“निगेटिव्ह बॉम्ब”
आमची सोसायटी रीडेव्हलपसाठी गेली आणि आम्ही मधुगुंजन सोसायटीमध्ये राहायला आलो. सोनूला कॉलेज जवळ पडेल आणि रेल्वे स्टेशन फार लांब नाही अशी ही मधुगुंजन सोसायटी. आम्हाला मजल्यावर अगदी शेजारी असे एकत्र कुटुंब आहे. बोलक्या,उत्साही अशा आजी,त्यांचा मुलगा -सून आणि त्यांची दोन शाळेत जाणारी मुले असे कुटुंब आहे. घरात आजी किंवा आजोबा असले की मला कुटुंब खानदानी,शालीन वाटते. आजी नेहमी घरात असणार. त्यामुळे जास्तीची चावी देणे, कधी कुरियर घेऊन ठेवणे यासाठी ह्या कुटुंबाचा आधार असेल असेही वाटले.
मग एकेक वेगळेच वाटू लागले. शाळेत जाणारी त्यांची दोन्ही नातवंडे खूपदा आजोळी रहातात. गावातच आहे आजोळ. मुलांचे ट्युशन क्लास, अवांतर ॲक्टिव्हिटीजसाठी क्लास हे सगळे तेथून जवळ आहे म्हणे. मुले माहेरी म्हणून तिथेही पहायचे. मुलांना कधी इकडे आणायचे. शिवाय सून नोकरी करणारी. सुनेची अगदी दमछाक होतेय ते दिसत होते. लिफ्टमध्ये ती भेटली तरी विवंचनेत वाटते.
एकदा किल्ली घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले आजी गप्पा मारू लागल्या. गप्पा म्हणजे मला फक्त ऐकायचे काम. राजकीय परिस्थिती, जागतिक समस्या, आमच्या परिसरातल्या अडचणी याचा नुसता भडिमार झाला. ऐकण्याशिवाय मला पर्याय नव्हता. पेपर वाचून ,टीव्ही पाहून आजी आताच्या काळाशी अगदी जोडलेल्या मात्र वाटल्या.
कॉम्प्लेक्सच्या व्हॉटसप्पच्या रहिवासी ग्रुप मध्ये आम्हाला ॲड केले आहे. पाण्याच्या टाकीबद्दल, वॉचमनबद्दल किंवा अशाच महत्वाच्या सूचना असतील तर मी वाचते. कित्येक व्हीडीओ मात्र मी बऱ्याचदा बघत नाही. व्हिडिओ ,रील्स इतके काही बनत असते हल्ली. काही खऱ्या, काही आभासी, काही रचलेल्या गोष्टी असतात. काही ए.आय.च्या मदतीने अगदी निव्वळ खोटेही असते. फ्लॉवरच्या गड्ड्यामध्ये साप निघाला किंवा कुरियरने आलेल्या पाकिटात बॉम्ब फुटला ! असे भयानक आणि तद्दन खोटे व्हीडीओ पाहून मला चीड येते.
एक दिवस लक्षात आले, असे व्हिडीओ पाठवणाऱ्या असतात आमच्या शेजारच्या आजी ! रोज उठून अशा नकारात्मक बातम्यांची रांगच लावतात रहिवासी ग्रुपवर. कोणीतरी सेलीब्रिटी मृत्यूशय्येवर आहेत अशी बातमी असेल किंवा कोणाचे निधन झाले की असा उत्साह असतो त्यांना, विचारू नका. बातमी आपण पहिल्यांदा दिली ह्याचा तीव्र अभिमान दाटून येत असतो. सोनूचे बाबा म्हणाले लक्ष देऊ नकोस. डिलीट कर. काही काही लोकांना असं सनसनाटी पसरवायला आवडत असतं. आवडत असेल, पण इतकं ?
आजी त्यांच्या मुलीकडे स्वित्झर्लंडमध्ये राहायला गेल्या काही दिवस. तेव्हा नातवंडे इथे राहायला आली होती. ट्युशन क्लास आता लांब पडत नसतील का ? मनात आले लगेचच. अर्थातच मी सोडून दिले.
त्यांचे कुटुंब सुखवस्तू दिसते. मुलगी स्वित्झर्लंडमध्ये समृद्ध जीवन जगत आहे. त्या स्वतः सुरक्षित,चैनीत रहातात. सुरक्षित म्हणजे ए.सी.सारखी उपकरणे, पाईपलाईन गॅस सारख्या सुविधा जाणीवपूर्वक दक्षता बाळगत असतात. नियमित आहार, दर महिन्याला मेडिकल चेकअप. सगळे शिस्तशीर. पोस्ट पाठवताना मात्र रात्रीच्या वेळी हार्ट अॅटॅकचा कसा धोका असतो अशी लांबलचक पोस्ट पाठवतील. पाचशे रूपयाच्या नोटा बंद होणार आहेत किंवा कुठली तरी बँक बंद होणार आहे अशी बातमी प्रसारित करतील. ताडोबा जंगलातला वाघाचा व्हिडिओ पाठवला एकदा. तो घाटकोपर परिसरातला आहे असे सांगून करमणूकच केली आमची. असल्या बातम्या पसरवण्यात दुसऱ्याला सावध करण्याचा प्रामाणिक हेतू मुळीच नसतो हे अनुभवाने समजले आहे.
एकदा त्यांना गॅसदुरुस्तीसाठी हेल्पलाईन नंबर लावून हवा होता, त्यामुळे आजी आल्या. हेल्पलाईनचे एक नंबर दाबा, दोन दाबा असते. सिनीयर सिटीजन बिचकतात कधी कधी. त्यांना किंचित शंका आली होती ,की गॅस लिक होतो आहे. गॅस बंद करून त्या धावत आल्या. गॅसदुरुस्तीच्या निमित्ताने सगळ्या उपकरणांच्या विचित्र गमती त्याहीपेक्षा धोके त्यांनी तिखट मीठ लावून सांगितले. गॅस गीझरचे भयानक किस्से ऐकवले. कटकटी करायला आवडते काही माणसांना, असे मनाशी म्हणून मी सोडून दिले. अशा उदाहरणातून आपण दक्षता नक्की शिकावी,ते योग्य असे मनाला बजावले.
मध्यंतरी माझ्या नणंदेला सोबत म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. वेटिंग रूममध्ये बसलेलो असताना समोरून शेजारी रहात असलेली सून बाहेर पडताना दिसली. मोठा मुलगा सोबत होता. मानसोपचार तज्ञ अशी पाटी असलेल्या केबिन मधून ती बाहेर पडली. आपण सुशिक्षित माणसे ह्या पाटीला तेव्हढे घाबरत नाही हल्ली. तो दहावीत गेला आहे. किती काय दडपण असते आताच्या मुलांना. नंतर तिने मला गाठून सांगितले मोकळेपणाने. मला धक्काच बसला ते ऐकून.
“ आमच्या घरात चालता बोलता निगेटिव्हिटीचा बॉम्ब आहे. सतत चर्चा निगेटिव्ह बातम्यांचीच. त्यांना फार स्मार्ट आहोत आपण असं वाटतं. प्रत्येक अपडेट आपण ठेवतो ह्याचा अभिमान वाटतो.राजकारण, शासनव्यवस्था ह्यावर रोज ताशेरे ओढण्यात काय अर्थ आहे ? चॅनेलवाले किंचाळून तेच तेच सांगत असतात. आपण चोवीस तास तेच ऐकवावे का ? पेपरफुटी हा आता ताजा विषय आहे बोलायला. आजी नव्याने ‘ चार्ज ‘ झाल्यात ! सतत उमेद खचवणारं बोलत राहिलं तर आशा तगेल कशी ? कित्येकदा एखादी बातमी असते ती बाब अपवाद असते. ते रोज होईल असे नाही. पण मी कशी जागरूक नागरिक आहे हे दाखवायचं. व्हॉटसअॅप्प म्हणजे तर मोठं खेळणं मिळालंय. माझा मोठा मुलगा जास्त विचारी आहे. संवेदनशील आहे. त्याच्यावर गंभीर परिणाम होतोय. निगेटिव्ह बॉम्बपासून लांब ठेवणे हाही ट्रीटमेंटचा भाग आहे..”
थक्क होऊन ऐकत राहिले मी.
निगेटिव्ह बॉम्ब निकामी कसा करणार ? सतत गरळ ओकणाऱ्या, आजींसाठी मोठा व्हॉल्यूम असणाऱ्या टीव्हीची जागा बदलून झाली ! टीव्हीची वेळ मर्यादित केली. पण गप्पांचा विषय ?
स्मार्टपणाच्या तारेत आहेत आजी. त्यांना सांगून कळत नाहीये. नातवाच्या मनावर ह्याचा गंभीर परिणाम होतोय हे डोक्यातच शिरत नाहीये.
लहान मुलांसाठी जे साहित्य निर्माण होते त्यात सत्याचा विजय, मौज लुटणारे सवंगडी असे विषय प्रामुख्याने असतात. मुलांची सकारात्मक बैठक त्यामुळे तयार होते. ह्या निरागस वयातून आता किशोर वयात त्यांची नातवंडे प्रवेश करत आहेत. आजूबाजूचे वातावरण आश्वासक नाही. मुलं बिथरतील अशी प्रतिकूल परिस्थिती आहे. पण वाट काढण्यासाठी पर्याय असतात. कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी कुटुंबाची संरक्षक ढाल हवी. समाजात अनंत समस्या आहेत, त्यांच्याशी लढणे शिकवायचे की घरात नकारात्मक पसरवत राहायचे ?
सुनेचे माहेर गावात आहे त्यामुळे तात्पुरती तरी सोय झाली. मुलांना किती दिवस लांब ठेवणार ? आजींनी समजून घ्यायला पाहिजे. नसेल समजत तर समुपदेशकाकडे नेले तर त्यांनी गेले पाहिजे ! सवयी इतक्या त्रासदायक असतील तर, निगेटिव्ह बॉम्ब घरातल्या घरात वाळीत टाकला जाऊ शकतो. ह्यात आजींचेच नुकसान आहे.
‘संगती रंग’ ह्या सदरामध्येच ‘झेंडूची पाने’ असे वर्णन केलेली आजी आजोबांची जोडी आहे. वृद्ध असूनही सकारात्मक सदा सतेज, हिरव्या, कोरीव पानांची !
ह्या आजींना काय काटेरी पान म्हणूया ?
क्रमशः

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
