“अण्णा गणपती”
मंडळी, आजपर्यंत आपण स्वयंभू, जागृत, प्राचीन गणपती बघितले. पण काही गणपती असेही आहेत बर ज्यांना फार वर्षाचा इतिहास नाही, ते कुठेही सापडलेले नाहीत. त्यांच्या काही पौराणिक कथाही नाहीत. आहेत कथा त्या माणसांच्या.
तरीही त्या अद्भुत आणि रंजक आहेत. भाविकांसाठी ती श्रद्धास्थाने आहेत. नाशिक मध्ये असणाऱ्या अण्णा गणपतीची कथाही अशीच अनोखी आहे.
आता नाशिक म्हटल की आठवतो तो नवश्या गणपती, चंद्रकांत जोशी यांचा इच्छामणी गणेश, चांदीचा गणपती. त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांना माहितीही असेल. पण नावातच काहीतरी वैशिष्टय असलेला अण्णा गणपती अजून बऱ्याच जणांना नक्कीच माहीत नसावा, असे वाटते. येथील मूर्ती अतिशय भव्य आणि विशाल आहे. भक्तांना दैवी ऊर्जा आणि विलक्षण अध्यात्मिक अनुभव देणारे दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे अण्णा गणपती नवग्रह सिद्धपिठम, नाशिककरांचा अभिमान ठरले आहे. जाणून घेऊ या याच्या स्थापनेचा प्रवास….
देवळाली गावाजवळून वाहाणारी वालदेवी नदी. तिच्या आजूबाजूचा परिसर हिरव्या निसर्गाने नटलेला. रम्य आणि मनोहरी आणि त्याच्या अग्रस्थानी विराजलेले ते विशाल गणेशाचे विलोभनीय रूप.
आता “अण्णा गणपती” असे त्याचे वेगळेच नाव का आहे ? हा प्रश्न नक्कीच आपल्या मनात असेल नाही का ? व कुतूहल ही जागे झाले असेल. तर जन्माने दाक्षिणात्य असलेल्या दत्तयोगी अण्णा गुरुजींना भाद्रपद चतुर्थीला ब्रह्म मुहूर्तावर चार मुखी गणेशाचे विराट स्वरुप दर्शन झाले. गणपतीने त्यांना दृष्टांत दिला. त्यांनी पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या संपन्न नाशिक शहराची निवड केली. वालदेवीच्या किनारी विहीनगाव येथे काही वर्षापूर्वी ह्या ४२ फूट भव्य अशा मूर्तीची स्थापना झाली. या मूर्तीची चार दिशांना चार मुखे आहेत. चारही मुखे सुख, शांती आयुष्य आणि आरोग्य यांची प्रतीके आहेत. पाश अंकुश मागील दोन हातात तर पुढील दोन हातांपैकी एक हात गुढग्यावरून खाली सोडलेला, तर दुसरा वरदहस्त, आशीर्वाद देणारा.

ही मूर्ती अती विराट असल्याने मंदिर नाही. प्रशस्त अशा मोकळ्या जागेवर विराजमान आहे. हे विराट स्वरुप प्रगतीचे मार्गदर्शक आहे. गणेशाच्या सामर्थ्याचे प्रातिनिधिक रूप आहे. ते यशदायी आहे. सभोवार अनेक लहान लहान मंदिरे आहेत. मुख्यत्वेकरून नवग्रहांची नऊ मंदिरे आहेत.

इतर मंदिरात शंकर पार्वती कार्तिकेय या बरोबर दत्तात्रेय अक्कलकोट स्वामींचेही मंदिर आहे. शंकर भगवान आपल्या परिवारासह इथे स्थित आहेत. हे एक शांततेचे गर्भगृह आहे. मुद्गल पुराणात ३२ प्रकारापैकी एक असा उल्लेख आहे. चार मुखे सकारात्मक स्पंदने पसरवतात. या मूर्तीचा उद्देशच तो आहे. गणेश त्याच्या सर्व वैभवात उपस्थित आहे. मानव आणि विश्व यांच्यात दृढ संबंध प्रस्थपित करणारे हे एक सिद्ध पीठ आहे. विश्वाला नियंत्रित करणाऱ्या प्रत्येक शक्तीचे अद्वितीय परिपूर्ण संयोजन येथे आहे.
या वास्तूला भेट देणाऱ्या प्रत्येकाला परिपूर्ण अध्यात्मिक भान आणि दैवी ऊर्जेची अनुभूती मिळते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.
तर मंडळी आहे की वेगळी आणि रंजक कथा या अण्णा गणपतीची. बघा नाशिक काही फार लांब नाहीं. एकदा नक्की दर्शन घेऊन या अण्णा गणपतीचे आणि नवचैतन्याने भारून या.

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ.☎️ 9869484800