असणं आणि दिसणं या दोन्हीचंही घट्ट नातं लहानपणापासून आपल्या मनावर ठसलेलं असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीबाबत जे दिसत नाही ते नाही, अशी आपली पहिली प्रतिक्रिया असते. त्यानंतर आपल्यावर संस्कार होतात की जे दिसत नाही ते सुद्धा असतं आणि त्याचं उदाहरण आपल्याला दिलं जातं ते म्हणजे देव. मग जो कोणालाच दिसत नाही तो कसा असेल? हा प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून गोष्टींची रचना केली जाते. त्यातून काही व्यक्तींना तो दिसतो असे सांगितले जाते. त्यामधून पाप-पुण्य भक्ती या श्रद्धेय संकल्पना निर्माण केल्या जातात. या श्रद्धेय संकल्पनांतून पुढे अंधश्रद्धा निर्माण होतात. अंधश्रद्धांचं मूळ कारण म्हणजे श्रद्धेय संकल्पनांतून प्रश्नांचं दमन होणे. प्रश्नच निर्माण होऊ नयेत यासाठी आधीच तयार केलेली उत्तरे मनावर ठसवणे. प्रश्नांचे दमन करण्यासाठी आधीच ठरवलेल्या उत्तरांचा एका विशिष्ट पद्धतीचा संच म्हणजे धर्म.
एखादी गोष्ट आहे किंवा नाही हे कुणालाच माहीत नाही. तरीसुद्धा ती गोष्ट आहे हे कौशल्यपूर्ण शब्द रचनांतून आणि त्याच्या सादरीकरणातून सिद्ध करता येणं हे महत्त्वाचं. जो धर्माचा प्रवक्ता असतो त्याचं कौशल्य हेच असतं की त्याला सुद्धा माहीत नसलेली गोष्ट तो,आहे असे भासवणारी सिद्धता काही लोकांना पटेल अशा पद्धतीने मांडू शकतो. कधी कधी मनासमोर भासमान दृश्ये उभी करून त्यातून ती गोष्ट ठसवली जाते. पूर्वी ती गोष्ट कीर्तनकार वा तत्सम व्यक्ती करत असत. सध्या ती गोष्ट नाटक / सिनेमाच्या माध्यमातून किंवा इतर तत्सम माध्यमातून भासमान दृश्ये निर्माण करून करता येते. हवा आपल्याला दिसते का? नाही. पण ती आहे. त्याचप्रमाणे ईश्वर सगळीकडे भरून राहिला आहे, असा युक्तिवाद केला जातो. अशा तऱ्हेचे वेगवेगळे युक्तिवाद करून प्रश्नांची उत्तरे भासमान पद्धतीने निर्माण केली जातात. त्या उत्तराने सर्वसाधारण माणसाचे समाधान होते. समाधान झाले की त्या पद्धतीच्या उत्तरांचा जो एक विशिष्ट संच असतो त्याची उपासना हीच सर्वथैव योग्य आहे अशी श्रद्धा काही लोकांच्या मनात निर्माण होते. प्रत्येक व्यक्तीचा श्रद्धेचा स्तर ज्या प्रकारचा असतो त्या प्रकारे त्याला उत्तरे देऊन त्याचे समाधान करणे हे धर्मप्रवक्त्यांचे कौशल्य असते. कोणत्या स्तरावरील व्यक्तींना समाधान देता येते यावरून त्या धर्मप्रवक्त्यांचे स्तर ठरतात. तो तो धर्मप्रवक्ता त्याच्या स्तरातील व्यक्तींना नादाऊ शकतो किंवा फसवू शकतो. न दिसणारी गोष्ट म्हणजे जशी ईश्वर असू शकते तशी भूतही असू शकते.
अशा पद्धतीने एक भीती एका विशिष्ट स्तराच्या खालील लोकांना दाखविली जाते. मग त्या पद्धतीच्या श्रद्धेमध्ये गुंडाळलेल्या व्यक्तींचे शोषण करणे त्याला सहज शक्य होते. शोषणाचे मूळ भीती हे असते.
नेहमीच्या व्यवहारात पहायचे झाल्यास कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी अनेक वेळा कायद्याचा अर्थ मी माझ्या मनाप्रमाणे लावून तुमचे वाईट करू शकतो ही भीती दाखवून लोकांकडून आर्थिक शोषण करताना आपण नेहमीच पाहतो. प्रामाणिक पुढारी मंडळींपैकी सुद्धा लोकांना अशी भीती जो दाखवू शकत नसेल त्याला त्यांचे शोषण करता येत नाही. पुढाऱ्यांचा शोषणाचा स्तर वेगळा असतो. अनेक वेळेला ते वेगळ्या युक्ती प्रयुक्तीने भीती दाखवून शोषण करण्याचे सामर्थ्य बाळगतात.
एखादी व्यक्ती भीतीला जास्तीत जास्त किती बळी पडू शकते त्याच्या मर्यादे इतके त्याचे शोषणमूल्य असते. हे शोषणमूल्य जो जाणू शकतो आणि त्या शोषणमूल्याच्या मर्यादेच्या आतच शोषण करू शकतो तो यशस्वी शोषक असतो. शोषण मूल्याच्या जास्ती प्रमाणात शोषण करण्याची हाव, शोषकाला जेव्हा सुटते तेव्हा शोषिताला आपण फसवले गेलो याची जाणीव होऊ लागते. अशा शोषितांना हाताशी धरून शोषकांची भांडा फोड करता येते. पण कधी कधी शोषकांना सर्वस्व गमावून सुद्धा आपले शोषण झाले आहे याची जाणीव होत नाही. पूर्व संचिताचे परिणाम किंवा ईश्वराचा कोप अशा तऱ्हेची तयार संचातील उत्तरे देऊन त्याला त्या उत्तरांच्या नशेमध्ये शोषण झाल्याची जाणीव भासू न देण्याची कला उच्च दर्जाच्या शोषकां मध्ये असते.
सर्वात उच्च दर्जाचे शोषक हे कधीच आर्थिक शोषण करत नाहीत. शोषिताच्या मन आणि बुद्धी यावर प्रथम कब्जा करतात. असा कब्जा मिळवल्यावर त्यांना काहीच करावे लागत नाही. शोषित स्वतःहून शोषका कडे अपेक्षित गोष्टी आणून देतो आणि शोषकाने त्या त्या स्वीकारल्याबाबत तो स्वतःला धन्य समजतो. असे शोषक स्वतःला ईश्वराचे दूत, ईश्वराचे अवतार कधी कधी स्वतःच ईश्वर अथवा ईश्वराचा अंश असल्याचे भासवतात. अनंत या शब्दाचा अर्थही न समजू शकणारे शोषित अशा व्यक्तींना अनंत कोटी ब्रम्हांडनायक अशा उपाधी लावतात.
विज्ञानाने सिद्ध करणे, त्याच्या कसोट्या काय आणि त्याचे मार्ग कोणते याबाबत सर्वसामान्यांना काहीच माहिती नसते. त्यामुळे ही गोष्ट विज्ञानाने सिद्ध झाली आहे अशी सर्रास विधाने करून स्वतःच्या सामर्थ्याला बळकटी आणतात. ही गोष्ट विज्ञानाने सिद्ध झाली आहे असे स्टेटमेंट करणाऱ्या व्यक्ती अनेक वेळा याबाबत विज्ञानाने काय आणि कसे सिद्ध झाले आहे हे सांगू शकत नाहीत. काही व्यक्ती हे सांगण्यासाठी इंटरनेटवरील काही गोष्टींचा दाखला देतात. खरं म्हणजे आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर इतक्या असंख्य पोस्ट आहेत, इतका प्रचंड मजकूर आहे की तुमचे कोणतेही विधान सिद्ध करण्यासाठी त्याला पुष्टी देणारे अनेक प्रयोग अनेक निष्कर्ष आणि अनेक विधाने करणाऱ्या व्यक्ती या त्यावर सापडतील. त्यामुळे अमुक साइटवर जा तमुक माणसाने अमुक वेळेला केलेल्या संशोधनामधून हे सिद्ध होते हे तुमच्या लक्षात येईल. असे विधान पहाताना मजा वाटते. कारण बरोबर त्याच्या विरोधी विधान करणारा सुद्धा अशाच पद्धतीने वेगवेगळे दाखले देऊन त्याचे मत सिद्ध करून दाखवतो. दोन विरोधी मते विज्ञानाने सिद्ध झाली आहेत असे जेव्हा सिद्ध होत असते तेव्हा कोणतीतरी सिद्धता किंवा दोन्हीही सिद्धता चुकीच्या असतात हे नक्की.
आपल्याला साध्य काय करायचे आहे हे आधी ठरवून त्याप्रमाणे सिद्धता तयार करून प्रयोगात्मकता दाखवता येते हे अनेक वेळेला आपण पाहतो. लहान मुलांना आपण एक गंमत दाखवतो दोन कान खाली ओढले की जीभ बाहेर निघते आणि दोन कान वर ओढले कि जीभ आज जाते. त्यामुळे कान ओढण्याचं आणि जिभेचं काही नातं आहे हे त्या लहान मुलाच्या मनावर ठसून त्याला गंमत वाटते. आपले तसे होत नाही हे त्याच्या लक्षात आले तरी समोरच्या माणसाचे होते म्हणजे तो काहीतरी विशेष आहे हे सुद्धा ठसवता येते. असेच सर्वसामान्य माणसांना काही बुद्धिमान व्यक्ती किंवा व्यक्तींचे शिष्य अशा तऱ्हेने दिशाभूल करू शकतात आणि आपल्या कळपात ओढू शकतात.
कोणत्या प्रवक्त्याची प्रभाव पाडण्याची कला किती आहे यावर सर्व अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट समूहाच्या प्रवक्त्याने भारून गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या समूहाच्या त्यापेक्षा हुशार प्रवक्त्याला सामोरे गेल्यावर त्याचेही पटू लागते. मग तो त्याच्या मार्गाने जातो. याला आपण स्वेच्छेने धर्मांतर असेही म्हणू शकतो. कधी कधी एका धर्मात अनेक कळप असतात तेथे कळपांतर होऊ शकते. या सर्व गोष्टींमध्ये आपल्या दृष्टीवर आपल्या कानांवर किंवा आपल्या पंचेंद्रियांवर आपल्या बुद्धीपेक्षा जास्त विश्वास असेल तेव्हा हे शक्य होते.
विज्ञानाच्या कसोट्या काय आहेत याचा किती जण अभ्यास करतात हे महत्त्वाचे. बऱ्याच वेळेला अनुभवातील सातत्य, बुद्धी मधील तर्कशीलता, प्रयोगातील अचूकतेबद्दल मांडलेली गणिते आणि विविध दिशेने आणि विविध पद्धतीने विचार करणाऱ्या तर्कबुद्धिवान जनसमुहाला (म्हणजेच तज्ञ शास्त्रज्ञांना) जेव्हा हे सर्वमान्य होते तेव्हा ते सत्याच्या जवळ असलेली वस्तुस्थिती म्हणून मान्य करता येते.या पद्धतीच्या विचारसरणीला आणि त्यातून उद्भवलेल्या तत्त्वज्ञानाला विज्ञान म्हणावे लागते.
दुसरा एक प्रकार म्हणजे विज्ञानाला याचे उत्तर माहित नाही किंवा विज्ञान याचे उत्तर देऊ शकतो का? आणि जर ते उत्तर देऊ शकत नसेल तर मी म्हणतो तेच बरोबर. हे एक वेगळेच तर्कदुष्ट विधान. एवढ्या महाप्रचंड अनंत पसरलेल्या विश्वामध्ये विज्ञानाला समजलेल्या गोष्टी या फारच थोड्या किंवा नगण्य आहेत हे विज्ञान नेहमीच मान्य करत आले आहे. परंतु विज्ञानाला समजले नाही तरीही एका विशिष्ट विचारसरणीतून ते समजले असल्याचा दावा करणे हा आणखी एक अजब प्रकार.
पूर्वी फार सोपं असायचं. मी पाहिलं ते सत्य. जे दिसलं ते खरं. इतकं ते साधं सोपं होतं. ज्ञानाच्या कक्षा विस्तारत गेल्यानंतर मग ते अवघड होत गेलं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. अशासारखे वाक्प्रचार सुद्धा त्यातून निर्माण झाले. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे खरंच आहे. पण त्यामुळे अनेक फसवणारे जन्म घेऊ लागले. कोण किती काळ किती जणांना फसवू शकतो यावर त्या माणसाचे श्रेष्ठत्व सिद्ध होऊ लागले. जादूगार जे प्रयोग जादूचे म्हणून सिद्ध करून दाखवत असत तेच प्रयोग वेगळ्या पद्धतीने सिद्ध करणाऱ्याला सिद्ध पुरुष म्हणून मान्यता मिळू लागल्या यालाच अंधश्रद्धा म्हणू लागतो. तरी तो अंधश्रद्धाळू माणूस त्याला श्रद्धा म्हणू लागला. म्हणूनच अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामधला फरक नष्ट होत गेला. अंधश्रद्धा ही वस्तुस्थिती मध्ये असते आणि श्रद्धा ही मनामध्ये असते. मन आणि वस्तुस्थिती, तरल स्थिती आणि बाह्यस्थिती किंवा कल्पना आणि प्रत्यक्ष कृती. यामधील फरक करणे जेव्हा शक्य होत नाही तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक समजू शकत नाही.
बऱ्याच वेळेला एका बाबतीत तर्कबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टी बाळगणारा माणूस दुसऱ्या एखाद्या बाबतीत अंधश्रद्धाळूपणे वागू शकतो. नव्हे वागतोच ! या विरोधाभासाचा अनुभव कित्येकदा येतो. त्यासाठी न्यूटनची गोष्ट नेहमी सांगितली जाते. दाराला छोट्या मांजरासाठी छोटे भोक आणि मोठ्या मांजरासाठी मोठे भोक पाडण्याची गोष्ट आपण सर्वजण जाणतोच. या सर्व विरोधाभासांनी व्यक्तीचे आयुष्य भरलेले असते. त्या विरोधी वर्तणुकीला तार्किक कारण देता येत नाही. मन आणि विचार यांचे वस्तुस्थिती आणि आचार यांच्याशी तादात्म्य असणे ही फार क्वचित दिसणारी गोष्ट आहे. म्हणूनच म्हटले जाते,
‘बोले तैसा चाले
त्याची वंदावी पाऊले’
शाळेमध्ये असताना प्रमेय सोडवणे हा एक गणितातला प्रकार असायचा. त्यासाठी तीन गोष्टी क्रमवार असायच्या.
पहिली गोष्ट पक्ष. म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यासाठी आपणाकडे कोणती साधने आहेत?
दुसरी गोष्ट साध्य. म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे ?
तिसरी गोष्ट सिद्धता. आपल्या हातातली साधने आणि गृहीतके वापरून आपल्याला जे सिद्ध करायचे आहे ते आपण विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट क्रमाने जाऊन अंतिमत: आपण साध्या पर्यंत पोहोचायचे असते.
कधी कधी हे प्रमेय सुटत नाही. प्रमेय सुटत नाही याचा अर्थच असा की तीन पैकी कुठेतरी एका ठिकाणी आपण कमी पडतो. आपल्या हातात एक तर साधने कमी आहेत. किंवा आपली सिद्धता म्हणजेच पद्धत चुकीची आहे. पण तेव्हा आपल्याला साध्य हे चुकीचे असेल असे कधीच सांगितले जात नाही. विज्ञानात मात्र अनेक वेळेला अशीही शक्यता गृहीत धरावी लागते की जे साध्य आहे ते सुद्धा चुकीचं असू शकेल.
