मी’ पणा रिकामा कर..
… एक परिस्थिती अशी येते की निश्चित, नक्की काहीच ठरवता येत नाही! काय कृती करावी म्हणजे ती बरोबर असेल ? होय किंवा नाही असे दोन पर्याय असतात. अशावेळी हो म्हणा आणि पुढे पाऊल टाका….. मग काय मग काय व्हायचे होऊ दे. हा सशस्त्र दलातील गुरुमंत्र कधी कधी कामाला येतो…
‘आता मी काही घडण्याची वाट पाहू शकत नाही’, असे मनात म्हणत मी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालू लागलो. पंढरपूरच्या इस्कॉन हरेकृष्ण मंदिरातर्फे मोठ्या पंडालमधे राहायची सोय झाली होती. तो पंडाल विठोबा मंदिराच्या विरुद्ध बाजूच्या चंद्रभागा तीरावर होता.
… मानवी रूपात विठ्ठल दर्शन घेण्यासाठी कूच करण्याचा आदेश मला महर्षींच्या ताडपट्ट्यातील वाचनातून सन २०१९ मधे दिला गेला होता …
… “मिथुन मासातील वारीच्या दिवशी पंढरपूर नावाच्या गावाला भेट द्यावी. तिथे तुला हवे ते मिळेल…”
चंद्रभागा नदीच्या तिरावर पोहोचलो, तेव्हा २५ जणांना नेणारी एक नाव जणु माझी उडी मारून बसण्याचीच वाट पाहत होती…!
ही तीर्थयात्रा होण्यासाठी मला २०१९ सालापासून ३ वर्षे वाट पाहावी लागली होती !
… आता मी चंद्रभागेच्या मंदिराकडील बाजूच्या वाळवंटात पोहोचलो होतो. अनेक दिंड्या ‘राम कृष्ण हरी ‘नामाचा जयघोष करत होत्या.
‘असे वारकरी वातावरण, अशा घोषणा माझ्या जीवनचक्राचा एक भाग कधी काळी होत्या …’ अशी भावनिकता उमटत होती.
… बरोबर छत्री नाही, मोबाईल नाही. एक छोटा टॉवेल डोक्यावर टाकून काही पैसे खिशात अशी माझी ‘रिकामी’ अवस्था होती.
साधारण ५०, ६० पायऱ्या चढून गेल्यावर वाळवंट मागे राहिले. आता अखंडपणे चाललेल्या दिंड्यांच्या मिरवणुकीत पोहोचलो. पिवळ्या रंगाच्या रेनकोटमध्ये तैनात असलेले पोलिस दल आमच्यासारख्या अगांतुकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
मी गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकत जात राहिलो. मधेच पावसाची जोरदार सर आली. वाटेत रस्त्याच्या दुतर्फा तात्पुरत्या दुकानांचे स्टॉल्स भिजलेल्या शरीराने बघत होतो. १-२ किमी झाले असतील, वाटले मला माहित नाही मी कुठे चाललो आहे ते ? फक्त चालतोय …
एका चौकात वारकऱ्यांची लगबग दोन्ही दिशेने होताना पाहून, ‘हे लोक कुठे चालले आहेत याचे भान ठेवून आहे का?’ असा मला प्रश्न पडला! हे वारकरी इथे का आलेत? कोणी निमंत्रण न देता लाखोंचा जनसमुदाय उपजीविकेचे साधन सोडून कसा जमला? त्या बदल्यात काय मिळेल ते मला कळेना! तरीही ते कैक वेळा आले आहेत, येणार आहेत …
मी त्यांच्यासोबत इथे असायलाच हवे का? त्यांच्या मानसिकतेला जोडून मी मनाने त्या वातावरणाशी जुळवून घेत होतो.
होता होता मुखदर्शन रांगेत उभे राहून माझ्या डोळ्यासमोर विठोबा माऊली दिसतेय अशी परिस्थिती आली. वेळ काही सेकंदांची होती. माझ्या मागे उभे राहिलेल्यांना मुखदर्शनाची आतुरता होती. ते ढकलत होते…
विठोबा माय माऊली,
नेत्र दर्शन मिळाले …
मी तिथून निघून गेल्यावर काही काळ तिथल्या वातावरणात राहण्याचा विचार करत होतो. म्हणून काही कोपऱ्यात जाऊन इतर मूर्ती रूपेे न्याहळत राहिलो. त्यांना प्रेमाने स्पर्श करताना या पत्थरांशी माझा भावनिक संबंध आहे असे वाटत राहिले.
विठ्ठल मूर्ती समोर मोठा मंडप मुख्यमंत्र्यांच्या स्वागतास पूजेच्या तयारीत व्यस्त होता. भरपूर फुले, हार, माळांनी, खाली पांढऱ्या शुभ्र बेडशीटने पूर्ण बिछायत सजवली होती. आमच्या सारख्या रांगेत उभ्या राहिलेल्या प्रत्येकांना त्याची झलक पाहण्याचा बहुमान मिळत होता. मी एकुलता होतो, ज्याला आजूबाजूला काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी मुख्य मंडपात परत यायचे होते…!
मंडपाच्या एका बाजूला छतावर जाण्यासाठी आणखी पायऱ्या चढून वर गेलो !
‘तुम्हाला काय वेड बीड लागले का ? लटकलेले कुलूप दाखवणाऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव तसे होते. ‘तुम्ही इथपर्यंत आलातच कसे व का ? तो सावध स्वरात म्हणाला.
त्या उंच दगडी पायऱ्या उतरताना, प्रत्येक पायरीवर शरीराच्या वजनाने पायांवर दण्णकन आपटताना, जणू काही पाय मला सांगत होते, ‘यार, तू इतका तरुण नाहीस. आमच्यावर दया कर…!
पूर्णपणे ओल्या कपड्यातल्या व्यक्तीचे कुठेही कोण स्वागत करणार ? तरीही, मी आमंत्रण मिळविण्यासाठी खटपटीत होतो! ते एकतारी वीणेकरी होते. विठ्ठल मंदिरात एकतारी वीणा धारकांना इतर कोणतेही शब्द न उच्चारता ‘राम कृष्ण हरी’ नाम जपण्याचे काम दिले जाते. या ठिकाणी ते वीणाधारी आणि सहा टाळकरी तिथल्या शुभ्र चादरीच्या मंचावर गुणगुणत्या आवाजात सतत हरिनाम घेत होते. त्यांच्यासारख्या वयस्क व्यक्तीकडून निमंत्रण मिळणे अकल्पनीय होते! तरीही मी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हाताचे इशारे करत होतो. मी असेच करत राहिलो, योगायोगाने एका टाळकऱ्याने माझ्याकडे पाहिले. मी त्याला हाताने सांगितले की मला त्यांना साष्टांग दंडवत घालायचा आहे. त्यांनी ते वीणेकरी बुवांच्या निदर्शनास आणून दिले.
कल्पना करा की स्टेजवरून कोणी बोलत असताना मधेच श्रोत्यांमधून उठून दंडवतासाठी त्यांच्याकडे स्टेज चढून वर येण्याची विनंती करणाऱ्याला ‘हो’ म्हणणे जितके असंभव असेल, तितकेच विणाधारींचा होकार मिळणे अवघड होते. पण होकार मिळाला! जाड दोरखंडांना पार करून बिना पायर्यांच्या माझ्या कमरेपेक्षा जास्त उंच मंचावर कसेबसे चढताना पाहून त्यांनी चरणस्पर्श करू दिला…
मनातल्या मनात म्हणत राहिलो ‘विठुराया, महाराजा दर्शन द्या’. डोळे डबडबले. शरीर रोमांचिले. काही सेकंद त्यांनाही सुचत नसावे की काय करावे ? मी साष्टांग दंडवत घालून त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून मी अशी करूणा भाकेन असे, कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. पुढच्या दिवशीच्या पहाटे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पसरलेल्या पांढऱ्याशुभ्र चादरीवरून उठण्यासाठी ओलसर कपड्यातील माझ्या सारख्या बोजड शरीराची अवघड हालचाल करताना वीणा मधे येऊ नये म्हणून त्यांनी वीणा उंच धरून उठायला वाट करून दिली. आवाज वाढवून हरिनाम म्हणून त्यांनी कौतुकदर्शक मानेने आनंद व्यक्त केला. माझे मन शरणांगतीच्या भावनांनी भरले होते !
… नाडी ग्रंथ महर्षींच्या आदेशानुसार विठ्ठल दर्शनासाठी येणे माझ्याकडून घडले…
तुला जे हवे आहे ते दिले आहे… तू रित्याने आला होतास ? माझ्यापुढे अहंकार रिकामा करून जा…! असे माझे मीच मनात म्हणत होतो. दूरवरून दिसणार्या पांडुरंगाच्या स्मिताला आठवून वीणाधारी रूपांतील दर्शन समाधान देऊन गेले.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
…
तुमचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची तळमळ, त्यासाठी केलेली वाटचाल आणि मिळालेला अद्भुत अनुभव वाचून मन प्रसन्न झाले. ‘मी’ पणा रिकामा करून विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याची भावना खूप सुंदर आहे. तुमच्या या लेखनाने अनेक भक्तांना प्रेरणा मिळेल.