Sunday, January 25, 2026
Homeकलास्नेहाची रेसिपी : ४४

स्नेहाची रेसिपी : ४४

“तीळगुळ वडी”
संक्रांतीच्या थंडीच्या पर्वात उष्ण तीळ आणि गुळाची वडी म्हणजे मेजवानीच ! तिळाचा स्निग्धपणा आणि गुळाची गोडी आणि उष्ण गुणधर्म यामुळे तब्येतीसाठी खूपच उत्तम आणि चवीला तर इतकी सुरेख की कित्ती खाल्ली तरी मोह आवरता येतच नाही.

संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यन्त घरोघरी तिळगुळाचे चिक्की, रेवडी, गजक, पोळ्या, कडक.. मऊसूत वड्या, लाडू असे कित्तीतरी पदार्थ बनवून आवडीने खाल्ले जातात. तीळाचा खमंग स्वाद, स्निग्धता तसेच गुळाची गोडी आणि उष्णता हीअतुट जोडी आहे. थंडीच्या या दिवसात शरीरासाठी खूप गरजेची असते. अनेक प्रकारांनी तिळगुळ बनवतात. कसाही बनवला तरी छानच होतो. आज आपण सॉफ्ट गजक सारख्या खुसखुशीत वड्या बनवू .चला मग…

साहित्य :
1 वाटी तीळ, 1 वाटी चिरलेला गूळ, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा वेलची पूड, 2 चमचे खोबऱ्याचा खिस, आवडत असेल तर 1 चमचा शेंगदाण्याचा कुट.

कृती :
प्रथम गॅसवर एका कढईत तीळ गुलाबी होऊन खमंग होईपर्यंत छान भाजावेत. मग ते थोडेसे थंड झाले की मिक्सर मधून फक्त व्हायपर वर अगदी थोडे थोडे फिरवून जाडसर पावडर होईपर्यंत फिरवावी.
आता कढई मध्ये गूळ घालून पाव वाटी पाणी घालून गॅसवर मध्यम आचेवर पाक होण्यासाठी ठेवावा. थोडे पातळ होऊन पाक होऊ लागला की 1 चमचा तूप घालून सतत हलवत राहावे. आधी सर्व गूळ वितळून पातळ होईल मग हळू हळू त्याला पांढरे बुडबुडे बाजूबाजूने येऊ लागतील. नंतर त्याचा रंग बदलायला लागून लालसर बनायला लागेल. गॅस एकदम मंद करून एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात 1 थेंब पाक टाकावा. तो न विरघळता घट्ट होऊन बोटांनी त्याची गोळी बनली की पाक गोळीबंद झाला म्हणजेच तयार झाला. आता गॅस बंद करून कढई खाली काढुन घ्यावी म्हणजे पाक जास्त घट्ट होणार नाही. मग त्यात पुन्हा 1 चमचा तूप घालून तीळाचे कुट, दाण्याचे कुट घालून 1 चमचा खोबऱ्याचा कीस घालून वेलची पूड घालावी आणि भराभर व्यवस्थित घोटावे व एकजीव करावे. तुपामुळे छान चमक तर येतेच पण स्वाद पण मस्त येतो.

शेवटी एका ट्रे ला तुपाचा हात लावून त्यात हे कढई मधील मिश्रण घालून लगेच व्यवस्थित पसरावे.थोडेसे जाडसर पसरावे म्हणजे वड्या छान दिसतात आणि खायलाही छान लागतात. वरून बाकीचा खोबऱ्याचा कीस पसरून घालावा व पुन्हा घट्ट चिकटावा म्हणून थोडासा दाबावा व चौकोनी आकाराच्या वड्या सुरीने पाडाव्यात, थंड झाल्यावर व्यवस्थित सावकाश काढून ठेवाव्यात.

वैशिष्ट्य :
या वड्या गजक सारख्या टेस्टी खुसखुशीत मऊ लागतात. भरपूर दिवस छान राहतात. वेलदोडे थोडे जाडसर कुटून घातले तर मधेच दाताखाली आले तर खाताना खुप मस्त वाटते. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता व स्निग्धता आवश्यक असते. ती यामधून मिळते आणि चविष्ट असल्यामुळे सर्वांनांच मनापासून खूप आवडतात. मऊ बनत असल्यामुळे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. संक्रांत ते रथसप्तमी पर्यन्त कधीही, तसेंच हळदी कुंकवासाठीही या खास बनवाव्या. एरव्हीसुद्धा मधल्यावेळी काहीतरी झटकन खावेसे वाटते, अशावेळी विशेषतः लहान मुलांसाठी खास बनवाव्यात.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments