Monday, September 1, 2025
Homeकलास्नेहाची रेसिपी : २६

स्नेहाची रेसिपी : २६

“पालक टिक्की चाट”

आपल्याकडे नेहमीच ताज्या, हिरव्यागार पालेभाज्या उपलब्ध असतात. त्या पाहिल्या की घेण्याचा मोह आवरत नाहीच अन
पालेभाज्या तब्येतीसाठी किती आवश्यक असतात हे तर सर्वांना माहिती आहेच, पण मुलांना हे समजत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा मुले पालक, मेथी, राजगिरा, अशा पालेभाज्यासुद्धा खायला तयारच होत नाहीत. अशा वेळी जर त्यांना आवडेल अशा प्रकाराने त्या खाण्यास दिल्या तर नक्कीच आवडीने खातील. म्हणूनच आज अशीच एक दिसायला एकदम आकर्षक, खायला चटपटीत, अशी “पालक टिक्की चाट” आपण बनवू या.

साहित्य :
1 मोठी पालक जुडी, 1 चमचा धनेजिरे पावडर, अर्धा इंच आलं, 7..8 लसूण पाकळ्या, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हळद, 5..6 हिरव्या मिरच्या, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदुळाची पिठी, चवीनुसार् मिठ, तेल, चटपटीत चवीसाठी व आकर्षक दिसण्यासाठी वरून घालण्यासाठी चिंचगुळाची चटणी केली. गोड दही चाट मसाला व बारीक शेव.

कृती :
पालक निवडून स्वच्छ धुवून थोडासा मोठा चिरून घ्यावा. मग त्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्या बारीक वाटून घालव्यात. नंतर त्यात हळद, तीळ, धणेजिरे पावडर घालून व्यवस्थित मिक्स करावे. आता त्यात बेसन आणि पिठी घालून चवीनुसार मीठ घालावे व सर्व छान एकत्र करावे. मग लागेल तसे अगदी थोडे पाणी घालत त्याचा घट्ट गोळा बनवावा. कारण मिठामुळे त्याला पाणी सुटते. मग हातांनी तेल लावून त्याचे 2 लांबट रोल बनवावेत. मोदकपात्रात किंवा कढईमध्ये एक.. दीड ग्लास पाणी घालून त्यात रिंग किंवा वाटी ठेवून त्यावर स्टीलची चाळणी ठेवावी. त्यावर हे रोल ठेवून वर झाकण ठेवून मोठ्या आचेवर 7..8 मिनिटे वाफवून घ्यावेत.आता ते मस्त वाफवले गेले असतील. ते बाहेर काढून थोडे थंड झाले की त्याच्या चकत्या कराव्यात. या चकत्या तशाच सुद्धा त्यावर चाट मसाला आणि चिंचगुळाची चटणी घालून खाल्ल्या तरीही खूपच टेस्टी लागतात.

आता गॅसवर शालोफ्राय करायचे असेल तर नॉनस्टिकच्या तव्यात थोडे तेल घालून त्यावर या टीक्क्या छान फ्राय कराव्यात. यामुळे हिरवागार रंग थोडासा बदलतो, पण टेस्ट खुपच् वाढते आणि डिप फ्राय करायचे असेल तर कढईत तेल घालून व्यवस्थीत रंग बदलून क्रिस्पी होईपर्यंत तळावेत. मग चाळणीत किंवा टिश्यू पेपर वर काढून घ्याव्यात. शेवटी सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यावर गोड दही, चाट मसाला, असल्यास डाळिम्ब दाणे, चिंचगुळाची चटणी, बारीक शेव घालून सर्व्ह करावी.

वैशिष्टय :
पालकाचे असंख्य गुणधर्म असल्यामुळे तो पौष्टीक आणि तब्येतीसाठी उपयुक्त आहेच. त्यातील फोलेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारख्या खनिजांनी परिपूर्ण असल्यामुळे आणि प्रथिने, जीवनसत्वे, फायबर्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराच्या वाढीसाठी, विशेषतः मुलांसाठी खूपच उपयुक्त आहे. फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते. पालकाच्या सेवनामुळे रक्तदाब नियंत्रित होतो, मधुमेहिंसाठी रक्तातील साखर नियंत्रित करत असल्याने एक वरदानच आहे जणू. यातील कॅलशियम मुळे हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. असे खूप सारे फायदे पालकामुळे आपल्याला होतात. त्यातून अशी नवीन सुरेख, टेस्टी, आणि आकर्षक, डिश खाऊन तर ‘वाहवा’ ची दाद तर नक्कीच मिळणार.

याच प्रकारे आपण पालेभाज्या, कोथिंबिरीच्या, गाजर, बिट, दुधी भोपळा यासारख्या भाज्यांच्याही सुरेख आणि पौष्टीक टिक्की बनवू शकतो. चिंचगुळाची चटणी, शेव वगैरे न घालतासुद्धा हि गरम गरम टिक्की खुप छान लागते. भाज्या वेगवेगळ्या स्वादाच्या असल्याने प्रत्येकाची टेस्ट वेगळीच लागते. त्यामुळे आता गृहिणींना दररोजचा नाश्ता, मधल्यावेळी, स्टार्टर म्हणून काय करावे याचा मोठा प्रश्न थोडा तरी सुटला ना ? नक्की कळवा.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments