Thursday, September 4, 2025
Homeलेखस्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी देखील !

स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी देखील !

दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा केला. घर घर तिरंगा फडकावला. आपल्या इतके स्वातंत्र्य इतर कोणत्याही देशात नसेल. निदान या बाबतीत आपला क्रमांक निश्चितच वरचा असेल. आजच्या घडीला जगात अनेक देश स्वतंत्र आहेत. तिथे बऱ्याच प्रमाणात लोकशाही आहे. कुठे कुठे निवडून आलेले सरकार देखील राजेशाही, हुकुमशाही पद्धतीने वागते, तो भाग वेगळा. पण गुलामी नाही.लोक त्यांना वाटेल तसे वागायला, बोलायला मोकळे आहेत.

पण गेल्या सात आठ दशकात आपल्या कडे स्वातंत्र्याचा जरा अतिरेक च झाला असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आपण हवे तिथे, हवे ते बोलू शकतो. कसेही वागू शकतो. माणसे रस्त्यात थुंकतात. क्वचित रस्त्याच्या कडेला उघड्यावर नैसर्गिक विधीही करतात. त्यात आपल्याला लाज लज्जा वाटत नाही. अपराधी वाटत नाही.आपण सर्रास रहदारीचे नियम मोडतो.वेगाने वाहने चालवतो. निरपराध पादचाऱ्यांचे बळी घेतो. पकडल्या गेलो तर पोलिसांशीच हुज्जत घालतो. हातात खिशात भरपूर नोटा असल्या तर अशा अपराधातून सही सलामत सुटू देखील शकतो.

आपण सार्वजनिक ठिकाणी दंगा करू शकतो. दवाखान्यात डॉक्टरला, स्टेशन मध्ये पोलिसांना, रस्त्यावर दुकानदारांना मारू शकतो. त्यांचा अपमान करू शकतो. आपला स्वाभिमान कुणी दुखावला तर आपण काहीही करू शकतो. त्यात आपण कधी काळी निवडून आलो असलो, लोक प्रतिनिधी असलो (आजी, माजी काहीही चालेल), तर मग आपले वाटेल तसे वागण्याचे स्वातंत्र्य कितीतरी पटीने वाढले असते. आपल्याला सर्वाधिकार असतात, सर्व नियम तोडण्याचे. कुणालाही झोडण्याचे. सरकारी अधिकाऱ्याचा अपमान करण्याचे. कारण धन दांडग्या सोबत्याच्या भरवशावर आपण हवा तसा आपल्या सोयीचा न्याय विकत घेऊ शकतो. तेही स्वातंत्र्य आहे आपल्याकडे.

इथे प्रत्येक जण विकाऊ आहे. तुमच्याकडे तेवढी किंमत, हिंमत हवी देण्या लायक. आपल्याकडे महिलांचा अपमान करण्याचे, सामूहिक बलात्कार करण्याचे, नशापाणी करून बेधुंद होण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ माजविण्याचे स्वातंत्र्य आहे. पकडले गेलो तरी पर्वा नाही. कुणी, नेता, कुणी आका, दादा सहज सोडवेल आपल्याला. कुठून कशी सूत्रे हलतील ते सूत्रांनी बातम्या देणाऱ्यांना ही कळणार नाही. अगदी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी तिथेही हवे ते घरच्या सारखे स्वातंत्र्य आहेच विकत घ्यायला.

मोर्चे काढून, आंदोलने करून, धाक दाखवून हव्या त्या मागण्या जबरदस्तीने पदरात पाडून घेण्याचे देखील स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे मजबूत लोकशाही आहे. सुंदर संविधान आहे.कायदे नियम आहेत. पण ते काटेरी कुंपण ओलांडण्याचे, हवा तो हैदोस घालण्याचे देखील स्वातंत्र्य आहे. आमच्या मागण्या तेव्हढ्या पूर्ण झाल्या पाहिजेत. बाकी दुनिया खड्ड्यात गेली तरी चालेल. हमारी मांगे पुरी करो ! आमच्यावर झालेला अन्याय आधी दूर करा. मग त्यासाठी इतरांवर अन्याय झाला तरी चालेल.

आता तर सोशल मीडिया आहे आपल्या हातात. तिथे आपण वाटेल तसे बरळू शकतो. घाणेरडी गरळ ओकू शकतो. अश्लील कॉमेंट करू शकतो. कुणालाही कसेही ट्रॉल करू शकतो. तिथे कसलेही धरबंध नाहीत. ते ओपन एअर थिएटर आहे नंगा नाच घालायला. कुणावर कसलेही नियंत्रण नाही तिथे. इथेही आपण आपली स्वातंत्र्य उपभोगण्याची हौस यथेच्छ भागवून घेतोच.

आपल्याच शेजारचे सिंगापूर किंवा अरब देश देखील बरेच स्वतंत्र आहेत. आधुनिक, प्रगत आहेत. पण तिथले नागरिक स्वातंत्र्याबरोबर आपल्या जबाबदारीचे भान ठेवतात. नियम पाळतात. तिथे कायद्याचा धाक आहे. शिक्षेची भीती आहे. कुणीही कसेही वागून मोकळे सुटू शकत नाही. सिंगापूर सारख्या देशात च्युयिंगम खायला देखील बंदी आहे. रस्त्यावर थुंकले तर सरळ जेलमध्ये ! टॅक्सी वाला जवळचे भाडे नाकारू शकत नाही.

जपान सारख्या देशात साधी चोरी पकडल्या गेली तर संपूर्ण समाज त्या व्यक्तीला नाकारतो, वाळीत टाकतो. हा अपमान अनेकाना सहन होत नाही तिकडे, म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, इतकी भीती असते समाजाने नाकारण्याची!

त्यामानाने आपण बिनधास्त वावरतो समाजात काहीही धंदे करून. उलट भ्रष्टाचाराला च प्रतिष्ठा आली आहे की काय अशी परिस्थिती आहे आपल्याकडे. स्वातंत्र्यापूर्वीचे निस्पृह पुढारी, देशभक्त आता राहिले नाहीत. देशाचे एकूणच राजकारण इतके प्रदुषित, गढूळले आहे की राज्यकर्ते जास्त बेछूट, बेशिस्त की जनता जास्त बेजबाबदार अशी स्पर्धा लागली आहे !
देश तिथल्या शिक्षण, संस्कृतीने ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आपल्याकडे संख्यावाढ भरपूर झाली. त्यामुळे प्रगतीचे प्रत्येक क्षेत्रातील आकडे रेकॉर्ड साठी उत्साहवर्धक दिसतील. पण संख्येच्या प्रमाणात गुणवत्ता वाढ मात्र झाली नाही. आपल्याकडची प्रचंड लोकसंख्या, अनेक राज्ये, अनेक भाषा ह्याही समस्या आहेतच आपल्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या!तरी इतरांच्या मानाने आपण बरीच उंच उडी मारली अनेक क्षेत्रात. इतके सगळे असूनही आपल्या मूलभूत समस्या सुटत नाहीत.गरिबी हटत नाही.आपण सर्व बाबतीत स्वावलंबी नाही. संघर्ष सुरूच आहे स्वातंत्र्याच्या आठ दशकाच्या उंबरठ्यावर !

आजच्या परिस्थितीत सुधारणा करायची असेल तर आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे या बरोबरच ती एक नैतिक जबाबदारी आहे, ते राष्ट्रीय सामाजिक कर्तव्य देखील आहे हा भाव जोडीने रुजायला हवा प्रत्येक देशवासीयांच्या मनात. तरच अभिमानाने, गर्वाने स्वातंत्र्यदिन साजरा करायला आपण मोकळे असू.खऱ्या अर्थाने लायक असू. जबाबदारीशिवाय, कर्तव्य भावनेशिवाय हक्क गाजविण्याला काही अर्थ नाही.

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गणपती : युवकांचा पुढाकार
Nitin Manohar Pradhan on हलकं फुलकं
जयश्री चौधरी on श्री गणेश : ४
श्री सुहास नारायण चांदोरकर, माणगाव रायगड on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !