सिद्धीविनायक (केळझर विदर्भ)
महाराष्ट्राला गणेशोत्सवाची खूप मोठी परंपरा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपासून गणेश पूजा घरोघरी केली जात असल्याचे अनेक संदर्भ सापडतात. अनेक शतकांचा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे. त्यामुळेच गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
बहुतांश गणेश स्थाने ही स्वयंभू जागृत आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे जागतिक स्तरावर प्रसिध्द आहेत. तसेच विदर्भातील अष्टविनायक म्हणून ओळख असणारी गणपती मंदिरेही प्रसिद्ध आहेत. मंडळी आज आपण विदर्भातील अशाच अष्टविनायकांपैकी तिसऱ्या नंबर वर असलेल्या वरद विनायक केळझर, जिल्हा वर्धा या मंदिराची माहिती घेणार आहोत.

केळझर येथील टेकडीवर सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. परिसर निसर्गरम्य आहे. या टेकडीला वाकाटक काळापासून किल्ल्याचे स्वरुप प्राप्त आहे. या किल्ल्याला पाच बुरुज माती दगडांनी बांधलेले भव्य परकोट आहे. पहिल्या व दुसऱ्या परकोटाचे आत चौकोनी भव्य अशी कुशावरती विहीर बांधलेली आहे. त्याला गणेश कुंड म्हणतात. आजही भाविक या विहिरीच्या पाण्याचा तीर्थ म्हणून उपयोग करतात. कुंडापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आजही त्या सुस्थितीत आहेत. कुंड दगडी असून त्याचे पाणी वापरात आहे. गणपती उजव्या सोंडेचा असून उंची ४ फूट ६ इंच आहे. व्यास १४ फूट आहे. अतिशय प्रसन्नचित्त मनमोहक अशी मूर्ती आहे. अति प्राचीन म्हणजे महाभारत कालीन इतिहास याला लाभलेला आहे. नवसाला पावणारा म्हणून याची सर्वदूर ख्याती आहे.

केळझर चे नाव पूर्वी एकचक्र नगर असे होते. त्यामुळेच याला एकचक्र गणपती असेही म्हणतात. श्रीरामाचे गुरू वसिष्ठ यांचे येथे वास्तव्य असल्याची नोंद आहे. केवळ आपल्या भक्ती व पुजेकरता ऋषींनी या मंदिराची स्थापना केल्याची अख्यायिका आहे.
याच काळात वर्धा नदीची निर्मिती झाली. तिचे नाव पूर्वी वरदा असे होते. म्हणून पुराणकाळात याला वरदविनायक असेही म्हणत. श्रीरामांचा जन्म झाल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी केळझर वास्तव्य सोडल्याचे उल्लेख आहेत. महाभारत काळात पांडवांचे या एकचक्रनगरीत वास्तव्य होते. पांडवांनीही त्या कुशावरती विहिरीचे पाणी प्यायल्याचे उल्लेख आहेत. त्याच काळात बकासुराचा वध झाला आहे.
या मंदिरात बाराही महिने भाविकांची अलोट गर्दी असते. वर्षभर इथे धार्मिक उत्सव चालतात. विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तर असे हे विदर्भातील अष्टविनायक यात्रेतील एक जागृत गणपती स्थान. भाविकांचे श्रद्धास्थान पुरातन परंपरा असलेले. जमल्यास नक्कीच भेट द्या.
क्रमशः

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800