एक विचारू ? तुम्ही “अग बाई अरेच्चा”हा मराठी चित्रपट पाहिला का ? सांगा बरं ? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन ? बरं नसेल पाहिला तर आवर्जून पहा. खूप छान व वेगळीच गोष्ट आहे.त्या नायकाला ना महिलांच्या मनातील ऐकू येतं ! आता एक कल्पना करा तुमच्या बाबतीत असे काही झाले तर ? किती गम्मत असेल ना ! लई भारी ! मग आज जाणून घेऊ सर्वांच्या मनातलं आणि ह्या कोरोनामुळे आलेला मानसिक ताण काहीसा हलका करू या .त्यामुळे तुमचा मूड ही मस्त होईल आणि काही तरी नवीन जाणून घेतल्याचा आनंदही मिळेल. तर चला जाणून घेऊ मनातलं. हो , हो , मनातलं !
पालकांच्या मनातलं
आता आपण सर्व पालक वर्ग . काय बरं चाललेलं असत आपल्या मनात ? हेच ना की आपली मुलं चांगली शिकावी , मोठी व यशस्वी व्हावीत , त्यांची प्रगती व्हावी व स्वावलंबी होऊन त्यांनी आई वडिलांचे नाव मोठे करावे. एवढीच प्रामाणिक इच्छा असते प्रत्येक आई वडिलांची. आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर कायम हसू असावे व त्यांनी आयुष्य आनंदाने जगावे. वाटेत येणाऱ्या अनेक अडचणींचा त्यांनी धैर्याने सामना करून पुढे जावे. पालक खूप कष्ट करतात. अनेक त्याग ही करतात केवळ मुलांच्या उज्वल भविष्यासाठी. असे हे निस्वार्थी प्रेम करणारे आई वडील.
मुलांच्या मनातलं
आता मुलांच्या मनात डोकावून पाहू यात. मुलांची पालकांकडून एकच अपेक्षा असते की , त्यांनी आपल्याला समजून घ्यावे व त्यांच्या अपेक्षांचे ओझे आपल्यावर कदापीही लादु नये. तू हेच कर,तू तेच कर. अथवा तू मोठेपणी डॉक्टर अथवा इंजिनीअर झालाच पाहिजे, असे नको. मुलांच्या आवडी निवडी, त्यांच्या कला छंद जोपासायला त्यांना प्रोत्साहन द्यावे. सतत सूचना करून त्यांच्या मागे लागू नये. त्यांचे मित्र म्हणून त्यांना समजून घ्यावे . जेणे करून ते आपल्याला सर्व गोष्टी आवर्जून सांगतील व योग्य निर्णय घेतील.
घरातील जेष्ठ
घरातील जेष्ठ व्यक्तींचा आनंद आपल्या मुलांच्या सुखात असतो. मुलांनी, सुनांनी व नातवानी भरलेल्या कुटुंबात ते अतिशय आनंदी असतात.आपले हे सर्व गोकुळ खुश असावे अशी कायम प्रार्थना करतात.नातवांशी गप्पा गोष्टीत व खेळण्यात त्यांचे मन रमते. अनेक वर्षे कष्ट करून आता ते दमलेले असतात . केवळ सर्वांनी आपली विचारपूस करावी व कुटुंबाची सोबत कायम लाभावी हीच त्यांची निरागस इच्छा असते. त्यांना सर्वांचा सहवास हवा असतो. ह्या वयात त्यांना एकटेपणा असह्य होतो. सुनेने मस्त चमचमीत पदार्थ करून खायला घालावे असे वाटते. आणि एक गोष्ट ज्याची त्यांना फार भीती असते ते म्हणजे त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ कधीही येऊ नये.
बायकांच्या मनातलं
आणि आता थोड बायकांच्या मनातलं जाणून घेऊ या .असे म्हटले जाते बायकांच्या मनातील त्या ब्रह्मदेवाला देखील समजू शकत नाही.बायकांच्या मनात अनेक विचार असतात.खरे तर ती नेहमीच आपल्या कुटुंबाच्या विषयी विचार करत असते. कारण तेच तर तिचे विश्व असते.ती स्वतःसाठी कधी जगते ? आपल्या कुटुंबाच्या बाबतीत ती अतिशय भावनिक व हळवी असते.ती खूप बोलते, चिडते, राग राग ही करते .मात्र आपलं कुटुंब तिच्या साठी सर्वस्व असतं. त्यांच्या सुखदुःखात तीच ठामपणे उभी राहते. तिच्या नवऱ्याने कधी तरी तिला एखादे सरप्राइज द्यावे असेही वाटते. आणि असं होतं, तेव्हा ती जाम खुश होते.ती भेट म्हणजे फार महागडी वस्तूच असली पाहिजे असे अजिबात नाही बर का ! एखादा सुंदर गजरा देखील आणला तरी तिला आनंद मिळतो . तिच्या चेहऱ्यावर छान हसू येते .कारण त्यात्तील प्रेम तिला दिसते.हेच तर तिला हवे असते !अगदी लहान लहान गोष्टीतून तिला आनंद मिळतो. अशी ही कोणालाही न समजणारी , घराला घरपण आणणारी स्त्री घराचा आधारस्तंभ असते. आपल्या कुटुंबाला कोणाची दृष्ट लागू नये एवढीच तिची इच्छा असते .
मैत्रीचे नात
आता सर्व नात्यांच्या पलिकडे हे मैत्रीचे नाते. ह्यात कोणत्याही अपेक्षांचे ओझे अथवा अटी तटी नसतात. खरी मैत्री अतिशय पवित्र व निर्मळ असते.मैत्रीची सर्वात सोपी परिभाषा म्हणजे तुझ्या साठी काही पण ! वेळी अवेळी धावून येणारी ही अशी ही मैत्री असावी .तुमच्या हसण्यामागील दुःख ही ओळखु शकते ही मैत्री. तुमच्या भावना समजू शकते ही मैत्री. मैत्री ही नाव, प्रतिष्ठा,पैसे घर बघून नव्हे तर स्वभाव बघून केली जाते आणि एकदा का सूर जुळले की आजन्म साथ देते ती मैत्री. मनातील सांगण्याची हक्काची जागा. ती रागावते, चिडते मात्र काहीही झाले तरी अबोला धरू शकत नाही . अशी ही खरी मैत्री न दिसणारी पण मनापासून जपणारी .तुमचे अंतर मन जाणणारी ही मैत्री. अशी ही सुंदर नाती जी सर्वाना जोडून ठेवतात व जगण्याचा आनंद द्विगुणित करतात.त्यामुळे ह्या सर्व नात्याना वेळ द्या .जाणून घ्या त्यांच्या मनातलं. जेणे करून ही सर्व नाती नव्याने बहरतील, फुलातील व सुगंधाने दरवळतील.आज नेहमीपेक्षा जास्त वेळ आहे तर जाणून घ्या मनाच्या गाभाऱ्यातील ह्या नाजूक व अदृश्य काही गोष्टी व विश्वासाच्या धाग्याने जपा ही सर्व नाती.
लेखन : रश्मी हेडे
संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800