होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
१. रंगुनी रंगात साऱ्या
रंग उधळू या, गंधित होऊ या
रंगबिरंगी जल्लोष मनसोक्त भिजूया
रंगांनाही गंध असतो
आनंद हर्ष अन्, उल्हासाचा
मनस्वी एकाकी सुख शांतीचा
बरसून जाऊदेत मेघ सावळे
समज गैरसमजाचे.
मोकळे होऊ दे
आभाळ स्वच्छ निरभ्राचे
या हृदयीची त्या हृदयी,
गाज पोचू दे प्रेमाची
निरगाठ बसू दे
स्नेह बंधांची
सकारात्मक मनांची
ज्योत समईची
सावली जणू
सूर्य तेजाची.
रंगुनी रंगात साऱ्या,
सोहळा साजरा होई
गुंतुनी गुंत्यात
साऱ्या मन मनात
उमलून जाई.
— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई
२. रंग कोणता
जो दडला तुझ्या माझ्यात, त्याचा रंग कोणता,
जो आनंद असे अंतरात, त्याचा रंग कोणता,
मुखावर जो दिसतो विश्वास, त्याचा रंग कोणता,
जो मीरा करते ध्यास, त्याचा रंग कोणता ?💕
जो नाही कळला कुणास, त्याचा रंग कोणता,
तरीहि त्याची आंस, त्याचा रंग कोणता,
चाले निरंतर श्वास, त्याचा रंग कोणता,
जो समरांगणी देई धीर, त्याचा रंग कोणता ?💕
हे वरवरचे बघ रंग, जो भिजवी हृदयाचा रंग,
जो भान हरपवी, चित्त फुलवी, मन करतो अभंग,
त्यासवे जावे, त्याचे व्हावे, धुंदीत त्या नाचावे,
जो आवडला त्याला, त्या प्रेमाचा रंग कोणता ?💕
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
३. 🌺🪷🌸।।श्रीराम।।🌸🪷🌺
कृष्ण नाम घेता रंगांचे उठती तरंग
राधा-कृष्ण गोपी भासती नृत्यात दंग ।।धृ।।
काम धाम विसरुनी वाटे उत्साह उमंग
रंगांची उधळण करीत नाचे पांडुरंग
श्याम मुरारीचे जाणिवेने होती दंग ।।1।।
षड्रिपु न राहे खेळता नवरस रंग
संगीत शब्द ताल बदलती अंतरंग
भेदा-भेद न उरे खेळता होळीचे रंग ।।2।।
सण उत्सव प्रसंगापरी भरतो रंग
गणपती नवरात्री वारीत आनंद तरंग
अवघा बने एक रंग रंगी रंगे श्रीरंग ।।3।।
*“होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”*💐
— रचना : श्री अरुण गांगल. कर्जत, रायगड
४. है ..
होलिकोत्सव सण रे
खरा असे प्राकृतिक
वैशाखी नव पालवी
निसर्ग रे कौसृतिक
पुरातन अमोल ठेवा
महानता सांस्कृतिक
एकत्र आणी सकला
सूर जुळे सांगीतिक
हानी रे पर्यावरणाची
निसर्ग राजा अगतिक
उलटी चालले पाऊले
कसे सणाचे कौतिक
कृतज्ञता विसरलेली
विरली स्व प्रकृतिक
वृक्षतोड मुळापासून
कृत्ये करी नैकृतिक
हवामान हो प्रदुषित
वेदना होई अत्यंतिक
छेडछाड संधी साधे
नाते विसरले नैतिक
ऑनलाईन नव होली
रंग उधळे सांकेतिक
प्रगत युगात बदलावे
शिक्षणा दिसो प्रतिक
प्रल्हादाचे जाणसत्व
होली कथा दृष्टांतिक
हिंदूचासण न केवळ
बनो उत्सवजागतिक
–– रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
५. होळी ..
दुकान खोले सकाळी
दारात उभी गुंडा टोळी
वर्गणी पुस्तक छापले
पैसे काढे आली होळी
वर्गणी बनली खंडणी
तोंडी अफू गांजागोळी
पावती फाडते निमूटते
जनता जनार्दन भोळी
पेटे जागोजागी होळी
बोंबा ठोके सायंकाळी
परंपरा महत्व कळेना
दिसते का बाजूकाळी
विद्रुप स्वरुप सणाला
निसर्गाची राखरांगोळी
रंगाचा का बेरंग करता
करे राडारोडी आंघोळी
पुरे कत्तल ही झाडांची
थांबवा टिंगल टवाळी
सण चांगला आनंदाचा
आवर भाषा शिवराळी
क्षणीक आनंदा साठी
दुर्भाग्य लिहतो भाळी
पावसास्तव पश्चात्तापे
उगाचं आसवा ढाळी
पवित्र सण असे होळी
संस्कृति कथा आगळी
बदलाव हवा जरासा
सांकेतिक होळीवेगळी
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800