तमिळ पुस्तक छपाईचा किस्सा
तांबरममध्ये नाडी भविष्य कथनाच्या अद्भुत चमत्काराच्या घटनांमुळे मला त्यात खूप रस निर्माण झाला आणि त्यातच मी खूप रमून गेलो. त्याचा असा परिणाम झाला की माझी पत्नी कुरकुरायला लागली की आजकाल तुमचे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष नाही. आम्हाला बाहेर सुद्धा तुम्ही घेऊन जात नाही. सारखे नाडी नाडी करता. ते अत्यंत बरोबर होते. परंतु माझ्यावर नाडी भविष्याचे गारुड होते की मी जास्त गुरफटत गेलो ! त्यातूनच माझे पहिले मराठी मधील नाडी ग्रंथ भविष्य – चक्रावून टाकणारा चमत्कार नावाचे पुस्तक ९४ सालच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यात प्रकाशित झाले. त्या पुस्तकाच्या ४५०० प्रती पुण्यात खरे एजन्सीत वितरणासाठी ठेवल्या होत्या. उरलेल्या ५०० प्रती मी तांबरमला नाडी केंद्रात भेट देण्यासाठी म्हणून ठेवून घेतल्या होत्या. हे पुस्तक आम्ही वाचू शकत नाही, तेव्हा तुम्ही तमिळमध्ये पुस्तक लिहावे असा आग्रह त्यांचा होता. मला ते मान्य हे होते परंतु मराठीचे तमिळ भाषेत रूपांतर करणारा कोणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझाही नाईलाज होता. तरीही मी प्रयत्न करत होतो.
एक दिवस ऑफिसमध्ये बसलेल्या असताना माझ्यासमोर बसलेला व्यक्ती म्हणाला की, सर तुमच्या बोलण्यावरून असे वाटते की तुम्हाला मराठी ते तमिळ भाषेत रूपांतर करून देणारा एक व्यक्ती हवा आहे. मला एक अशी व्यक्ती माहिती आहे की ती हे काम करू शकते. त्याबरोबर मी त्या व्यक्तीला मागे घालून शोधाला निघालो. एका व्हिडिओ कॅसेट भाड्याने देण्याच्या दुकानात एक वृद्ध व्यक्ती म्हणाली की हो मीच तो गोपाळराव! मी मराठी माणूस आहे. घरात आम्ही तंजावरी मराठात बोलतो. आमचे पूर्वज कोकणामधून इकडे आले. हिंदी ते तमिळ रूपांतर करण्याचे काम पूर्वी केलेले आहे. ते जेव्हा म्हणाले की मी समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचे तमिळ भाषेत रूपांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा मी त्यांना पटकन म्हणालो की मग तुम्हाला माझ्या मराठी भाषेतील पुस्तकाचा भाषांतर करण्याचा काही प्रश्न येणार नाही! असे म्हणून मी त्यांना माझे पुस्तक दिले. नाडी भविष्य म्हटल्यानंतर ते म्हणाले, ‘मी इथे इतकी वर्ष राहत आहे पण हा काय प्रकार मला माहित नाही! त्यांनी पुढच्या काही दिवसात प्रकरण एकचे तमिळ भाषेतील हस्तलिखित माझ्या हातात दिले. माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तमिळ व्यक्तीला मी मराठीतील वाक्यांना इंग्लिश मध्ये सांगून त्याला तमिळ भाषेमध्ये त्यांनी केलेले भाषांतर असेच आहे का? कितपत तमिळ भाषेतील लोकांना कळेल? असे आहे असे विचारले. त्यावर तो म्हणाला, ‘सर ज्याने कोणी हे भाषांतर केलेले आहे त्यांचे तमिळ भाषेवरील प्रभुत्व अत्यंत उच्च दर्जाचे आहे आणि त्यांनी केलेले भाषांतर हे तुम्ही सांगताय त्याच्याबरोबरच जात आहे. पुढे एका महिन्यात गोपाळराव यांनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतर तमिळ मध्ये करून दिल्यानंतर पुढचा प्रश्न होता की हे पुस्तक छापायला, प्रकाशित करायला कोण पुढे येणार? त्यासाठी कोण पैसे घालणार ? त्यावर नाडी केंद्र वाले म्हणाले, ‘डोन्ट वरी सर ते आम्ही बघतो’. त्यांनी काही लोकांची व्हिजिटिंग कार्ड माझ्या हातात ठेवून म्हटले की तुम्ही या लोकांच्याशी संपर्क करा. आम्ही त्यांच्याशी बोलून घेतलंय. ते तुम्हाला पुस्तकासाठी जाहिराती देतील आणि त्याप्रमाणे मी त्या कार्यावरील व्यक्तींची संपर्क फोनवरून करत असे आणि असे होता होता मला हव्या त्या २५००० रकमेची सोय झाली. त्यात रमणी गुरुजींच्या कंपनीचा ही समावेश होता.
जेव्हा एक तमिळ प्रतिथयश सिनेनट मला म्हणाले की तुम्ही हे काम करताय हे ऐकून मला धक्का बसला! मी जाहिरात देत नाही परंतु जितकी हवी असेल तितकी रक्कम तुमच्या कामासाठी देऊ शकतो. तुम्ही फार मोठे काम करत आहात वगैरे. तांबरमधील एका प्रेसमध्ये काम केले गेले आणि एक दिवशी त्या पुस्तकाच्या दोन हजार प्रती माझ्या हातात आल्या. आमच्या तांबरमच्या एअर फोर्स स्टेशन पासून जवळ असलेल्या रमणी गुरुजींच्या हस्ते एका शुक्रवारी झाले. त्यावेळी रमणी गुरुजींच्या वाचनातून या पुस्तकाचा उल्लेख झाला आणि हे पुस्तक तमिळ लोकांना नाडी ग्रंथांविषयी माहिती देणारे पहिले पुस्तक होईल असे म्हटले गेले. भविष्यकाळात या विषयावर वेगवेगळ्या भाषामधून तुझ्या हातून लेखन होईल असेही आशीर्वाद त्यावेळे मला मिळाले.
श्री गोपाळराव यांच्याशी माझे जवळचे संबंध निर्माण झाले. त्यांनी मला महर्षींच्या कामाबद्दल तुमच्या सहभागी करून घेतले याचा आनंद आहे. मला पैसे काहीही नकोत ही माझी नाडी महर्षींच्या चरणी सेवा आहे.
यानंतर काही दिवसांनी मला एकाने सुचवले की तुम्ही हे पुस्तक विक्रीसाठी गिरी आणि कंपनी यांच्याशी संपर्क करा. त्या सुमारास मी हवाई दलाच्या क्रिकेटच्या टीमचा मॅनेजर म्हणून चिपॉक स्टेडियमला भेट द्यायला जात असे. त्यांचे ऑफिस वाटेवरच होते. मी युनिफॉर्म मध्ये गिरी यांना भेटायसाठी विचारणा केली तेव्हा एक व्यक्ती गादीवर बसून काही लोकांशी फोनवर बोलत होती. कपाळाला भस्मम् गळ्यात वेगवेगळ्या रुद्राक्ष माळा. खाली भारी किमतीची लुंगी असा त्यांचा वेश होता. मला पाहताच ते एकदम उठून उभे राहिले आणि ‘सोलांगा, असं म्हणून माझा हात शेकहँड करताना गदगदुन हलवला. म्हणाले, ‘सर तुमचे काय काम आहे हे माझ्याकडून झाले आहे असे समजा. आता बोला तुमचे काय काम आहे ? तमिळमधील नाडी भविष्यावरचे पुस्तक – अतिशय कन्नी पिडिपू – नाडी सोदिडम पुस्तकाचे वितरण करण्यासाठी आपल्याच भेटायला आलेलो आहे. या दोन हजार पुस्तकांचे वितरण करीनच परंतु, यानंतरचे पुन्हा ते छापायचे झाल्यास आमच्या कंपनीतर्फे ते आम्ही छापू. गरम कॉफी पिता पिता मग त्यांनी सांगितले की खूप वर्षांपूर्वी ते हवाई दलात कार्यरत होते नंतर त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली त्यामुळे त्यांचा हवाई दलाच्या मधला एक ऑफिसर त्यांच्या ऑफिसमध्ये आला आहे याचे इतके अप्रूप वाटले की ते म्हणाले, ‘अहो हे काम मलाच करायला पाहिजे. तुम्ही इतरांकडे गेलातच कसे ? यानंतर माझे ते पुस्तक त्यांच्या माटुंगा रेल्वे स्टेशन जवळच्या शाखांमध्ये पाहायला मिळाले. अशी ही तमिळ मधील नाडी भविष्य पुस्तकाची कहाणी.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800