आयुष्याच्या संध्याकाळी या …
सखे, मज साथ तुझी हवी होती
अर्ध्यातच सोडुनी हात माझा
तू वाट नवी धरली होती
कातरलेल्या वेळी अशा ह्या
हातासवे मन ही थरथरते आहे
थकलेल्या देहा या
आसवांचीच सोबत आहे
नाही प्रेमाचा
प्रकाश अंधुकसाही,
की, नजर माझी थीजलेली……
शब्द दुर्मिळ मायेचा,
की श्रवण यंत्रे माझी बिघडलेली……
स्पर्श नाही आपुलकीचा
की संवेदनाच माझी संपलेली….
गतस्मृतींना कवटाळून,
अडगळ होऊन जगतो आहे
हिशोब संपले सारे,
श्वासांचे गणित मा़ंडतो आहे
मालवले दीप सारे
अंधार आहे सोबती
सखे आज मज
साथ तुझी हवी होती
— रचना : शुभांगी गावडे पाटील. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
