“मित्र“
आंतरराष्ट्रीय मित्र दिवस नुकताच साजरा झाला. या निमित्ताने खऱ्या मित्राबद्दल एका संस्कृत सुभाषितात काय म्हंटले आहे, ते आजच्या सुभाषित विवेचन मध्ये जाणून घेऊ या.
— संपादक
“आढ्यतोवापि दारिद्रो वा दु:खित:सुखितोsपि वा
निर्दोषश्च सदोषश्च वयस्य परमा गति:”
हा वाल्मिकी रामायणातील श्लोक मित्रांच्या संबंधावर आधारित आहे. मित्र असणे हे सौभाग्याचे लक्षण आणि त्यातही खरा मित्र लाभणे म्हणजे श्रीमंतीच. मित्र आणि खरा मित्र हे माणसाला कसे ओळखता येईल ? त्यासाठीच हा श्लोक आहे. खऱ्या मित्राची ओळख काय ? या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा श्लोक.
आढ्यतोवापि दारिद्रो: श्रीमंती किंवा गरीबी यांचा खरा मित्र कधीच विचार करत नाही. त्याची मैत्री व्यक्तीशी असते. मग त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याकडे तो बघतही नाही किंवा त्यांच्या लेखी ते महत्त्वाचे नसते. व्यक्ती बघून जी मैत्री होते ती निखळ असते. त्यात स्वार्थाला यत्किंचितही जागा नसते. स्वार्थहीन अशी मैत्री आपण बघितली आहे, ती म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची. सुदामाला कृष्णाच्या श्रीमंतीशी काही देणं घेणं नव्हतं तर कृष्णाला सुदामाच्या अकिंचनपणात काही वावगं वाटलं नाही किंवा सुदामा इतका गरीब आहे मग तो माझा मित्र आहे हे कळल्यावर जग म्हणेल. तो माझ्या बरोबरीचा नसल्याने मला कमीपणा येईल हे विचारही कधी कृष्णाच्या मनात फिरकले नाहीत.
खरा मित्र हा असाच असतो. तो बाह्य परिस्थितीकडे लक्षच देत नाही त्याच्या मनाचे तार जुळतात ते अंत:करणाशी. ती श्रीमंती त्याला भूल घालते आणि त्यातच रमून दोन व्यक्ती मित्र होतात.

दु:खितो सुखितोsपिवा :
मित्र आपल्या मित्रांची साथ कधीच सोडत नाहीत. दु:खातही आणि सुखातही. सतत हा दुःख उगाळत बसतो असं न म्हणता तो आपल्या मित्राच्या दु:खाच्या मुळाशी जाऊन ते दूर कसे करता येईल हा प्रयत्न करतो.
दुर्योधन नेहमी कर्णाबरोबर होता. त्याची खंत, त्याचं शल्य हे दूर करून त्यांच्या मनाला उभारी देण्याचं काम तो करित असायचा. तसंच कर्णही त्यांच्यासाठी धावून जायचा. आपण कुंतीपुत्र आहोत हे कळल्यावर कर्ण दुर्योधनला सोडून गेला नाही. त्यात आईने दुर्लक्षित करून, जगाला घाबरून आपल्याला सोडल्याचे अनिवार दु:खामुळे त्याला आनंद झाला नाही असं नाही पण मला माझा मान मिळवून देणाऱ्या मित्राची साथ अशा युद्धजन्य परिस्थितीत न सोडण्याचा आदर्श विचार हा मुख्यत्वेकरून होता. सूतपुत्र म्हणून हिणवल्यावर अंगदेशचा राजा म्हणून ओळख देणाऱ्या मित्राला सोडणं त्याच्या मनाच्या सूक्ष्म कोपऱ्याला ही स्पर्श करत नव्हतं. असं मलातरी वाटतं.
सुखाच्या स्थितीतही मित्र सोबत असतात. यशाची पायरी चढताना बघून पाय न खेचता त्याला पुढे वाढण्याची प्रेरणा देणारे मित्र असतात.
निर्दोषश्च सदोषश्च :
मित्राला गुण दोषांसह, तो जसा आहे तसाच्या तसा स्वीकारणारा खरा मित्र असतो. असा मित्र आपल्या मित्रात असलेले दोष जगासमोर उघड न करता ते दूर करण्यासाठी मदत करतो. चांगले सल्ले देऊन त्यांवर मात करण्यास मदत करतो. उगाच दोष दाखवून त्यावर हसत बसण्यापेक्षा मी तुझाच आहे असा आश्वासक हात खांद्यावर ठेवतो.
जर मित्र चुकत असेल तर कधी मधातून कडू औषध दिल्या प्रमाणे तर कधी रोग नष्ट व्हावा म्हणून इंजेक्शन दिल्याप्रमाणे त्याच्या चुका दाखवतो. हे करत असता मित्राला खाली दाखवण्याचा किंवा त्याचे पाय खेचण्याचा विचार ही शिवत नाही.
वयस्य परमा गति :
मित्र म्हणजे आनंदाची परिसीमा, मित्र म्हणजे दुसरं हृदय, मित्र म्हणजे अमृत कुंभ, मित्र हा अनुपमेय.
मैत्रीचं खूप सुंदर उदाहरण एका संस्कृत श्लोकात दिलं आहे. त्यात दूध आणि पाणी यांचे व्यवहार सांगितले आहेत.
दूध तापत असताना पाणी वर वर जायला लागतं आणि आपल्या मित्राला संकटात बघून दूधही त्याच्यासोबत वर जाऊ लागतं.
अशी मित्रता, असा मित्र ज्याला लाभला असेल त्याला दुसरं कोणतंही धन तुच्छ वाटणं स्वाभाविक आहे. मैत्री एकच आत्मा आहे जी दोन शरीरात निवास करते.

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

आ. राधा गर्दे ताई ह्यांची मैत्री पूर्ण लेखन खूप सुंदर आहे