Sunday, March 16, 2025
Homeसाहित्य४ अ ल क, १ कविता

४ अ ल क, १ कविता

नमस्कार मंडळी.
आज आपल्या पोर्टल वर बंगलोर येथील लेखिका, कवयित्री परवीन कौसर यांच्या ४ अ ल क आणि १ कविता प्रसिद्ध करीत आहोत. हा प्रयोग आपल्याला कसा वाटला ? हे अवश्य कळवा.
– संपादक


मुलीची सैन्य भरती झाली तशी ती खूप आनंदली. पटकन तिने हार घेऊन भिंतीवर फोटोवर चढवला आणि म्हणाली,
“मुलगा होऊ दे किंवा मुलगी त्याला मी तुमच्या सारखाच शूरवीर सैनिक करणार हे तुम्हाला दिलेले वचन आज मी पूर्ण केले.”


लज्जेचे पांघरूण घेऊन असलेली ती. नेहमीच तिला आदर्श सून म्हणून बघितले जायचे. पण आज मात्र तिने सर्व जगासमोर आपल्या नवऱ्याच्या माथ्यावर आपले ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतले. तिला आज शहीदाची पत्नी बनण्याचा बहुमान मिळाला होता.


रोज रात्री दारू पिऊन येऊन तो तिला खूप मारहाण करायचा आणि ती निमुटपणे सहन करायची. “आई तू रोज मार खाते कधीही प्रतिकार करत नाही.का राहतेस इथे ? घर सोडून निघून जा ?” तिचा मुलगा म्हणाला.
तेव्हा ती म्हणाली, “मी लग्न करून आले तेव्हापासून ही तुळस अंगणात आहे. कितीही उन वारा पाऊस येऊ दे, तिने हे वृंदावन सोडले नाही आणि मी हा उंबरठा ओलांडला नाही.”


लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांत नवऱ्याचे अचानक एका अपघातात निधन झाले तेव्हा तिला अपशकूनी म्हणून घरच्यांनी घराबाहेर काढले. तेव्हा तिने निश्चय केला की आपण आपला आत्मविश्वास डगमगू न देता आपले स्वप्न सत्यात उतरवायचे. तिने एका अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेत काम सुरू केले. तेव्हा तिला जाणीव झाली की आपण एकटेच नाही तर आपल्या सारख्या अनेक स्त्रिया या अंधश्रद्धेच्या बळी पडलेल्या आहेत.

कविता : पुन्हा नव्याने

वाट पहावी पुन्हा नव्याने
तुझीच व्हावे तनामनाने

तुलाच अर्पण सारे जीवन
पुन्हा नव्याने स्वप्न पहावे

मिठीत तुझिया विरून जावे
मेघ झरावा हिरवे व्हावे

पुन्हा नव्याने तुला स्मरावे
नयनी माझ्या तूच दिसावे

आस तुझी या मनास लागे
भेट जिवाशी उरेल मागे

परवीन कौसर

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments