१. बाप्पा
सरला श्रावण, आले भाद्रपद
झाले गोड पाहुण्याचे आगमन.
गोंडस चेहरा, तेजःपुंज ते रूप
सुपासम कान, हत्ती सम सोंड
कमल नयन, नाव तया एकदंत
बालगोपाल म्हणे बाप्पा.
मोठ्यांचा तो गणेश
जयघोषात असे मोरया
गणपती बाप्पा मोरया
कोणी मातीतून देई आकार
कोणी करे अक्षरातून साकार
रांगोळी मधे तर तुझा एकाधिकार
तु सर्व गुण साक्षात्कार
सजतो दुर्वा, जास्वंद फुलांनी
आवडीचे मोदक खातो घरोघरी
आनंद, उत्साह सर्वांच्या मनोमनी
आले बाप्पा आमच्या घरी
— रचना : सौ.शितल अहेर. खोपोली, जि.रायगड
२. आगरी रचना !
गणा रं माज्या गणा रं
दारान कारला कना रं
गौरी गणपतीचे सनाला
चल गो पोरी तू नाचाला
तुजे शेंड्यान लाल फुला रं
दारान कारला कना रं
नेसून नववारी लुगडी गो
बाया घालतान फुगडी गो
नाच बगाला चला रं
दारान कारला कना रं
मातलेलं बापये ये सगलं
बघा बाल्यानाच नाचलं
गुलगुले तलतय चुला रं
दारान कारला कना रं
पत्तं खेलतान सुना रं
खाती पानसुपारी चुना रं
उकरीचं मोदक झालं रं
दारान कारला कना रं
(शब्दार्थ- गणा- गणेश, माज्या- माझ्या, दारान – दारात, कना – रांगोळी, शेंडा- केसांची रचना, नेसून- परिधान करून, मातलेलं- झिंगलेले, गुलगुले – गोल आकाराचा गोड पदार्थ, सुना- सुनबाई, उकरींचं- उकडीचे)
— रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800