Wednesday, December 3, 2025
Homeलेखहवाई दलातील माझ्या आठवणी : ४२

हवाई दलातील माझ्या आठवणी : ४२

“गणेशोत्सव”

पुण्यात हवाई दलाचा गणेशोत्सव साजरा होत नाही हे समजल्यावर सखेद आश्चर्य वाटले. नंतर समजले की काही कारणाने ९ बीआरडीचा एक छोटेखानी उत्सव करतात. स्थापना, आरती आणि विसर्जन असे धार्मिक कार्यक्रम होतात.

आमच्या सारख्या नव्याने पोस्टींगला आलेल्यांनी पुढाकार घेऊन २ विंग आणि ९ बीआरडीचा एकत्र उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. तेंव्हा एयर कमोडर देशपांडे (कवी अनील यांचे चिरंजीव) यांच्या हस्ते स्थापना लतीफ हॉलच्या प्रांगणात झाली. नागपूरचाळ वगैरे पर्यंत जाऊन व्यापारी लोकांकडून वर्गणी गोळा करण्यात मी पुढाकार घेतला. शिवाय इतरांकडून जमा झालेल्या पैशातून जोरदार ऑर्केस्ट्रा ठेवला. कार्यक्रमानंतर मराठी व अमराठी मेनू ठेवून महाप्रसाद (बडा खाना) केला. विसर्जन वाघोली येथील सुप्रसिद्ध शिवमंदिराच्या सरोवरात केले. तेंव्हा साखर-खोबरे, वाटल्या डाळीचा झणझणीत प्रसाद होता.

पुढील वर्षी ; १९८८ च्या गणेशोत्सवात सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांच्या चिरंजीवांचा शो लोकांना आवडला. तेव्हा बाहेरच्या लोकांना कार्यक्रम पहायला मिळत, इतके कडक नियम नव्हते. पण सर्वात कडी केली ती डान्स पार्टीने ! ५ हजार लोक जमले होते ! फिल्मी गाण्यावर विविध आकर्षक पोषाखात सिनेसृष्टीतील कलाकारांचा दिलखेचक खेळ साडेतीन तास रंगला. लोकांच्या फर्माईशी संपेनात. आमच्या खानपान सेवेवर कलाकार पण जाम खूष होते. पुण्याच्या हवाई दलातील ते गणेशोत्सव लोकांच्या मनात बराच काळ रेंगाळत होते. कारण मी रिटायर झाल्यावर देखील त्या शोची आठवण काढताना भेटतात !

हवाईदलातील गणेशोत्सव नाटके, विविध गुण दर्शन, विसर्जन, महाप्रसाद यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना आवडीचा विषय असतो. “तरुण तुर्क म्हातारे अर्क”, “काका किशाचा”, “दोन्ही घरचा पाहूणा” सारख्या फार्स पासून अगदी “नटसम्राट” सारख्या नाटकांना सादर केले जात असे.

बंगाली कालीबाडीत असेच नाच गाणी खाण्यासाठी रेलचेल असते. अगदी रिटायर होण्याआधी हलवारा येथील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक लक्षात राहिली आहे.
क्रमशः

विंग कमांडर शशिकांत ओक

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments