Homeसाहित्यखरा डॉक्टर

खरा डॉक्टर

‘वैद्यकी ही आपलं व्यक्तिगत आयुष्य
झिजविणारी आहे सजविणारी नव्हे
हे गृहीत धरून तिला वाहून घेतलेला
तो एक खरा डॉक्टर आहे

आटविल्याविना स्वतःचं रक्त
वाढविता येत नाही रुग्णाचं
हेही तो जाणतो स्वीकारताना
एकाचवेळी अनेकांचं दायित्व.

रुग्ण आधीच त्याचे रिपोर्टस्
डॉक्टरच्या पुढ्यात येणाऱ्या
या काळात, तो प्राधान्य देतो
पारंपारिक नाडी परीक्षेस
उपकरणांपेक्षा अधिक विश्वास
त्याचा आहे स्वतःवर म्हणून

त्याला महत्त्वाचा वाटतो त्याचा
व्याधिताशी थेट संवाद.
त्याला मान्य नाही डॉक्टरनं
रुग्णाचा ‘रिमोट कंट्रोलर’ होणं !
हातात हात घेत स्पर्शातून
अन् नजरेत नजर मिळवत
दृश्यस्वरूप, तो जोडतो
दुखणाईताशी सख्य
समोरच्या अत्यवस्थ जीवास
डॉक्टरचे आश्वासक चार शब्द
संजीवक ठरू शकतात
हे पाठ्यपुस्तकं वाचून नव्हे
तर पीडितांचे चेहरे वाचून
त्याला उमजलेले आहे.

हटविल्याशिवाय वैद्यकीय अजाणतेपण
हटणार नाहीत अंधश्रद्धा
म्हणून व्यक्तीप्रमाणे समूहाशीही तो
संवाद साधत राहतो लोकशिक्षक बनून.

परदुःखास मानतो तो आत्मीय दुःख
आणि रुग्णाजागी मानतो
आपल्याच घरातील कुण्या जिवलगास
जे कळताच शंकेखोरालाही
पटते त्याची व्यावसायिक निष्ठा आणि नैतिकता.

त्याच्या शर्थीच्या प्रयत्नांनी
पुनर्जन्म झालेला रुग्ण
त्याला अर्पण करतो देवपण;
तेव्हा देवालाच देत ते श्रेय,
तो झाकून टाकतो सोसलेले
टाकीचे घाव, आतल्या आत.
कर्तव्यपूर्तीच्या समाधानात
घडतो त्याचा श्रमपरिहार.

रुग्णांची गर्दी म्हणजे
वेदनांचं वारूळ असतं त्याच्या भोवतीचं,
ज्याची धग सोसत सोसत
निरामयतेचं राऊळ त्याचं
त्याला बनवायचं असतं
घाट चढणीच्या प्रवासा आणि सारखा
असतो हा प्रवासही त्याचा
मधली वाट नसलेला !

घड्याळाकडं पाहायलाही
वेळ नसतो त्याला
तरीही त्याचे उपचार
तुंबलेल्या फायलींचा निपटारा केल्यागत
निर्विकार उरकाउरकीचे कधीच नसतात
असं खुद्द त्याचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकच
सांगत असतात.

विनाप्रार्थना प्रसन्न असते
त्याच्यावर लक्ष्मी
परंतु तो खरा डोळस
उपासक आहे सरस्वतीचा
कालच्या ज्ञानबलावर
भिडता येणार नाही
उद्याच्या आव्हानास
हे ओळखून
तो करीत असतो
त्याची पूर्वतयारी आज.

इस्पितळाबाहेर, समाजात
त्याचा आदरानं उल्लेख होतो
एक ‘देवमाणूस’ म्हणून
तेव्हा भुरळून न जाता
तो राहतो ठाम सावध
नेहमीसारखाच.
कारण तो विसरत नाही कधीच
की देवमाणूस म्हटलं तरी
अखेर तो आहे माणूसच
ज्याच्यात निसर्गतःच असतो
‘हातून चूक घडणे’ हा दोष !

कमाल जागरूकता जोपासूनही
पापणी लवण्या दरम्यान
घडू शकते अनवधान,
ज्यातून पुढं काहीही ….!
म्हणूनच,
क्वचित, न कळत होणाऱ्या
एखाद्या तांत्रिक चुकीसही तो
स्वतःस धरतो जबाबदार
आणि अनुतापानं होरपळत
सूधारून घेतो ते न्यून.

आपण कितीही शिकलो तरी
निसर्ग हाच आहे शेवटी
सर्वश्रेष्ठ डॉक्टर
हे तो विसरत नाही .
आपण ज्याचे चिकित्सक आहोत
त्या मानवी तनामना बद्दलचंच
आपलं ज्ञान आहे अपूर्ण अजून
आणि या अज्ञानातून घडू शकते चूक,
हेही तो विसरत नाही कधीच
म्हणूनच,
‘कायम बरोब्बरच असते
आपल्या डॉक्टर सायबांची चिकित्सा’,
हे त्याच्याबद्दलचं त्याच्या
श्रध्दाळू रुग्णांचं मत ऐकून,
तो थाटत नाही ऐट आणि
मानत नाही स्वतःला सर्वज्ञही !

एकसुरी वाटत नाही
त्याला त्याचा दिनक्रम
त्याच्या सजग जिज्ञासेमुळे
त्याच्या दृष्टीनं
रोज तेच ते काम करणं
म्हणजे नसतं त्याच्या
हातगुणाचं प्रदर्शन मांडणं !
वा श्रीसंचयात भर टाकणं !!
तर ते असतं, हातून
चुकूनही होऊ नये चूक, म्हणून
अचूकतेची उजळणी करणं.

‘वैद्यकीत, अचूकता ही
मिरवायची नसते
तर ती गिरवायची असते
हा विचार आचरणारा
तो आहे एक खरा डॉक्टर.

— रचना : डॉ. दिलीप पां. कुलकर्णी. कुरुंदवाड, जि.कोल्हापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 986948480

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments