अहो….
किमान महाराष्ट्रात तरी ‘अहो’ अशी साद कोण कोणाला घालते हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात काही भागात पत्नी नवऱ्याला हाक मारताना मोठ्या मुलाचे नाव घेत बोलावते. तर काही ठिकाणी, ऐकलं काय; मी काय म्हणते किंवा म्हणलं…. अशी सुरवात करत बोलत असते. गंमत म्हणजे रस्त्याने काही पुरुष बोलत पुढे चालले अन् पाठीमागून एकटीने अहो अशी जर हाक मारली; तर सारेच पुरुष मागे वळून बघतात. एवढी या अहो ची दहशत असते !
उभयतांच्या लग्नाची वर्षे जस जशी वाढू लागतात तस तशी ‘अहो’ या शब्दाच्या केवळ टोनिंग वरून नवऱ्याला बायकोचा मूड समजून येतो. लग्नानंतर मारलेली अहो, ही साद हळुवार, अदबीने, घाबरत किंवा लाजत मारलेली असते. मात्र कालांतराने हळूहळू या सादेत आवाजाची जरब वाढू लागते. नवरोबास अहो, या सादेचा रोख समजू लागतो. सद्या विशेषतः निवृत्तीनंतर बऱ्याच जणांना इतर कोणतेही व्यसन नसले तरीही मोबाईलने मात्र त्यांच्या जीवनात अधिराज्य गाजवलेले असते. अशा परिस्थितीत बऱ्याचदा बायकोच्या पहिल्या व हळू आवाजात मारलेल्या सादेला सहसा दाद दिली जात नाही. यानंतर अहो, या हाकेच्या आवाजाचा नूर किंवा पातळी वाढते. शिवाय या वेळी जर नवऱ्याचे डोके मोबाईलमध्ये असले तर मग त्याची खैर नसते. आदी मोबाईल (आता चूल अस्तित्वात नसल्याने मोबाईल चुलीत घाला असं म्हटलं जात नसावं !) पेटवा किंवा खलबत्याने चेचते अशी मुक्ताफळं घरोघरी ऐकायला मिळतात.
कधी घरी दोघेच असताना पत्नीकडून आलेल्या प्रस्तावावर जर नवऱ्याचा नकार मिळाला तर मग भले उद्रेक नसला तरी लग्नापासूनच्या सर्व घटनांचा खरपूस समाचार ऐकून घेण्यावाचून पर्याय नसतो. अहो, या शब्दाला फार महत्व प्राप्त झालेले असते. अहो, ची साद प्रसंगानुसार कधी काळजीची,कधी समज, जाणीव करून देण्यासाठी तर कधी ताकीद देण्यासाठी उच्चारली जाते. सायंकाळी मित्रासोबत नवरा परस्पर बाहेर निघताना पाठीमागून अहो ही अशी कानी पडते, ही साद बऱ्याच सूचनांसाठी असते हे बापड्या पुरुष वर्गास वेगळं सांगायला नको.
साधारणपणे प्रत्येकाच्या घरात दूध ही अशी एक चीज आहे की जी नवऱ्याला हमखास बोलणे ऐकून घेण्यास कारणीभूत ठरते. बायको कधी गॅसवर दूध ठेवलंय, जरा लक्ष ठेवा म्हणते. मग बिचारा तो दुधावर लक्ष ठेऊन उभा असतो. पण दुर्दैवाने मोक्याच्या क्षणी दुर्लक्ष होते अन् हे वैरी दूध फसासा उतू जाते. यानंतर त्याने कितीही चाणाक्षपणे स्वच्छता केली तरी ती बायकोच्या नजरेतून सुटत नाही. यानंतर घेतला जाणारा खरपूस समाचार गुमान ऐकुन घेण्याशिवाय गत्यंतर नसते.

नवरोबा घरात किंवा किचनमध्ये घुटमळला तर स्त्रियांना लागलीच याचा अंदाज येतो. या स्वारीला आता काय पाहिजे ? अन् ते कोठे आहे ? हे मनकवड्या बायकोला कसे समजते ते देवच जाणो. खरेतर बायको केवळ नवऱ्यावर नव्हे तर साऱ्या घरातील सदस्यांवर काळजी रुपी करडी नजर ठेवून असते.
पुरुष मंडळी घराबाहेर कितीही कर्तृत्वान अन् विद्वान असली तरी त्यांना अहो, या सादेस वचकून राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे. बायकोच्या अहो चा वेळीच गर्भितार्थ ज्याला समजला तोच संसारात सुख शांतीने राहतो हेच कटूसत्य आहे. तमाम नवरोबा या मताशी सहमत होतील.

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन :वदेवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
