कथा

“सजीव माणसं”

शुक्रवारी कार्यालयीन कामकाज घरून करायचं असल्याने कार्यालयात जायचा-यायचा वेळ वापरून परेशने प्रभातफेरीने दिवसाचा श्रीगणेशा केला. गृहसंस्थेत कोणी वडीलधारे दिसले की तो नमस्कार करत असे. त्या दिवशी फेरीमार्गावर त्याला श्रीनिवासआजोबा दिसले.
“नमस्ते”, परेश.
पंचहत्तरी पार केलेले आजोबा. मुळातले आंध्रप्रदेशातल्या कडप्पा जिल्ह्यातले. तिथल्या घरी एकलकोंडं आयुष्य जगायचे. दरवर्षी ३-४ महिने त्यांच्या मुलाकडे म्हणजे बंगळूरला परेशच्या शेजारच्या सदनिकेत राहायला यायचे.
“शुभोदया… …तुम्हारा गाव कौनसा?” दरवर्षी पहिल्यांदा भेटले की ते हेच विचारत.
“जळगाव, नॉर्थ महाराष्ट्र .. ” वार्धक्क्याकडे बघून परेशही नेहेमी नव्याने सांगितल्यासारखे सांगत असे. दक्षिणभारतीयांशी हिन्दी बोलतांना क्रियापदं वापरू नयेत हे तो ओळखून होता. आटपून परेश कामाला बसला. आभासी बैठका, काम, दुपारचं जेवण, चमुशी गप्पा करून कानाला लावलेलं उपकरण, ज्याला तो कर्णपिशाच्च म्हणे, ते त्याने काढलं. ३ वाजायला आलेले. कोकीळागान चालू होतं. परेश काहीसा वैतागलाच. हे सिगेहल्लीमधले कोकीळ तिन्ही त्रिकाळ हाकारे देत असतात. काळवेळ, ऋतू काही-काही फरक नाही! तो विचार करत असतांनाच रेकण्यासारखा आवाज आला. आज हा आवाजही परत आल्यासारखा वाटला. कोकीळेमुळे आपले कान वाजू लागले की काय असा विचार त्याच्या मनात आला. परेशने पुढच्या दिनचर्येला सुरुवात केली.

शनिवारी न्याहारी चालू असतांना रेकण्याचा आवाज परत आला.
“त्या म्हशीचं रेडकू हरवलेलं दिसतय”, परेश बायकोला म्हणाला. एक-दीड तासाने कोकिळेची शीळ आली तेव्हा त्याला लक्षात आलं की मधला बराच वेळ रेकणं ऐकू येत होतं. ते थांबल्यावर कोकीळ गाऊ लागला होता. परेशच्या गृहसंस्थेसमोरून एक मोठा, खोल नाला वाहतो. जड जनावरं चरता-चरता त्यात पडत आणि कधीकधी त्यातून वर येता येत नसे.“…किंवा म्हैस नाल्यात पडलेली दिसते.” तो म्हणाला. त्याच्या मनात काहीतरी घोळत होतं. ते बायकोलाही लक्षात आलं. तिने भरलेला हुंकार तशा काही शक्यतांना वेसण घालणाराच होता. त्याने यापूर्वी आईच्या ताब्यात असतांना किंवा नसतांना म्हणूया, अनेकदा बादरायण संबंध नसलेल्या प्रसंगांमध्ये पडून नसती लटांबरं मागे लावून घेतली होती. पण बायकोच्या ताब्यात आल्यापासुन सगळी मर्दुमकी गुंडाळून ठेवलेली होती.