परंतु ज्यांच्या मनाशी साध्य हे सत्य आहे असा ठाम विश्वास असतो. ते पक्ष आणि सिद्धता यांनाच चूक ठरवतात. ज्यांना स्वतःच्या सिद्धतेवर म्हणजेच तर्कबुद्धी आणि पद्धती यावर विश्वास आहे ते साध्य चुकीचे ठरवतात. ज्यांचा या दोन्हीवरही विश्वास आहे ते पक्ष म्हणजेच हाताशी असलेली साधने अपुरी आहेत हे नक्की करतात. कोणत्यातरी एका गोष्टीवर 100% ठामपणे विश्वास ठेवून बाकीच्या दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही पैकी एक गोष्ट चूक ठरवणे हेच अनेक वेळेला घडत असते. पण मी गृहीत धरलेली गोष्टच मुळात चुकीची असू शकेल हे मात्र कोणी लक्षात घेत नाही. विज्ञान मात्र या तीनही गोष्टी पैकी कोणतीही गोष्ट चुकीची असू शकेल ही शक्यता नेहमीच गृहीत धरते. हाच अंधश्रद्धा आणि वैज्ञानिकता यामधील फरक आहे.
कधी कधी मला असं वाटतं ईश्वरीय संकल्पना आणि वैज्ञानिक संकल्पना या दोन्ही वेगळ्या नाहीतच परंतु त्या दोन्ही समांतरपणे अनंतापर्यंत एक दिशेने जाऊन अनंतामध्ये एकमेकात विलीन होतात. परंतु तोपर्यंत विज्ञानाच्या सहाय्याने सुद्धा आणि ईश्वरीय संकल्पनेच्या सहाय्याने सुद्धा फसवणूक करून लोकांचे शोषण करणे हा अनेकांनी स्वार्थापोटी स्वीकारलेला व्यवसाय असतो. या व्यवसायातून एकमेकांच्यावर कुरघोडे करण्याच्या भावनेतून वैज्ञानिक आणि ईश्वरीय संकल्पनांना एकमेकांचे शत्रू ठरवले जाते आणि त्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेतली जात असते. अनेक जण मला म्हणताना आढळले की शेवटी आईन्स्टाईनने सुद्धा देव मानला होता. म्हणूनच ही संकल्पना जास्त स्पष्ट करण्यासाठी आईन्स्टाईनचा देव म्हणजे काय हे या लेखाअंती पहाणे उद्बोधक ठरेल असे मला वाटते.
आईन्स्टाईन अमेरिकेतील कित्येक विद्यापीठांमध्ये विविध परिषदांना जात असत, तेव्हा विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारत. त्यात वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे,
“तुमचा देवावर विश्वास आहे का?” यावर त्यांचे नेहमीचे उत्तर असायचे,
“माझा स्पिनोझाच्या देवावर विश्वास आहे.”
बरूच डी स्पिनोझा हे सतराव्या शतकात पोर्तुगीज- ज्यूईश मूळ असलेले एक डच तत्त्वज्ञ होते. ते आणि रेनी डेकार्टस हे दोघे त्या काळातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवादी विचारवंत मानले जात.
स्पिनोझा यांनी जी देव संकल्पना मांडली तिचे स्वरूप खालीलप्रमाणे सांगता येईल…
“देव असता तर मानवाला म्हणाला असता,
हे उठसूठ प्रार्थना करणं आणि पश्चात्तापदग्ध होऊन आपली छाती बडवणं आता पुरे झालं… थांबवा ते.
या जगात तुम्ही मनसोक्त हिंडा, नाचा, गा, मजा करा.
मी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटा, एवढंच मला अपेक्षित आहे.”
“त्या उदास काळोख्या आणि थंडगार मंदिरात जाणं आधी बंद करा.
खरंतर ती तुम्हीच बांधलेली आहेत,
आणि त्याला तुम्ही म्हणता की ही देवाची घर आहेत !
माझी घरं असतात डोंगरदऱ्यांत, रानावनांत, नदी-नाल्यांवर, समुद्रकिनाऱ्यांवर !
तिथे राहतो मी आणि तिथे राहून तुमच्यावरच प्रेम व्यक्त करतो मी.
आपल्या हीनदीन आणि दुःखी आयुष्यासाठी मला दोष देणं सोडून द्या आता.
‘तुम्ही पापी आहात’ असलं काही कधीच सांगितलेलं नाही मी तुम्हाला.
सतत मला घाबरून जगणं सोडून द्या आता.
मी काही तुमचा न्यायनिवाडा करत नाही की तुमच्यावर टीकाही करत नाही की तुमच्यावर कधी संतापतही नाही.
मला कशाचाही त्रास होत नाही.
मी शिक्षा वगैरेही देत नाही.
कारण मी म्हणजे शुद्ध प्रेम आहे.”
“येता-जाता माझ्यासमोर क्षमायाचना करणे बंद करा एकदम.
क्षमा मागण्यासारखं काही नसतं.
मी तुमची निर्मिती केली आहे असं जर तुम्ही मानत असाल तर तुमच्यामध्ये जे जे आहे ते ते मीच तर दिलेलं आहे तुम्हाला.
आनंद, दुःख, गरजा, मर्यादा, विसंगती… हे सारं काही मीच दिलेलं असेल आणि यातून तुमच्या हातून काही घडलं तर मी तुम्हाला दोषी कसा ठरवू ?
तुम्ही जसे आहात त्यासाठी मी तुम्हाला शिक्षा का म्हणून करू ?
आपल्या लेकरांच्या चुकांसाठी त्यांना मारता-झोडता यावे म्हणून एखादी भयंकर जागा मी तयार केली आहे असं खरंच वाटतं का तुम्हाला ?
कोणता देव करेल असं ?”
“ईश्वरी आदेश, दैवी नियम, कायदे वगैरे काहीही नसतं. काढून टाका डोक्यातून तुमच्या ते.
तुम्हाला ताब्यात ठेवण्यासाठी, तुमच्याकडून हवं ते करून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लुप्त्या आहेत त्या.
त्यांच्यामुळे तुमच्यात अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी हाच माझे मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्यांचा हेतू असतो.”
“तुम्ही आपल्या बांधवांना योग्य तो मान द्या.
जे स्वतःच्या बाबतीत होऊ नये असं वाटतं तुम्हाला तेच दुसऱ्याच्या बाबतीतही करू नका.
मी फक्त एवढेच सांगेन की, आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या.
तुमची सदसद्विवेकबुद्धी हीच तुमची एकमेव मार्गदर्शक असू द्या.
स्वतःशी प्रामाणिक रहा.
कारण अस्तित्वात असलेली एकमेव गोष्ट म्हणजे हे आयुष्य.
ते इथं आहे आणि आत्ता या क्षणाला आहे.
मी तुम्हाला पूर्ण मुक्त बनवलेलं आहे.
तुमच्यासाठी कसली बक्षीसंही नाहीत आणि शिक्षाही नाहीत.
कसली पापंही नाहीत आणि कसली पुण्येही नाहीत.
कोणी तुमच्या कृत्याचा हिशोब मांडत नाही की तुमच्या बर्यावाईटाची नोंदही करून ठेवत नाही.
आपल्या आयुष्याचा स्वर्ग बनवायचा की नरक करायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.”
“हे आयुष्य संपल्यावर पुढे काय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही;
पण एकच सांगतो की, या आयुष्यात नंतर पुढे काहीच नाही असं समजून जगा.
अस्तित्वात राहण्याची, प्रेम करण्याची, आनंद लुटण्याची ही एकमेव संधी आहे असे समजून जगा.
नंतर काहीच जर नसेल तर मी तुम्हाला दिलेल्या संधीचे सोने तुम्ही करायला नको का?
आणि नंतर काही असेल तर मी तुम्हाला तुम्ही योग्य वागलात की अयोग्य असलं काहीही विचारणार नाही.
मी एवढंच विचारीन: आवडलं ना तुम्हाला आयुष्य?
मजा आली की नाही ?
केव्हा सर्वात जास्त मजा आली ?
काय काय शिकलात ?”
“… तर माझ्यावर विश्वास वगैरे ठेवू नका.
विश्वास ठेवणे म्हणजे मानणं, तर्क करणे, कल्पना करणे.
मला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला अजिबात नको आहे.
तुम्ही माझा स्वाद घ्यावा, माझी अनुभूती घ्यावी असं मला वाटतं.
प्रिय व्यक्तीच्या ओठांवर ओठ ठेवताना, आपल्या चिमुकल्या बाळाशी खेळताना, आपल्या कुत्र्याचे लाड करताना, समुद्राच्या लाटांमध्ये डुंबताना मला अनुभवा तुम्ही.”
“माझ्यावर स्तुतिसुमने उधळून माझी खुशामत करणे बंद करा.
कसला आत्मकेंद्री आणि अहंमन्य देव समजता तुम्ही मला ?
तुमच्या भजन स्तोस्त्रांनी किटून गेलेत माझे कान…
त्या चिकट प्रशंसाशब्दांनी पार वैतागून गेलोय मी.
तुम्हाला माझ्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायचीच असेल तर काळजी घ्या आपल्या आरोग्याची, काळजी घ्या आपल्या नातेसंबंधाची, काळजी घ्या भोवतालच्या जगाची.
आनंदित रहा, आनंद व्यक्त करा.
माझी प्रशंसा करण्याचा… मला प्रसन्न करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे.”
“एक गोष्ट खात्रीची आहे,
ती म्हणजे तुम्ही इथे आहात…,
जिवंत आहात,
आणि हे जग विविध विस्मयकारक गोष्टींनी ओसंडतंय.
आणखी कसले चमत्कार हवेत तुम्हाला?
कशासाठी इतक्या अपेक्षा?”
“मला कधीही आपल्या बाहेर शोधू नका.
मिळणारच नाही कधी मी.
आपल्या अंतर्यामी शोधा मला तुम्ही.
तिथे मात्र माझी स्पंदने तुम्हाला निश्चितपणे जाणवतील!”
- बरूच डी स्पिनोझा.
- नेटवर सर्च करून स्पिनोझाचे तत्वज्ञानाचा अवश्य अभ्यास करा. त्याला आस्तिक म्हणावं का नास्तिक हेही ज्याने त्याने ठरवावे. पण स्पिनोझाचा देव सर्वांनीच अंगिकारावा. मग त्या देवाच्या खुशामतीसाठी किंवा भक्तीपोटी म्हणा हवं तर कोणतेही विधी किंवा कोणत्याही कृती करण्याचे जेव्हा बंद कराल तेव्हाच स्पिनोझा च्या देवाला तुम्ही मानता असे निश्चित म्हणता येईल. नाहीतर बरेच लोक स्पिनोझाचा देव आम्ही मानतो असे वरवर म्हणतात आणि तरीही देवळात किंवा चर्चमध्ये उपासनेसाठी जातात. कोणत्यातरी धर्माने घालून दिलेल्या बंधनात्मक गोष्टी पाळतात आणि त्या पाळणाऱ्यांच्या कळपामध्ये सामील होतात. हे म्हणजे क्षणभरासाठी जाग येणे आणि पुन्हा दुसऱ्या क्षणाला डोळे मिटून पुन्हा झोपणे यासारखेच आहे. हिंदी सिनेमातील विनोदी अभिनेता केश्टो मुखर्जी हा असे करताना दिसतो आणि आपण हसतो. विशेषतः बॉम्बे टू गोवा या सिनेमात. त्यातील त्याची कृती ही स्पिनोझाचा देव मानून सुद्धा एका विशिष्ट धर्माच्या कृती करण्यासाठी पुन्हा मार्गी लागतात त्यांच्यासाठी उदाहरण आहे असे म्हणता येईल. सर्वांनीच स्पिनोझाच्या देवाचे आस्तिक व्हावे. तसे झाल्यास आस्तिक आणि नास्तिक यामधील दरीच नष्ट होऊन जाईल.

- — लेखन : सुनील देशपांडे.
- — संपादन : देवेंद्र भुजबळ.
- — निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
