मस्त बर्फी
आज आपण मस्त बर्फी ची रेसिपी पाहू या. विशेष म्हणजे ही बर्फी उपवासाला देखील चालते.
मनापासून बनवलेल्या या खास बर्फीचा सुंदर रंग, स्वाद पाहूनच कुणीही तृप्त होईल आणि भरभरून आशीर्वाद देईल यात शंकाच नाही.
मग लागायचे ना लगेंच तयारीला…..
साहित्य :
1 वाटी साबुदाणा, 2 वाट्या मखाणे, सव्वा वाटी साखर, अर्धी वाटी दुध, पाव वाटी कंडेन्स्ड मिल्क, पाव वाटी फ्रेशक्रिम किंवा मलाई, 1 चमचा वेलचीपूड, पाव वाटी काजू, बदाम, पिस्ते यांचे काप, केशर .. असल्यास, 2 चमचे साजूक तूप.
कृती :
प्रथम साबुदाणा मंद गॅसवर छान लाही होईपर्यंत परतावा. मग किंचित तूप घालून मखाणे भाजावेत. ते थंड झाले की खूप कुरकुरीत होतात. त्यानन्तर खवा सुद्धा थोडा भाजुन ठेवावा. मग मिक्सर मधून साबुदाणा आणि मखाण्याची पूड करून घ्यावी.
आता गॅस वर कढई ठेवून त्यात साजूक तूप घालून थोडेसे परतावे. मग त्यात दूध व थोडेसे केशर घालून छान मिक्स करून परतत रहावे. त्यात साखर घालावी व ती विरघळे पर्यंत हलवत राहावे. थोडे घट्ट होत आले की त्यात खवा मिक्सर मधून थोडा फिरवून मग तो व फ्रेश क्रीम घालून पुन्हा छान घोटावे. मिक्सर मधून काढल्यामुळे खवा छान मोकळा होतो व त्याच्या लगेच गाठी होत नाहीत. मग शेवटी कंडेन्स्ड मिल्क घालून परतावे व वेलचीपूड घालुन छान मिक्स करत व्यवस्थित परतावे. तुपामुळे व खव्यामुळे, तूप सुटल्यामुळे मस्त चमक येते की तो या मिश्रणाचा गोळा झाला की एका ट्रे ला तूप लावून त्यावर थापावा व त्यावर सजावटीसाठी ड्रायफ्रुट्सचे तुकडे, केशर घालून हलकेच थापावे म्हणजे घट्ट बसतील. त्यानंतर सुरीने वड्या कापाव्यात व थंड झाल्या की काढून ठेवाव्यात.
वैशिष्ट्य :
ही बर्फी बरेच दिवस छान राहते. त्यामुळे आधी करून ठेवली तरी चालते. मखाण्यात खुप प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि अनेक पोषक द्रव्यें असतात जी आपल्या शरीरासाठी ऊर्जा , उत्साह देतात त्यामुळे उपवासाच्या दिवसात तरी आवर्जून खाल्ल्यास खूप फायदा होतो. शरिरातील उष्णता वाढत नाही, शिवाय खवा, दूध, मिल्कपावडर, तूप यामुळे स्निग्धता मिळते व ड्रायफ्रुट्समुळे पौष्टिक सुद्धा आहे. खूपच आकर्षक व टेस्टी होते. नक्की करून पहा.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800