“तुझा हेतु शुद्ध असतो रे, पण काळ सोकावलाय.” अशा प्रसंगातून बाहेर आलं की बायको त्याला समजावत असे. त्याने म्हशीला शोधायला जायचा प्रस्ताव रहित केला, विचारही सोडून दिला. त्या दांपत्याने रेकण्याकडे जवळ-जवळ दुर्लक्षच केलं.
रविवार उगवला. परत रेकण्याचा आवाज येत होता. खरंच म्हैस नाल्यात पडली आहे का? तिचा मालक सोडवायला का येत नाहीये? की, म्हैस गोठ्यात बांधून गुराख्याचं कुटुंब अचानक कुठे निघून गेलं? अश्या प्रसंगी ते कोणालातरी सांगून जात असतील, तसं यावेळी का केलं नसावं?, असे अनेक विचार परेशच्या मनात येऊन गेले. दुपारचे ३ वाजून गेले होते.“रेडकाला आई सापडत नाहीये.” पहिल्यांदाच बायको बोलली.परेशला वाटते तेवढी ती पाषाणहृदयी नाहीये. तिच्या मनातही तरंग उठू लागले आहेत.
“अरे! ही शक्यता तर मला लक्षातच आली नव्हती.” परेशने बायकोचं कौतुक केलं.
“तू जा बरं, ते रेडकू कुठे आहे ते पाहून ये.” परेशची अस्वस्थता पाहून बायकोने ब्रह्मवाक्य उच्चारलं.पडत्या फळाची आज्ञा आणि दुचाकीची किल्ली घेऊन परेश नेसत्या कपड्यांनी निघाला.
“रेड्डीला घेऊन जा रे, एकट्याने काही करायला जाऊ नको.”

परेश गृहसंस्थेच्या प्रवेशद्वाराशी आला तेव्हा प्रमुख रखवालदार रेड्डी जेवण करत होता. परेशने त्याला सोबत मागण्याचं कारण समजावून सांगितलं. हिन्दी यथातथा असल्याने त्याला भैसचा अर्थ मांजर वाटत होता. पण गाय म्हंटल्यावर त्याला लक्षात आलं. ‘एक फेरी मारून येतो तोपर्यंत जेवण उरकून घे’, असं परेशने त्याला सांगितलं. परेश साधारण आवाजाच्या दिशेने आणि नाल्याकडे गेला. नाल्यापलीकडे एक म्हैस चरत होती. ती मोकळी होती आणि ओरडतही नव्हती. तिच्या पाठीवरचा बगळासुद्धा हालत नव्हता एवढी ती कायावाचामनाने स्थिर होती. आजूबाजूला अन्य कोणी जनावरं दिसत नव्हती. साशंक होऊन तो रेड्डीला आणायला परत फिरला. रेड्डीचं जेवण झालेलं होतं पण त्याचा साथीदार जेवायला बसल्यामुळे त्याला रखवलदारी करणं भाग होतं. त्याला न घेता परेश परत त्याच दिशेला गेला.
यावेळी नाला ओलांडून पुढे जाऊन गृहसंस्थेभोवती गोल फेरी मारून यायचं त्याने ठरवलं. एका तीन मजली इमारतीत खाली एक उपहारगृह होतं, तिथल्या 2 बाजूंनी हवेशीर भटारखान्यात एक काळाकभिन्न माणूस होता. नाल्याच्या या बाजूला गाडी घेऊन फारशी अनोळखी माणसं येत नसावीत म्हणून आणि हल्ली सगळेच एकमेकांकडे संशयाने पहातात तसं त्याने पाहिलं. ‘याला त्या म्हशीचा आवाज येत नसेल का? हा कसाकाय स्वस्थपणे ऐकू शकतो?’ विचार करत परेश पुढे गेला. एक वाटसररू संथपणे चालला होता. थोडसंच अंतर आणखी गेल्यावर डाव्या बाजूच्या बसक्या घराआड, खाजगी मोकळ्या जागेत २ स्वतंत्र झाडांना बांधलेली २ गाईची वासरं दिसली. परेशच्या गृहसंस्थेच्या कुंपणालगतच बांधलेली होती. २-३ दिवस उपाशी.

यांना इथे कोणी बांधून घातलं असेल? मालक तर असं करणार नाही. ही वासरं त्या तीन बाजूंनी मोकळ्या भटारखान्यात शिरली म्हणून त्या काळ्याकभिन्न माणसाने बांधली असतील का? नाहीतर कोण्या लहान मुलांचा चावटपणा असेल. किंवा बाजूच्या बखळ जागेत चेंडूफळी खेळणार्‍या तरुणांनी चरत मधेमधे येऊ लागली म्हणून त्यांना इथे बांधून घातली आणि खेळ झाल्यावर सोडायचं विसरले किंवा अद्दल घडावी म्हणून तसेच ठेवून गेले का? की कोणा समाजकंटकाचं काम आहे? किंवा कोणीतरी समाज कसा निद्रिस्त आहे ते दाखवण्यासाठीच या वासरांना वेठीला धरलं आहे? एक ना अनेक शक्यता क्षणार्धात परेशच्या मनात उमटून गेल्या.
अर्धवट वय, उपास आणि बंधांनामुळे वासरांच्या हंबरण्याचा आवाज रेकण्यासारखा येत असावा. कोकीळ याच झाडांवरून शीळ घालतो. परेशची सदनिका इमारतीच्या मध्यभागी असल्याने त्याला तिसर्‍या मजल्यावरच्या घरातून ऊंच झाडवरचा कोकीळ दिसे पण जमीनिवरची,भिंतीपलिकडची वासरं दिसणं शक्य नव्हतं. थोडे प्रयत्न केल्यास खिडकीतून ही वासरं दिसतील, किंवा आवाज इथून येतोय हे कळतील अशी किमान १५-२० घरं त्याच्याच गृहसंस्थेत होती. इतरही अनेक इमारती होत्या.

तिथे राहणारे आणि वाटसरु, रहदारीतले वगैरे धरून तीन दिवसात किमान ५००-६०० लोकांपर्यंत वासरांच्या आर्त हाका पोहोचल्या असतील. ती माणसं सजीवच आहेत की निर्जीव ?
गाडी थांबवून परेशने शिरस्त्राण काढलं. आवाजासरशी वासरांचं लक्ष वेधलं गेलं. त्यांना देवदूत आल्यासारखं वाटलं. आनंदातिरेकाने बेभान होऊन एक वासरू त्याच्या दिशेने झेपावलं. बांधलेलं असल्याने ते पुढच्या गुडघ्यांवर आपटलं. त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी ओघळलं. क्षणभरच परेशच्या आत्म्याने जणू त्या वासरात परकायाप्रवेश केला होता आणि परेशने त्याची वेदना भोगली. त्यालाही हुंदका आला. चटकन गाडी घेऊन तसाच त्याच्यापर्यंत पोहोचावं म्हणून त्याने गाडी सुरूही केली. पण व्यवहारी, अमानुष जगातल्या अपरीहार्य शहाणपणाने त्या नैसर्गिक ऊर्मिवर मात केली. जागामालाकाला सूचित न करता त्याच्या खाजगी जागेत प्रवेश करू नये आणि करायचाच असेल तर किमान आपण तिथे जाण्याआधी काय परिस्थिति होती त्याचा तपशील किंवा पुरावा आपल्याकडे असायला हवा. म्हणून परेशने ती जागा छायांकित करण्यासाठी भ्रमणध्वनि काढला. वासरं गरगर फिरून कासावीस होत होती. एकाच दिशेळे फिरून पडलेल्या वेढ्यांनी दोरी संपली की उलट्या दिशेने गिरक्या. मग परत पहिल्या…

एवढ्यात तो संथ येणारा वाटसरू तिथे पोहोचला. ते श्रीनिवासआजोबा होते! त्यांना त्यांच्या सदनिकेच्या खिडकीतून एक वासरू दिसलं होतं. त्यांनी त्याच्यासाठी १ केळं आणलं होतं. परेश आणि आजोबांनी एकमेकांकडे वासरांसंबंधी हळहळ व्यक्त केली. परेशने गाडी फिरवली आणि दुकानातून २0-२५ केळ्यांचा घड आणून रस्त्यावरूनच श्रीनिवास आजोबांकडे सुपूर्त केला.
“रस्सी काट के छोड दिया तो?” आजोबा.“जिसका है उसको पता चला के हम लोगो ने छुडाया तो?” परेश.
काही वेळ परस्थिती जोखत दोघे एकमेकांशी डोळ्याने संवाद साधत होते.“मै रेड्डी को ले के आता. आजूबाजूवाले और किसी को बुलाएंगे और कोई रास्ता निकालेंगे.” परेशने प्रस्ताव मांडला.
“तूम जा के आओ, मै इधर रुकता,” आजोबा म्हणाले.
परेश परत आला तर रेड्डीने गृहसंस्थेत येणार्‍या गवळ्याला पाचारण केलेलं होतं. तो त्याची वाट पहात थांबला होता. इमारतीच्या रखवालदाराला गायींच्या राखणदाराची आठवण झाली होती. रेड्डीच्या शंकेप्रमाणे ती वासरं त्या दूधवाल्याची होती; नसली तरीही या परिस्थितीत काय करावं हे गवळी जास्त चांगलं ओळखू शकतो. वासरांना कसं सांभाळायचं किंवा सोडायचं हे त्याने अचूक सांगितलं असतं. त्याला संपर्क करायचं आपल्याला सुचलं नाही म्हणून परेशने स्वतःला कोसलं. १० मिनिटं गेली तरी गवळी अवतरेना. आजोबांना किती वेळ तात्कळत ठेवणार? म्हणून परेश परत वासरं होती तिकडे गेला. पाहतो तर काय! वासरंही नाहीत आणि आजोबाही! परेश आश्चर्य आणि वासरं सुटल्याच्या समाधानाने परत आला. तो गृहसंस्थेच्या भुयारी वाहनतळात दुचाकी लावून मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊ लागला. रेड्डीही एका पाहुण्या वाहनाला उभं राहायची जागा दाखवून परत मुख्य प्रवेशद्वाराकडे चालला होता. तो आदरयुक्त भावनेने पाहतो आहे असा परेशला अंदाज आला.“क्या हूवा रेड्डी?“सर, गाय के बच्चे लिये परेशान होकर आप इतना चक्कर काटा सर… ऐसा आदमी इधर आउर कोई नही सर.” रेड्डी म्हणाला.
“हं..” परेशने उसासा टाकला.
जिवाच्या आकांताने झाडाभोवती गरगरणारी वासरं…. वासरांच्या आकांतामुळे त्यांच्याभोवती फिरणारे आपण…. सगळेच गरगरताहेत. संसारवृक्षाभोवती! परेश आता अशा विचारचक्रात गुंतला.
तो भानावर आला तेव्हा कोकीळेची शीळ परत ऐकू येऊ लागली होती. श्रीनिवासआजोबा नेहेमीच्याच निर्विकारपणे संथ चालत येत होते.

“वो बच्चे तालाब के बाजू भाग गया.” ‘तलाव’… खरंच. वासरांच्या बंधनाचा विचार आपण केला. त्यांच्या भुकेचाही विचार केला. पण सर्वात जास्त कशाने त्यांचा घसा कोरडा पडला असेल तर पाण्याने. हे आपल्याला लक्षातच आलं नाही! आजोबांनी त्यांना सोडलं नसतं तर? तर त्यांना पाणी कधी मिळालं असतं?!
आजोबांच्या कृतीबद्दल आदर, वासरांच्या वतीने कृतज्ञता, आपल्याला लाजवणारी धमक त्या वृद्धाने दाखवली म्हणून थोडा खजीलपणा अशा अनेक भावनांनी परेशचं मन भरून आलं.
“एव्हरी ईयर कडप्पा जा के मै सब को बताता, जळगाव का आदमी बहुत अच्छा होता.” म्हणत आजोबा परेशला पार करून गृहसंस्थेतल्या आपल्या घराच्या इमारतीकडे जाऊ लागले. परेशनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं.

पुरुदत्त रत्नाकर.

— लेखन : पुरुदत्त रत्नाकर. बेंगळुरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments