थेट युद्ध करून आपण कधी जिंकू शकणार नाही, म्हणून पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ले करीत असतो. याचाच परिपाक म्हणून २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करून त्यांना मृत्यूमुखी पाडण्यात आले. तर ७ मे रोजी ऑपरेशन सिन्दुर राबवून या भ्याड हल्ल्याचा मोठा बदला घेतला.
एकीकडे पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ले करीत आला आहे, दुसरीकडे चीन भारतात स्वस्तात वस्तू भारतीय अर्थ व्यवस्था धोक्यात आणीत आहे. त्यात आता व्यापारावर एकतर्फी मनमानी निर्बंध लाऊन अमेरिकेने जणू भारतावर व्यापारी हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यामुळे या आव्हानात्मक परिस्थितीत सर्व भारतीयांनी एक होऊन परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि स्वदेशी उत्पादकांनी, स्वदेशात निर्माण केलेल्या वस्तूंचीच खरेदी करून “स्वदेशीचा नारा” प्रत्यक्षात अमलात आणावा, असे परखड आवाहन माध्यमकर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते नवी मुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गृहनिर्माण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की, १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला वाटते, तशी ही काही भारताची पहिलीच फाळणी नसून, गेल्या २,५०० वर्षात भारताची २४ वेळा फाळणी झालेली आहे. कोणे एकेकाळी “भारत खंड” असा उल्लेख होत असे, इतका हा विशाल भूभाग होता. पण परकियांच्या आक्रमणामुळे तुकडे होत होत, आजचा भारत देश दिसत आहे. म्हणून अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने कटिबध्द राहण्याची गरज असून धर्म, भाषा, प्रांत, वंश, वर्ण, जातीपाती अशा कुठल्याही कारणांनी आपल्यात फूट पडणार नाही, दुहीची बीजे रोवल्या जाणार नाही, यासाठी आपण सदैव दक्ष राहिले पाहिजे. समाजातील सुस्थितीतील घटकांनी वंचित घटकांची जाण ठेवून त्यांच्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो ? याचा विचार करून ठोस कृती केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री रॉय डॅनियल यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले.

श्री.सच्चिदानंद ओटवणे यांनी राज्य गीत तर श्री सुबोध बर्नवाल, श्री किरण भावे, सौ अमृता भावे यांनी देशभक्तीपर हिंदी गीते सादर केली. कार्यक्रमाचे बहारदारपणे सूत्रसंचालन सौ अमृता भावे यांनी केले.

संस्थेचे सचिव श्री. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. तर कार्यकारिणी सदस्य श्री श्रीकांत जोशी यांनी संस्थेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

श्री किरण भावे यांनी उत्तम आरोग्यासाठी निसर्गोपचाराचे किती महत्व आहे हे समजावून सांगितले.

लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेत प्रवेश मिळाल्याबद्दल कु. तेजल महादेव जाधव अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेत प्रवेश मिळाल्याबद्दल कु.अदिती पाटील तर जमशेदपूर येथील व्यवस्थापन संस्थेत प्रवेश मिळाल्याबद्दल कु. जुई भावे या तिघींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भरपूर पैसे असलेले, सापडलेले पाकिट प्रामाणिकपणे संबंधितास नेऊन दिल्याबद्दल सफाई कर्मचारी श्री.विनोद डाकलिया याचा तर समयसूचकता दाखवून बंद पडलेल्या लिफ्ट मधून बालकांची सुखरूप सुटका केल्याबद्दल सुरक्षा पर्यावेक्षक श्री.विनोद यादव यांचा भेटवस्तू आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️9869484800
वार्तांकन अतिशय चांगल्या पद्धतीने, ओघवत्या भाषेत केले आहे सोबत योग्य त्या फोटोंची जोड दिल्यामुळे ते अधिक आशय संपन्न झालं आहे. अशा प्रकारचं वार्तांकन म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच आहे त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद श्रीकांत जी
स्वदेशीचा संदेश मौल्यवान आहे भुजबळ सर.