Thursday, March 12, 2026
Homeलेखसंगती रंग : ५

संगती रंग : ५

सांग दर्पणा, कशी मी दिसते ?”

नीलिमा कामावर रुजू झाली ती थोडी धाकधुकीत. कार्ड पंचिंग, बॉस, वर्कलोड, टार्गेट ऐकून होती. ते दडपण होतंच. शिवाय अगदी लहानपणापासून कायम मोठ्ठं दडपण होतं, स्वतःच्या दिसण्याचं !
ह्याचमुळे शाळेत, कॉलेजमध्ये ती मागे मागे रहायची.
ऑफिसमध्ये कामाचे स्वरूप कळून घेतल्यावर तिला अगदी छान वाटले. दिवस बिझी पण चांगला गेला. संध्याकाळी एकमेकांना गुड नाइट करून निघताना चेहऱ्यावर नकळत हास्य आले. जमशेद म्हणाला, “व्हॉट ए स्वीट स्माईल !“
पळनिटकरमॅडम म्हणाल्या, “लाईन मारू नकोस हं. दिसली गोड मुलगी, की पडला गळ्यात !
तुझ्या वाइफकडे बोलते, थांब.’”
स्वीट स्माईल ?…
मी गोड आहे ? म्हणूनच मला डास चावत असणार…
नक्की हेच कारण असणार.
आजोळी डास चावले की मामेबहीण म्हणायची, ”निळकुंडी काळी आहे म्हणून डास चावतात जास्त तिला.” फार अपमानाचे वाटायचे नीलिमा ह्या नावाचे असे मोडून तोडून केलेले रूप. नीली, नीले, निळकुंडी. तर कधी नळकुंडीसुद्धा !
आजोळी खूप वेळा मुक्काम असायचा. जरा शाळेला सुट्टी असली की, आई माहेरी घेऊन जायची तिला. घरात सतत भांडणे असायची. कधी आई – बाबा, तर कधी आई – आजी. घरातल्या वातावरणाला कंटाळूनच आई माहेरी येत असे.
अशा परिस्थितीत आईला माहेरी मान कसा मिळेल ? फक्त हिडीस फिडीस असायची वाट्याला. शेवटी बाईचा मान तिच्या नवऱ्यावर, त्याच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असतो !
आजोळी आजी सांगायची,
”रिठा घेऊन चेहरा घास जरा नीले, आईचा रंग काही घेतला नाहीस. आईसारखी बुटकी मात्र होणारेस.”
“लव- वाक हवी, अंग झडायला हवे. झाडून काढ, कमरेत चांगलं वाकून. कंबर बारीक हवी बाईची. ”निलीमाच्या हातात झाडू देऊन मामी सांगायची. अशा वेळी मामी हलकेच स्वतः कमरेत लचकायची.

एकदा तिनं धीर करून मामीला विचारलं, ”मग तू एका पेटीकोटवर दुसरा पेटीकोट का घालतेस ?”
मामी चिडलीच. “एक नंबरची वाह्यात आहेस. बेअक्कल ! शरीर कुठे जाड दिसायला पाहिजे आणि कुठे नको ते पण कळत नाही.
नको तिकडे लक्ष !”
आजोळी आलं की आई सर्वांचे कपडे धुवायचं काम करत असे. नीलिमा ते कपडे दांडीवर वाळत लावत असे. कपड्यांचा हिशोब रोजचा होता. सोपा होता. आजी धरून तीन तर बायका. नको तिकडे लक्ष कसे काय ? आईने कधी तिच्यासाठी आधाराचे शब्द काढले नाहीत. आजोळी जाणे थांबवले नाही. घरातले दूषित वातावरण बदलले नाही. आजूबाजूचे सगळे तिला असाच आरसा दाखवत, ज्यात ती कुरूप दिसत असे.

काहीतरी निमित्ताने ऑफिसमध्ये पूजेचा घाट घातला.तिनं साडी नेसायचं ठरवलं. आपली स्वतःची उंची तिला छळत असे. त्यातले त्यात बुटकेपणा झाकले जाईल असे डिझाइन आणि सावळ्या रंगावर खुलेल असा मंद आकाशी रंग होता, साडीचा. पहिल्या पगारातून आणली होती तिने ही साडी.
मावशीनं बजावलं होतं, ”लग्नाचं बघायला हवं आता. कितीही मॉडर्न झालात तरी, एखादी बरी साडी हवी.”
साडीत स्वतःला तिनं आरशात निरखलं. आपण खरंच छान दिसतोय असा साक्षात्कार झाला तिला.
“छान दिसतेय ना मी, आई ?”
“साडी नेसली म्हणून उंची का वाढणार आहे ? की रंग बदलणार आहे ! “
अपत्य कसेही असले तरी, आई त्याचे मटामटा मुके घेते. जगातले सर्वांत सुंदर बाळ असते ते. आई दाखवते असा आरसा बाळाला,ज्यात बाळ गोड दिसते. बाळाला जाणीव होते, जगात माझ्याएवढं देखणं कुणीच नाही.
हे नीलिमाच्या वाट्याला आलेले नाही. आई तिच्याकडे अपत्य म्हणून कधी बघतच नाही. नावडत्या माणसाची मुलगी आहे ती. नाईलाजाने वाढवावी लागलेली.

पण आता ? आता तिला स्वतःचा आरसा सापडला होता. सांग दर्पणा, कशी मी दिसते ? तिनं लाडात आरशाजवळ जाऊन पुन्हा विचारले. आरसा हसला मनापासून.
ऑफिसमध्ये गेल्यावर सगळेच गोळा झाले.
“साडी sss “ असा मोठा चीत्कार !
“मुझे क्यू नहीं बोला,
मैं भी पहनती थी…”
“क्या कमाल लगती हो !”
“स्वीट अँड सोबर .”
“ए, चॉईस छान आहे गं तुझा, मला साडी आणायची तेव्हा शॉपिंग करताना तू बरोबर ये…”
“बुजुर्ग लोग भी साडी भूल गये ! आप का अंदाज तो हट के निकला.”
“आपल्याला काय खुलून दिसतं ते कळायला हवं…छान आहे तुझा ड्रेस सेन्स. मला तुझे डेली वेयर पण आवडतात…”
“मला वाटतं,ड्रेस सेन्स नसला तरी चालेल. कारण तुझा रंग असा छान गव्हाळ आहे ना,त्यावर सगळेच रंग खुलून दिसतात…”
“ए काम करो, पूजा है.
हॉलिडे नही है. सिर्फ लडकियों के पिछे लगते हो.”
सर्वात कडी पळनिटकरमॅडमनी केली .”मुलगा नाहीये येवढा मोठा, नाहीतर सून करून घेतली असती…”

आधीचे आठवणीतले सर्व आरसे तिनं दूर फेकून दिले.

आरसा सुंदर असेल ना,
तर आपण सुंदर दिसतो.
सुंदर नजरेने पाहिलं,
की सगळं सुंदरच भासतं.
केवळ सुंदरच नाही,
तर स्वीट पण !

घरी आल्यावर तिनं आरशाला पुन्हा विचारलं. आरसा गोड हसला. म्हणाला, अभिप्राय म्हणजे आरसाच असतो ना !

वसुंधरा घाणेकर

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments