“शमी विघ्नेश”
महाराष्ट्राच्या पूर्व भागात असलेला निसर्ग संपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. या भागाला मोठी परंपरा लाभलेली आहे. या भागातही विनायकाची अनेक स्थाने आहेत. गणेशाच्या विविध मूर्ती बघायला मिळतात. विदर्भात जवळ जवळ दोन हजार वर्षांपासून गणेश पूजनाची परंपरा असल्याचे संदर्भ सापडतात.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नागपूर – कमलेश्वर महामार्गावर वसलेले आदासा हे गाव शमी विघ्नेश या गणेशमंदिरा मुळे प्रसिद्ध आहे. उंच टेकडीवर हे पुरातन गणपती मंदिर आहे. मूर्ती नृत्य गणेशाची असून उजव्या सोंडेची आहे.

याची अख्यायिका अशी आहे की, महापाप, संकष्ट, शत्रू या तीन दानवानी जगाला त्राहीत्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वती रूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रगट झाले आणि त्यांनी तिन्ही दानवांचा संहार केला. म्हणून ही गणपतीची मूर्ती शमी विघ्नेश म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुद्गल ऋषींनी गणेश मूर्तीची स्थापना केली. तेच हे अदोष क्षेत्र. गणेशाच्या 21 स्थानांपैकी एक जागृत स्थान. येथे माघी चतुर्थीचा मोठा उत्सव असतो.

विदर्भातील अष्टविनायकांपैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर येते. महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेश मूर्ती. मूर्तीची उंची जवळजवळ १२ फूट उंच सहा फूट रुंद आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. गणेश पुराणात वर्णन केलेल्या मूर्तींपैकी ही एक मूर्ती आहे. शमी विघ्नेश वक्रतुंड असेही याला म्हणतात. या क्षेत्राचा महिमा वामन पुराणात आढळून येतो. मूर्ती वामनाने स्थापित केल्याचे उल्लेखही वामन पुराणात आहेत.

तर मंडळी अशी ही गणपतीची अनेक अदभुत मंदिरे महाराष्ट्रात आढळतात. त्यांचे दर्शन घेणे हे नक्कीच भाग्याचे आहे. इतकी देवालयांची विविधता मला वाटतं आपल्या भारतामध्येच असेल. देवही आपले ३३ कोटी. त्यांचा महिमा ही मोठाच नाही का ?

— लेखन : मीरा जोशी. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800