तीर्थक्षेत्र आहे.
या “यात्रोत्सव काळात” आणि “नवरात्रोत्सवाच्या” काळात तुळजापुरची भवानीमाता, माहुरची रेणुकामाता, कोल्हापुरची अंबामाता आणि वणीची सप्तश्रुंगी माता ही साडेतीन शक्तिपीठं इथे वास्तव्य करतात असं मानलं जातं. त्यामुळे भगवतीमातेच्या या कोल्हार भूमीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.
श्री भगवतीदेवीचा यात्रा उत्सव व नवरात्रोत्सव विषयी :-
श्री भगवतीमातेचा यात्रामहोत्सव दरवर्षी पौष शुध्द पौर्णिमा ते माघ शुध्द पौर्णिमा असा महिनाभर साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारे हे संपूर्ण भारत वर्षातील एकमेव जागृत देवस्थान आहे. या काळात अनेक धार्मिक विधींबरोबरच श्री भगवतीदेवी यात्रोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यात्रा महोत्सवास पहाटे महाआरतीने प्रारंभ होतो. सायंकाळी श्री भगवतीमातेच्या छबीना पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये ढोलताशे, सनई, चौघडा, नाचगाणे यांचे आकर्षण ठरते.
मिरवणुकीत बहुसंख्येने ग्रामस्थ सहभागी होतात. छबीना मिरवणूक देवी भगवती माता मंदिरात पोहोचल्यानंतर रात्री शोभेच्या दारु कामाची जोरदार आतषबाजी केली जाते. दुसऱ्या दिवशी नामांकित पहिलवानांच्या कुस्त्यांचा जंगी फड भरविला जातो. तसेच लोककलावंतांच्या हजेऱ्या होऊन त्यांना बिदागी वाटप केली जाते. यात्रेनिमित्ताने मंदिर तसेच परिसरात नेत्रदिपक विद्युत रोषणाई केली जाते. त्याचप्रमाणे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.
भगवतीमाता मंदिर आणि परिसरात नेत्रदीपक रोषणाई केली जाते. नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात संपन्न होतात. त्यामुळे गावाला नवचैतन्य प्राप्त होतं. उत्सवकाळात आणि इतर वेळीही पूजा साहित्य, बांगड्यांची दुकानं, खेळणी, मिठाईची दुकानं मंदिरासमोरील प्रांगणात असतात. दरवर्षी हजारो भाविक न चुकता नवरात्र काळात इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
श्री भगवतीदेवी मंदिर जीर्णोद्धार :-
श्री भगवतीदेवी मंदिर जीर्णोद्धार समितीच्यावतीने एक कोटी रुपये खर्चून श्री भगवतीमातेचं जुनं मंदिर पाडून त्या ठिकाणी आज सुंदर आणि मनमोहक असं भव्यदिव्य मंदिर बांधण्याचं कार्य पूर्ण केलं आहे. भक्तांसाठी भक्तनिवास आणि पार्किंगदेखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यासाठी जीर्णोद्धार समितीला ग्रामस्थ आणि भाविकांनी आर्थिक मदत केली.
शिर्डी इथे साईबाबांचं दर्शन घेऊन नगर-मनमाड रस्त्याने शनी-शिंगणापुरला जाणारा भाविक न चुकता कोल्हार-भगवतीपूर इथल्या श्री भगवतीमातेचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जातच नाही. भाविक या “आगळ्यावेगळ्या शक्तिस्थळाला“ भेट दिल्यानंतर भगवती मातेच्या दर्शनाने धन्य होतात.

– लेखन : साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800