गोंदिया जिल्ह्यातील श्री दिनेश नखाते हे एक हरहुन्नरी लेखक आहेत. श्री नखाते यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. पूर्वी ते स्थानिक वर्तमानपत्रात काम करीत असत. तिथे काम करीत असताना, आपल्याला लेखनाची आवड हे त्यांच्या लक्षात आले. तसेच अनेक पुस्तके हाताळताना, एका जिल्ह्यावरील समग्र असे पुस्तक बाजारात दिसून येत नाही या जिद्दीतून त्यांनी जिल्हा गौरव पुस्तिका लिहिण्यास सुरुवात केली.
श्री नखाते यांनी प्रथम लिहिलेली पुस्तिका म्हणजे गोंदिया जिल्हा गौरव. विशेष म्हणजे ही पुस्तिका गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेवेळी म्हणजे 1999 यावर्षी प्रकाशित झाली. अतिशय माहितीपूर्ण असलेल्या या पुस्तिकेत गोंदिया जिल्ह्यातील तालुके, गावे, वाहणारी नदी, रेल्वे मार्ग असा ठळक दिसणारा नकाशाही त्यांनी दिला आहे. यातून आपल्या जिल्ह्याशी असणारे त्यांचे नाते दिसून येते.
श्री नखाते यांनी एकेक करत नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांच्या देखील पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. या सोबतच त्यांनी “मेरा विदर्भ” हे हिंदी पुस्तक ही प्रकाशित केले आहे.
या पुस्तिका तयार करण्यासाठी श्री नखाते स्वतः माहिती गोळा करतात. स्वतः त्या त्या ठिकाणी जाऊन ती माहिती वर्तमानात योग्य आहे की नाही हे तपासून नंतर त्याचा समावेश त्यांच्या पुस्तिकेत करतात. ते आर्थिकरित्या खूप सबळ नसतानाही केवळ एक ध्यास म्हणुन करीत आहेत. यासाठी त्यांनी गंगाभूमी प्रकाशन संस्था सुरू केली आहे.

नुकतीच श्री नखाते यांनी कामकाजानिमित्त कार्यालयात भेट घेतली असता, सहज बोलता बोलता त्यांनी केलेले काम उलगडत गेले. ते आजही त्यांच्या सायकलवर आजही पुस्तकांची विक्री करतात. स्पर्धा परीक्षेला बसणारे अनेक उमेदवार त्यांच्या पुस्तकांमुळे घडलेत आणि आजही घडत आहेत.असे महान कार्य एका सामान्य माणसाच्या हातून होणे हे असामान्य असे कर्तुत्व आहे.त्यांच्या वागण्याबोलण्यात कुठेही आपण मोठे असल्याचा लवलेशही जाणवत नाही. ते सांगतात, “मी ज्या ज्या बाबतीत लिहिलेले आहे त्या सर्व ठिकाणी स्वतः जाऊन चौकशी करून तपासणी करून, नोंदी तपासूनच लिहून घेतले आहे. माझे नागपूर येथील भोसले घराण्याशी घनिष्ठ संबंध असून त्यांनी मला कित्येक पुस्तके संदर्भ म्हणून दिली आहेत, ही माझ्यासाठी मोठी मानाची बाब आहे.”

नखाते यांनी जिल्हा पुस्तिकांबरोबरच राजा भोज, संताजी जगनाडे महाराज, गोंड संस्कृती, गोंड बोलीभाषा, कर्मयोगी मनोहर भाई पटेल, धरती आबा बिरसा मुंडा, चांदपूर के हनुमान आदी मराठी आणि हिंदी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांपैकी “मायबाप” ही कादंबरी त्यांना सर्वात आवडणारी आहे, असे ते सांगतात.
श्री नखाते यांनी अनेक शासकीय मंडळांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. या निमित्ताने त्यांना गंगटोक, लुधियाना, इटानगर करगुल, कटक, तिरुचिरापल्ली, धारवाड, मुंबई, कोलकत्ता, अगरतला आदी ठिकाणी जाता आले. तेथील संस्कृती बघता आली. त्याबद्दलही त्यांनी लिहिले आहे.
आकाशवाणी वरील बऱ्याच कार्यक्रमात नखाते यांचा सहभाग असतो. त्यांनी युवावाणी मध्ये काव्यपाठ केलेला आहे. भेट वार्ता कार्यक्रमातही त्यांची मुलाखत झालेली आहे. नागपूर जिल्ह्यावर आधारित परिचर्चामध्येही त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांनी दिलेली माहिती समाविष्ट असल्याचे ते आवर्जून सांगतात.
एवढं लिखाण असूनही ते अतिशय साधे आणि आपल्या मातीशी एकरूप असे आहेत. त्यांना आणखी बरंच लिखाण करायचं आहे परंतु सध्या त्यांच्या खाजगी कारणांमुळे ते थांबलेले आहे. असे असतानाही त्यांच्या उत्साहात तीळ मात्र कमतरता दिसत नाही. अशा या हरहुन्नरी लेखकाला मानाचा सलाम.

— लेखन : अंजु कांबळे निमसरकर.
जिल्हा माहिती अधिकारी (गोंदिया)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
