मित्रहो, स्वातंत्र्यदिन हा खऱ्या अर्थानं आनंदोत्सव असतो. भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन आज ७८ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याचा ७९ वां वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत, ही भारतीय जनमानसाला सुखद दिलासा देणारी गोष्ट आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. पारतंत्र्याचा काळोख नाहिसा होऊन, भारत मातेच्या उदरातून स्वराज्याचा उष:काल उदयास आला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शेकडो क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं. त्यांच्या गोडस्मृती आपल्या हृदयात चिरकाल तेवत राहतीलच, हे सूर्य किरणाएवढं शुभ्र सत्य आहे.

दरम्यान महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सर्वधर्मियांना सामावून घेऊन खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, करेंगे या मरेंगे, भारत छोडो ही जनआंदोलने छेडण्यात आली. त्यातूनच पुढे १५ ऑगस्ट हा सुवर्ण दिवस प्रकाशमान झाला. त्यामुळे आज प्रत्येक भारतीय स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहे, ही क्रांतिकारकांची पुण्याईच म्हणावी ! आज आपण सर्वजण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत, हे वास्तवात क्रांतिकारकांच्या त्यागाचं फलित आहे, ही गोष्ट प्रत्येक भारतीयाने आपल्या हृदयात कोरून ठेवावी. वास्तविक पहाता, स्वातंत्र्यदिन साजरा करणं म्हणजे ज्या शुरवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला, त्यांची आठवण करत त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे गोडवे गाण्यासाठी तथा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देश्याने १५ ऑगस्ट हा दिवस सर्वधर्मीय नागरिक दरवर्षी साजरा करीत असतात.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सकल भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनीही नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हर “घर तिरंगा” अभियान देशभर राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे देशाभिमान, सार्वभौमत्व, एकात्मता, अखंडता, राष्ट्रीय तिरंगा झेंड्याचे पावित्र्य अन् महत्व हे सर्व भारतीयांच्या मनात खोलवर रुजविणे होय.
या धर्तीवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून सर्वधर्मीय नागरिकांनी/विद्यार्थ्यांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा अन् ध्वजा सोबतचा सेल्फी harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करून या अभियानात मोठ्या संख्येनं सामील व्हावं,असं आवाहन केलं आहे.
आता स्वराज्य मिळालं, त्याचं सुराज्य करण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कंबर कसली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सर्वधर्मीय, गोरगरीब, निर्धन, निराधार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे आवास, शिक्षण, रोजगार, आरोग्य हे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ठोस योजना राबविल्या जात आहेत.
संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन, त्यांना कर्ज माफ करणं, कृषीपंपाचे वीज बिल माफ करणे अन् कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जलदगतीने पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळत आहे.

मोदीजींच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याशिवाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, आदर्श सांसद ग्राम योजना, मेक इन इंडिया, स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया, जनधन योजना, स्वच्छ भारत योजना, स्मार्ट सिटी योजना, इज ऑफ डूइंग बिझनेस अशा विविध लोकोपयोगी योजना सामान्य माणूस हा केंद्र बिंदू मानून राबविण्यात येत आहेत.
भारताची अंतराळातील शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने “चांद्रयान-२” ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम भारताने यशस्वी करून दाखविली. त्यामुळे अशी व्यापक क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.
शेकडो वर्षांपासून मुस्लिम महिला ह्या तिहेरी तलाक या जाचक कुप्रथेमुळे दुर्लक्षित-उपेक्षित जीवन जगत होत्या. त्यांच्या संरक्षणार्थ तिहेरी तलाक बंदी कायदा देशात लागू केला. यास्तव मुस्लिम महिलांनी तथा तिहेरी तलाकपिडीत महिलांनी सरकारच शतश: आभार मानले आहे.
जम्मू-काश्मीरसंबंधीचे राज्यघटनेतील ३७० कलम रद्दबातल करून त्याचा स्वतंत्र दर्जा काढून घेतल्याने, आता तेथे भारतातील कुठलीही व्यक्ती वा कंपनी उद्योगधंदा करू शकते.सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून, तेथील बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळू लागलं आहे. त्याची परिणती म्हणजे या राज्याच्या आर्थिक, औद्योगिक व पर्यटन विकासाला गती प्राप्त होऊन राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होत आहे. याशिवाय *३५ अ कलम* रद्द करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगवेगळे दोन केंद्रशासित प्रदेश नावरूपाला आले आहेत.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिन्दुर व ऑपरेशन महादेव ह्या लष्करी कारवाया करून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून आमच्या निरपराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या आतंकवाद्यांचा खात्मा केला. ही भारतीय सैनिकांच्या शौर्याची नांदी असून आझाद हिंदुस्थानाची ताकद आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे देशातील प्रभावशाली व पारदर्शक राज्यकारभारामुळे जगातील महासत्तादेखील भारताशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करण्यात उत्सुक होताहेत. त्याची परिणती म्हणजे परकीय गुंतवणुकीत वेगाने वृद्धी होत आहे. अणू चाचण्या,राष्ट्रीय महामार्गांची व्याप्ती वाढविणे, रेल्वे सोयी-सुविधांचे बळकटीकरण, स्वदेशी बनावटीची संरक्षण सामग्रीच्या निर्मितीला प्राधान्य, डिजिटल कनेक्टिव्हिटी, डिजिटल ट्रान्सफॉर्ममेशन या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. अर्थातच विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, दळणवळण,स्वदेशी युद्धसामग्री निर्मिती, अंतराळ, कृषी विकास यावर विशेष भर देऊन *सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास* या ब्रीदनुसार देश सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. भारताला वैश्विक स्तरावर १० स्थानावरून ५ स्थानावर आलो, ही आपली मोठी उपलब्धी आहे.
समस्त भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !
वंदे मातरम् !
भारत माता की जय !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

— लेखन : रणवीरसिंह राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
