Tuesday, September 16, 2025
Homeयशकथासाहसी नेहा

साहसी नेहा

बेस्टमध्ये चालक असलेल्या, सांताक्रूझला चाळीत रहाणाऱ्या मनमोहन आणि शुभांगी नाईक या दाम्पत्याला पाच अपत्ये ! मुंबईत असूनही शेणानं सारवलेली जमीन, कुडाच्या भिंती इतकी गरिबी ! पण कष्टाळू बाबा ; मुलांवर अतिशय प्रेम ! दिवसभर बस चालवून देखील संध्याकाळीही परत गाडी चालवून आपल्या मुलांना नियमितपणे दर शनिवारी फिरायला न्यायचे ! छोटी मोठी हौस भागवायचे. मोठी रत्नप्रभा, म्हणजेच नेहा !

दुसरीत असताना नेहाला अचानक फळ्यावरचे दिसेना ! त्यावेळी त्यांच्या घरात वीजही नव्हती ; रात्री समई लावून व्यवहार चालत. यामुळे कदाचित डोळ्यावर ताण आला असेल ;असे वाटले. नेहाच्या डोळ्याची समस्या सुरु झाल्यावर ; शेजारच्यांकडून वीज घेतली. पण समस्या डोळ्यातच होती, पुस्तक डोळ्यांना लावून वाचे. अंधार झाल्यावर तर तिला अजिबात दिसत नसे. नानावटी, कूपर, मग लोटस हॉस्पिटल; उपचार सुरु झाले. प्रचंड खर्च झाला, मात्र उपयोग काहीही झाला नाही. दुर्दैव म्हणजे छोटी बहीण तृप्तीलाही हीच समस्या ! दोघींच्या डोळ्यांना ‘मक्युलरा डिजनरेशन’ नावाचा लाखात एकाला होणारा आजार झाला ! ज्यात डोळ्याच्या पडद्यावर काळा डाग पडतो, डाग वाढून हळू–हळू दिसेनासे होते. याशिवाय पडद्यावर पांढरे डाग व जाळीही आहे.

विलेपार्ल्याच्या प्रार्थना समाज शाळेत सहावीत असतानाची गोष्ट ! शाळेच्या मैदानावर मुलं, ‘डोंगराला आग लागली, पळा–पळा’ …खेळत होती. दृष्टीची गडबड असलेली नेहा, कुंपणाच्या तारेवर पडली ; ढोपराला प्रचंड लागलं, तेव्हापासून शाळेत फतवा निघाला, “नेहाला दिसत नाही….. तिला स्पर्धा, खेळ, पिकनिक, नाच, नाटक सारे बंद !” कोणत्याही शाळेच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने, सगळ्या गोष्टी नेहाला खूप त्रासदायक व मनाविरुद्ध होऊ लागल्या. कारण आजवर चळवळी नेहा लंगडी, कबड्डी, डॉजबॉल, योगा  या सर्वात पुढे असायची. एकदा शाळेत मुलगे विरुद्ध मुली डॉजबॉल सामना होता. एक मुलगा आउट होत नव्हता. नेहाच्या तिरळेपणामुळे तो मुलगा आउट होऊन मुली सामना जिंकल्या.

आठवीत तर नेहाला दिसायचं पूर्णच बंद झालं. सरकारी अपंगत्वाचा दाखला, चार वर्षांनी मिळाला. आता स्वतः अभ्यास करणे कठीण झाले. आई दोघी बहिणींना वाचून दाखवायची ; आईने मात्र दोघींना घरकाम करू दिले नाही. दहावीत नेहाला ‘बेस्ट स्टुडंट अवार्ड’ मिळाले. अचानक आलेल्या समस्येमुळे हुशार नेहा ५६ % गुणच मिळवू शकली.

दरवर्षी सुट्टी पडल्यावर नाईक कुटुंब गावी जायचं. कुडाळ तालुक्यातलं ,कर्ली नदीकाठचं सरंबळ हे नाईक कुटुंबाचं गाव ! गाव पूररेषेतलं! जायला चांगले रस्ते नाहीत, डोंगर ओलांडून कित्येक मैल चालावे लागे. पावसात तर छतापर्यंत पाणी ! ही प्रतिकूल परिस्थिती नेहाला चालणे, पोहणे, डोंगर चढणे यासाठी लाभदायक ठरली. “अपंगत्व, मला वरदान ठरले आहे”, नेहाताई सांगतात .

दृष्टिहीनत्वानंतर NAB (National Association For The Blind) मध्ये नेहाने प्रवेश घेतला, नि सृजनाला अंकूर फुटले. तेथील मुलांचे कर्तृत्व प्रेरक ठरले. शाळेतल्या अतृप्त भावना ,कला मूर्तरुपात येऊ लागल्या, तेही विनामूल्य ! भरतनाट्यम ,कथ्थकनृत्य ,ब्रेल हे सारे ती तिथे शिकलीच! टेलिफोनऑपरेटचं प्रशिक्षणही तिने घेतलं . नि कधी मागे वळून पाहिलंच नाही. अनेक अडचणीना तोंड देत मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात बी.ए. पूर्ण केलं .तसेच एल.एल.बी.चे पहिले वर्ष देखील तिने पूर्ण केले . NAB मध्ये मनातली सारी स्वप्नं मूर्तत्वात येऊ लागली.

हिंदी तसंच मराठी नाटकात काम केलं. त्याशिवाय बुद्धिबळ ,गोळाफेक ,थाळीफेक ,लांबउडी ,धावणे यांना वाव मिळत गेला . जेवण बनवणे, ब्रेललिपी ,सोबत गिर्यारोहणही तिने टप्प्याटप्प्याने आत्मसात केले नि आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. अचानक विविध स्पर्धात भाग घ्यायची संधी मिळत गेली. कसून सराव आणि जिद्द यामुळे नेहाला राज्यस्तरावर ,मग देशपातळीवर बक्षिसे मिळायला सुरवात झाली . जोडीला बाबांचा आर्थिकभार हलका करायला ती , सुरवातीला गैसएजन्सीत ,नंतर कुरिअरकंपनीत नोकरी करु लागली . भावंडांच्या शिक्षणाचीही जबाबदारी तिने पेलली. आणि …१९९१मध्ये शासकीय संधी .. विक्रीकर विभागात टेलीफोन ऑपरेटर म्हणून ती रुजू झाली .

‘विवाहाच्या गाठी स्वर्गात जुळतात’ , असे म्हणतात, तसेच झाले. सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेला तरुण नलिन पावसकर ! नेहाचं काम ,नि कर्तृत्व न्याहाळत होता .नेहाच्या धडाडीवर आणि कर्तृत्वावर तो खूष झाला ,नि चक्क नेहाच्या प्रेमात पडला .घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी नेहाशी विवाह केला .घरात एकत्र कुटुंब पण सामाजिक भान असलेले ! सासूबाईंनी दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाची जबाबदारी नेहावर सोपवली. दरम्यान तिने कुकर आणून दुकानदाराकडून कुकर कसा लावायचा ? ते शिकून घेतले होते . खूप प्रयत्नाने संपूर्ण स्वयंपाक उत्तम झाला . आणि सासरच्यांची मने जिंकण्याची किल्लीच जणू तिला सापडली .

नलिन यांच्या भक्कम पाठिंब्यावर नेहा जणू वाऱ्यावर स्वार झाली . त्यातही संधी मिळत गेल्याने ,अनेक जागतिक विक्रम केले . (२००४)इंग्लंड स्टेफर्ड येथे अंधांसाठी आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत नेहाने पाचवे स्थान पटकावले ! पुढे २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात तिला ११८९ इतके रेटिंग प्राप्त झाले आहे. न्यू Law कॉलेजच्या डोळस महिला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नेहा सुवर्णपदकाची मानकरी ठरली. फ्रीस्टाईल राष्ट्रीय जलतरणस्पर्धेत सुवर्णपदक ! २००५ मध्ये अंधांच्या मास्टर गटात राज्य व राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून विशेष चाम्पियन ट्रॉफी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मान . सोमनाथ चटर्जी यांच्या हस्ते तिला मिळाली .

अंधांसाठी उपलब्ध असलेल्या व डोळसांच्या बरोबरीने अनेक साहसी खेळात नेहा भाग घेऊ लागली .२००५ ते २०१२ अथ्लेटिक्समध्ये राष्ट्रीयस्तरावर गोळाफेक ,थाळीफेकमध्ये सुवर्णपदक ! आंतरराष्ट्रीयस्तरावर इंडोनेपाळ २०१७ साली सुवर्णपदक !
२००० साली यजमानांना, नलिन पावसकरांना जीवघेणा अपघात होऊन त्यात २६ ठिकाणी हाडं मोडली ; तीन वर्षे ते पूर्ण अंथरुणावर होते !त्यावेळी फ़िजिओथेरपीस्ट डॉ .दीपक रहाते (दृष्टिहीन) हे खार ते बांद्रा चालत यायचे ! ‘त्यांच्या प्रयत्नांमुळेच माझे पती, शरीर व मनाने तंदुरुस्त झाले’! दिपकजीची उर्जा व पत्नीचे धाडस व कर्तृत्व नलिन यांना प्रेरक ठरले . (Sports Adventures for Differently Abled) साहसी खेळाची दिव्यांगांना संधी मिळायला हवी या भावनेने त्यांनी एक संस्था स्थापन केली . तिचे नाव ‘All India Andh Stree Hita Association (AIASHA)’. ही संस्था २००३ सालापासून कार्यरत आहे.

अंधांसाठी साहसी खेळातून पुनर्वसन व प्रशिक्षण संस्थेतर्फे सुरु झाले .बुद्धिबळ ,जुडो ,कबड्डी ,फूटबॉल, पोहणे ,रोपमलखांब ,टायकांडो ,गोल्हबॉल ,अथेलेटिक्स ,कराटे लोनटेनिस साउंडबॉल, असे विनामूल्य प्रशिक्षण नामवंतसंस्थात दिले जाते . आजवर हजारहून जास्त अंधांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन सर्व खेळात महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे .नेहा ,बहीण तृप्ती ,मुलगा ओमही आता इथे प्रशिक्षण देतात .

ओम पावसकर हा महात्मा गांधी विद्यालयातून दहावी झाला. आईप्रमाणे त्यालाही ‘ आदर्श खेळाडू ’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे .तो आंतरराष्ट्रीय लांब उडी स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता व राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स खेळाडू आहे ,सध्या तो कीर्ति महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत आहे.संस्थेला लागणारी इतर मदत नलिन पावसकर करतात .

नेहाने गिर्यारोहण केलेच ;पण तिने इतर अंध ,समस्याग्रस्तानाही गिर्यारोहणासाठी नेऊन बर्फात खेळण्याचा आनंद दिला .१९८७ पासून गिर्यारोहण करणारी नेहा ;हिमालयातील तेरा हजार फुटावरील झोंगरी भागात १५ दृष्टिहीन महिलांचे प्रशिक्षणाचे तिने नेतृत्व केले . अंध ,मूकबधिरांसह मोहिमेत सहभागी होऊन १७,२२० फुटांवरील क्षितीधर शिखरावर चढून जागतिक विक्रम करणारी म्हणून ‘ लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ’ मध्ये त्याची नोंद झाली ! ट्रेकींग दरम्यान रात्री वाघाचे दर्शन वा डरकाळीही तिने ऐकली आहे . हिमालयात क्षितिधर शिखर सर करून उतरताना ती दरीत कोसळली .धनिष कोटीयन व गुप्ता , यांनी नेहाला रुग्णालयात नेले .

झाले असे की ,बर्फात पाय अडकवण्यासाठी बुटाला खिळे असतात . उतरताना ती ३०० फूट दरीत गेली .तिचे शूज बर्फात अडकले नाहीत. हातात छोटी कुऱ्हाड असते ,ती बर्फात अडकवायची .एक्स्पर्ट ओरडत होता .पाय बर्फात अडकवा .पण कुऱ्हाड घसरत चालली होती . तो कसाबसा तिच्यापर्यंत आला ,आणि ती मृत्युच्या दारातून परत आली .हातातली कुऱ्हाड घसरताना रुतली म्हणून ती अडकली .हे सगळे भयंकर होते .ती पडली तेव्हा छातीवर आपटली . छातीत ,पोटात पाणी झाले . प्युरसीचा आजार झाला. त्या आजाराने तिला टी .बी. वर नेले. त्यावेळी सोबत ५३ लोक होते .पण कुणीही चौकशी केली नाही .संस्था फक्त इव्हेंट दाखवण्यासाठीच असतात .ह्याबद्दल नेहा खंत व्यक्त करते .

ह्या आजारातून आपण उठणार नाही ,असे वाटत होते .यावेळीच तिच्या साहसाची नोंद ‘लिम्का बुक’ मध्ये झाली. पण आपला पराक्रम कळायच्या ती मनस्थितीतच नव्हती .१९९४ मध्ये नाव रेकॉर्ड झाले व नेहाला ते तब्बल दोन वर्षांनी म्हणजे १९९६ साली कळले . याचा तिला खूप मानसिक त्रास झाला . याचे कारण फक्त दृष्टिहीनत्व !

हिमालयातल्या एका प्रसंगाची आठवण ,सांगताना ती म्हणाली – ‘अंध व्यक्तीला त्यातही बाईला ,कैम्पवर रहाणे मुश्कील असते .एकदा बर्फात खड्डे करून स्टोव्ह पेटवले होते .५४ लोकांच्या १०८ भाकऱ्या तिने थापल्या .सरांनी भाजल्या .शिवाय सोबतच्याची सेवाही केली .या अपघातात मात्र तिची फालोपियन ट्यूब खराब झाली .लग्नानंतर मूल होताना हे कळले .कृत्रिम गर्भधारणेचा प्रयत्न केला ,पण जीवावर बेतले .खूप त्रास झाला .म्हणून पतीपत्नींनी मूल दत्तक घ्यायचा विचार केला. सहा महिन्याचे बाळ दत्तक घेतले .दोन महिन्यांनंतर कोर्टाची ऑर्डर आली . ‘मूल परत करा ! ’ कारण अंध व्यक्तीला मूल दत्तक घेता येत नाही .तेव्हा वकील न करता नेहा स्वतः लढली .तिला विचारलं ,मूल शाळेत गेल्यावर तू त्याला कशी शोधशील ? ती म्हणाली, ‘अंधांना मुलं होतात ,तशीच मी वाढवीन ! मुलाला मी ओळखायचा प्रश्नच नाही तोच मला ओळखेल !’ कारण दोन वर्षात मुलाला इजा झाली तर अंधावर गुन्हा दाखल करता येतो ,असा नियम आहे .ती म्हणाली ,आवाजाने आई मुलाला ओळखू शकते .मुलाला तुम्ही दाराबाहेर सोडा ,मी हाक मारते .नेहाने आवाज दिल्यावर बाळ रांगत तिच्याजवळ आले .सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अत्यंत हृद्य हेलावणारा प्रसंग ! आणि ….कोर्टाने नेहाच्या बाजूने निकाल दिला .

याचा फायदा आता इतर अंधदाम्पत्यांना होत आहे . ते मूल दत्तक घेऊ शकतात .डोळस व्यक्तीलाही लाजवेल असा हा प्रसंग !
डोळसांसोबतची खालील धाडसे करणारी ही पहिली अंध धाडसी महिला ठरली आहे ! पण असेच साहस करणाऱ्या टीमला बढती मिळाली .हिला मात्र उपेक्षा वाट्याला आली .बरी झाली तेव्हाच एका वेगळ्या उमेदीने उभी राहिली .आता जगायचे तर अंध ,अपंग लोकांसाठीच ! हा निर्धार पक्का झाला होता .
१. लोणावळा ‘ड्युक्स नोज ’३५००फूट रापलिंग ,युगा अड्व्हेन्चर ..
२. जीवधन किल्ला ते खडापारसी २०० फूट नाणेघाटातील व्हालीक्रॉसिंग , व रापलिंग -३००फूट ! हायटेक आद्वेन्चार !
३. पनवेल वळवली धबधब्यातील १२५ फूट अतिशय कठीण वाटरफॉल राप्लिंग ,भरपावसात केले आहे . निसर्गमित्र अद्व्हेन्चर ! या साह्साला तोड़ नाही.
४.२६ जानेवारी २०१४ ड्यूक्स नोज, लोणावळा फ्लाइंग फॉक्स झीप लाईन व्हाली क्रोसिंग १२०० फूट ,हायटेक्स अद्व्हेन्चर !
५.२४ जानेवारी २०१६ हरिश्चंद्रगड कोकण कडा ,टायरोलीअन टूअर्स व्हाली क्रोसिंग
१२०० फूट हायटेक अद्व्हेन्चर्स !
६. सदर दोन्ही विक्रमांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स २०१७ (पान नं.७१) मध्ये घेतली आहे .

हिमालयातील १३,५०० फूट राष्ट्रीयमोहिमेत झोंगरी भागातील १५ अंध महिलांसोबत प्रशिक्षणाचे नेतृत्व नेहाने केले .हिमालयातील पहिल्या अंध व मूकबधीर गिर्यारोहण मोहिमेत यंग झिंगारो ट्रेकर्स सहभागी होऊन १७,२२० फुटावरील क्षितीधर शिखरावर चढली ,हा जागतिक विक्रम लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (१९९४ पान – १७ )मध्ये नोंदवला आहे . ,डलहौसी मोहिमेचे नेतृत्व ,जम्मू-वैष्णोदेवी ट्रेकींग , ११००फुट व्हालीक्रॉसिंग, १२००फूट कोकणकडा लिम्का बुकात नोंद -२०१७ ! अशी -अनेक साहसे नावावर ! फ्रान्स- ब्रावो आंतरराष्ट्रीय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स २०१९ व लंडन वंडर International बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स २०१९. फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्राच्या बुद्धिबळ संघाने झारखंड रांची येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा बुद्धिबळ स्पर्धेच्या सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले .इतर सर्व खेळाडूंसोबत नेहा पावसकर ही एकटीच दृष्टीबाधित खेळाडू होती .विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या संघाचे तिने नेतृत्व केले .११६८ असे रेटिंग असणारी ती एकमेव खेळाडू व कर्णधार होती.

२०१८ साली थायलंड ,बँकोकला ६ अंध महिलांसोबत गोल्फबॉल स्पर्धेत नेहा कोच होती .तत्कालीन मंत्र्यांनी खर्चाचे आश्वासन दिले ,पण अजून पैशांचा पत्ता नाही .
महाराष्ट्रशासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा (गिर्यारोहण) २००५ विशेष पुरस्कार , मान.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते देवून नेहाला गौरवण्यात आले.
१९९८ जायंट क्लब भायखळा ,ऑल राउंडर अचिव्हर पुरस्कार !
१९९९ – नासिओ बेस्ट ट्रेकर्स अवार्ड !
२००४ – झोनाटा इंटरनाशनल वूमन ऑफ द इयर! तसेच आयशा जागतिक
कर्तृत्ववान अंध महिला पुरस्कार !
२००५ –पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरवण्यात आले .
२००६ साली विचारे फौंडेशनचा मराठी गौरव पुरस्कार ! २००७ साली राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले पुरस्कार !
२००८ सालचा आदर्श समाजसेविका अपंग लेखा प्रतिष्ठा पुरस्कार !
२००९ साली NAB नीलम खुर्शीद कांगा ,बेस्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार !
२०१० मध्ये जागतिक अपंग दिनी सर्वश्रेष्ठ कर्मचारी म्हणून राष्ट्रपती पुरस्कार ,
मान .राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
२०१४ -महाराष्ट्र विक्रीकर भूषण पुरस्कार ,राज्यपाल विद्यासागर राव- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते!
२०१४ -कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिकचा गोदावरी पुरस्कार ,
२०१७ –मुंबई महापौर,स्नेहल आंबेकर यांच्याकडून कर्तृत्ववान महिला पुरस्कारप्राप्त!
२०१८- आदर्श समाजसेविका म्हणून महापौर श्री.विश्वनाथ महाडेश्वर ,हस्तेसन्मान !
२०१९ – मुद्राय युवा फौंडेशन – संस्थेतर्फे राज्यस्तरीय मैत्री पुरस्काराने पावसकर दाम्पत्याला गौरवण्यात आले .

आशिया आणि पैसिफिक अंतर्राष्ट्रीय अंध महिला गोल्ह बॉल स्पर्धा ,थायलंड बंकोक येथे अंध महिला संघ ,नेहा पावसकर हिच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला .तर डिसेम्बर २०१९ मध्ये मिलिंद सोमण (कैन्सर अवेअरनेस )आयोजित पिकथोंन स्पर्धेत १०२ अंध महिलानी सहभाग घेउन नवीन जागतिक विक्रम नोंदवला .

नेहाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत .आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ,मैदानी खेळ ,ज्युडो ,व गोल्फ बॉल खेळाडू आहे .तर दिव्यांग जलतरण ,कबड्डी ,क्रिकेट, फूटबॉल , गोल्हबॉल ,मैदानी खेळ ,साउंड बॉल ,लॉंन टेनिस या खेळांची ती दिव्यांगांची प्रशिक्षक आहे .याशिवाय नृत्य ,नृत्यनाटिका ,नाट्यक्षेत्रात देखील आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक तिने दाखवली आहे .सध्या ती ‘ऑल इंडिया अंध स्त्री हित असोसिएशन ’ संस्थेची संस्थापिका असून संस्थेच्या वतीने ,२०१७ साली १४ दिव्यांगांना इंडो –नेपाल आंतरराष्ट्रीय मैदानी खेळ स्पर्धेत सहभागी होता आले .तर २०१८ साली थायलंड , बँकॉक येथे आशिया आणि आंतरराष्ट्रीय गोल्फ बॉल स्पर्धेत अंध महिलांचा भारतीय संघ सहभागी झाला होता .निष्णात प्रशिक्षकांच्या द्वारे ,अंध ,अस्थिव्यंग ,मतिमंद ,व कर्णबधिर –अशा दिव्यांगांना जिल्हा ,राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांसाठी प्रशिक्षित केले जाते .या सर्व धडपडीत पती नलिन पावसकर यांची सदैव साथ असतेच ! म्हणूनच नेहा म्हणते , “ नलिनजी पाहू शकतात ,बघू शकतात ; त्यांच्या डोळ्यांनी मी पहाते .” माझ्या यशाच्या मागे माझे वडील मनमोहन नाईक आणि पती नलिन पावसकर हिमालयासारखे उभे आहेत ; म्हणूनच मला धडपडण्याची प्रेरणा मिळते ,एवढे मात्र नक्की खरे !!

अनेक पुरस्कारांच्या मानकरी असूनही अंधांसाठीची धडपड लक्षणीय आहे. अंधांचा कबड्डीत प्रवेश झाला , वर्ल्डकप क्रिकेट- पुरुषांसाठी झाले , आता प्रयत्न महिलांसाठी सुरु आहे ! इतर अंधांच्या आयुष्यात अशी धडपडीची , आश्वासकतेची ज्योत लावणाऱ्या या साहसदुर्गेला शतशः सलाम !!

शोभा नाखरे

– लेखन : शोभा नाखरे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. नेहाची साहसकथा आणि यशोगाथा दोन्हीही प्रेरक.
    कम्माल…!!
    पंगूं लंघयते गिरीम् …हे खरे करुन दाखवले.

  2. शूर नेहाताईची जिद्द आणि कठोर परिश्रमातून मिळवलेल्या यशाची कथा प्रेरणादायी आहे.शुभेच्छा

  3. डोळस आणि सुदृढ लोकांनाही करता येणार नाहीत असे पराक्रम या नेहाने करून दाखविले.
    ही भारताची खरी शान. ही ऊर्जा,ही प्रेरणा!
    नेहाला माझा मानाचा मुजरा.

  4. नेहाच्या जिद्दीला सलाम. डोळस व्यक्तीलाही लाजवेल अशी दैदीप्यमान कामगिरी. नेहास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🌹

  5. 🌹साहसी नेहा 🌹
    🌹नेहाच अभिनंदन 🌹

    पूर्ण लेख वाचून झाला नं मन सुन्न झालं. एकाच व्यक्तीला नियतीन इतकं दुःख द्यावं ही कल्पना च करवत नाही.
    तरीपण जिद्दीने मात करून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमठवला. कौतुकास्पद. 🌹

    🌹लेखिका शोभा नाखरे, आपले खूप अभिनंदन 🌹

    हरवलेले हिरे आपण दाखवून दिलेत.
    उच्चप्रतीचे लिखाण केलं आपण.
    माननीय. भुजबळ साहेब खूप चांगले विषय घेतात.
    धन्यवाद सर 🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy
    अंबरनाथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments