सोसायटी आणि आसपासचा परिसर लख्ख ठेवणाऱ्या 42 महिला कर्मचाऱ्यांचा आदर- सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे भान राखत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खुर्द येथील लेक विस्टा सोसायटीने मोठ्या जल्लोषात यंदाचा महिला दिन साजरा केला.
करोनाच्या संकट काळात या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय निष्ठेने आपले कर्तव्य बजावत सोसायटी व परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावला. त्यांच्या या कामाबद्दलची कृतज्ञता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. अचानकपणे झालेल्या या मानसन्मानाने व मिळालेल्या भेट वस्तूमुळे झाडलोट व हाऊस किपिंगसारखी कामे करणाऱ्या या सर्व महिला भगिनींना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आपल्या भावना व्यक्त करणेही त्यांना झाले नाही.
सोसायटीकडून मिळालेल्या या आदरयुक्त प्रेमाने आपण भारावून गेलो असल्याची भावना श्रीमती मनीषा कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.
आंबेगाव खुर्द येथे ‘लेक विस्टा’ ही सुमारे साडेसहाशे फ्लॅटची सोसायटी आहे. तेरा इमारतींच्या या विस्तीर्ण परिसरात महिला दिनानिमित्त महिला भगिनींच्या कृतज्ञता समारंभाबरोबरच ज्येष्ठ महिला सभासदांचा सत्कार, फनफेअर, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची व वेगवेगळ्या स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्याला रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे सोसायटीच्या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर तर खवय्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती.
चंचला गायकवाड, सुवर्णा शिंदे, अनुप्रिया नरहरी, मीनल मोरे, स्मिता आचार्य, सुश्मिता नाईक, शाल्मली चाफेकर, वनिता पुजारी, चैताली परदेशी या महिला सदस्यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सर्व इमारतीतील रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.
सोसायटीचे अध्यक्ष तुषार यादव, सचिव अमित खाडे व त्यांच्या टिमने या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.

– लेखन : सुनील कडूसकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मी लेकविस्टा सोसायटी मध्ये सुरुवातीपासून राहतोय. इथे सर्व सण व इतर कार्यक्रम पण खूप चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. विशेषतः लेकविस्टाचा गणेशोत्सव बघण्यासारखा असतो. संपूर्ण 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम व लहान थोरांसाठी स्पर्धा असतात. ह्या वर्षी महिला दिन पण खूप उत्साहात साजरा झाला त्या साठी मी सर्वांचे अभिनंदन करतो 💐💐
अमोल कोपर्डे