ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २०१७ साली झालेल्या चौथ्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विदर्भातील प्रसिद्ध गझलगायक सुरेश दंडे यांची ओळख झाली आणि अल्पावधीतच त्यांच्या निरलस, निगर्वी स्वभावामुळे आमच्यात मैत्रीचे स्नेहबंध निर्माण झाले. जाणून घेऊ या, या मनस्वी कलावंताचा जीवन प्रवास….
नागपूर येथील ख्यातनाम संगीतकार आणि गायक व्ही. एस. उपाख्य बाबूराव दंडे यांचे सुपुत्र असलेले सुरेश दंडे हे मराठी गझलगायकीच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. सुरेश दंडे यांचे वडील बँकेत अधिकारी होते. वडिलांची नोकरी बदलीची असल्याने सुरेश यांचे शिक्षण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाले.

तसं पाहिलं तर संगीत हे सुरेशजींकडे वारसाहक्कानं आलं आहे. त्यांना वडिलांकडून संगीताचे संस्कार मिळाले. संगीताचे धडे त्यांनी वडिलांकडूनच घेतले. भारतीय जीवन विमा निगममधून विकास अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले सुरेश दंडे गेली ३० हून अधिक वर्षे आकाशवाणी, दूरदर्शनसह देश विदेशात मराठी-हिंदी गझलचा प्रसार-प्रचार करत आहेत.
सुरेशजींनी देशभरात मराठी व हिंदी गजलांवर आधारित ‘फजा-ए-गजल’, ‘स्टोरी ऑफ गजल’, ‘यादे मनशा’, ‘आईना-ए-गजल’, ‘दिलकश लम्हे’, ‘गजलो के रंग-गीतों के संग’ असे कार्यक्रम सादर केले आहेत.
महाराष्ट्र राज्यात मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, रत्नागिरी येथे तर राज्याबाहेर दिल्ली, जयपूर, हैद्राबाद, रायपूर, बिलासपूर, सिवनी, बालाघाट, माऊंट अबू आदी ठिकाणी आतापर्यंत ५०० हून अधिक सांगितिक मैफलींचं सादरीकरण केलं आहे. या शिवाय त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरून देखील गायनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. ‘गोल्डन मेमरीज’ या जुन्या-नव्या हिंदी चित्रपटातील गीत आधारित कार्यक्रमाचे देशभरात १०० च्यावर प्रयोग सादर केले आहेत. मुंबईतील ‘स्टडी सेंटर ऑफ फॉरेन लँग्वेजेस’ च्या वतीने दीनानाथ मंगेशकर सभागृहात जपानचे डॉ. साकाकीसान यांच्या उपस्थितीत ‘महफिल-ए-गजल’ कार्यक्रम सादर केला आहे.
कवीवर्य सुरेश भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २००९ मध्ये अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ‘रंग माझा वेगळा’ कार्यक्रमाचे आयोजन केले असून याच प्रामुख्याने ‘सारेगमप’ फेम शशांक दंडे, सायली पानसे, आणि यज्ञेश्वर लिंबेकर यांनी सुरेश दंडे यांनी स्वरबद्ध केलेल्या सुरेश भटांच्या गीत-गजलांचं सादरीकरण केलं.
सुरेश भट यांच्या गझलांच्या प्रसारासाठी सुरेशजींनी नागपूर येथे ‘स्वरविहार’ ही संस्था स्थापन केली असून त्या द्वारे नवोदित गायकांना ते मार्गदर्शन करतात. तसेच या संस्थेमार्फत देशभरात सांगितक मैफलींचं आयोजन करीत असतात.
कामठी कॅन्टॉनमेंट तसेच नागपूरचे चिटणीस सेंटर येथेही त्यांनी अनेक गजल मैफली सादर केल्या आहेत. विविध गायन स्पर्धेत परीक्षकाची भूमिदेखील त्यांनी बजावली आहे.
संत मोरारीबापू यांचेही आशीर्वाद सुरेश दंडे यांना लाभले असून त्यांच्या उपस्थितीत गीत-गजलांचे सादरीकरण करून सुरेश दंडे यांनी मोरारीबापू यांचे मन जिंकले. यावेळी बापूंच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला.
हैद्राबाद चाप्टर तर्फे रॅडिसन प्लाझा व ज्युबिली हिल्स हॉटेलमध्ये आयोजित ‘इंडो ब्रिटीश स्कॉलर्स मीट’मध्ये (जीएसटी कमिशनर डॉ.फईम अहमद यांच्या उपस्थितीत) गजल मैफिल सादर केली होती.
सांगितक मैफलींच्या निमित्तानं देशातच नव्हे, तर देशाच्या बाहेरही सुरेश दंडे यांनी आपल्या गायनाची मोहोर उमटविली आहे. २०१८ साली अमिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू धनंजय केसकर यांच्या उपस्थितीत गीत-गजलांची मैफल सादर केली. पॅरीस, स्वित्झर्लंड आदी युरोपियन देशात गझलचे सादरीकरण केले आहे. याशिवाय सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे २०१७ साली झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलनात गझलगायक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.
सुरेशजींनी अनेक शायरांच्या गजला स्वरबद्ध केल्या असून त्या विविध मंचांवरून सादर केल्या आहेत. यात गझलकार माधव बोबडे यांच्या गझलांवर आधारित ‘नक्षत्रे माळताना’ तसेच शिरीष नाईक यांच्या ‘जिंदा जरूर हूँ’ असे कार्यक्रम त्यांनी आपली जन्मभूमी असलेल्या नागपूरात सादर केले आहेत.
आपल्या सुरेल गायकीने त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित नागपूरचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. सुवर्णा केवले तसेच प्रसार भारतीचे डॉ. पाराशर आदी मान्यवरांची मने जिंकली.
२०१९ साली पु. ल. देशपांडे, सुधीर फडके तसेच ग. दि. माडगुळकर या त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं चंद्रपूर आणि मुलचेरा येथे गझलगायन कार्यशाळेतून त्यांनी विद्यार्थ्यांना गायकीचे धडे दिले आहेत. कॅसेटस् आणि सीडीजच्या माध्यमातून त्यांची गायकी घराघरात पोहोचली असून २०१३ साली प्रसारित सुरेश भटांच्या गझलांवर आधारित ‘रंग माझा वेगळा’ हा त्यांचा संग्रह बहुश्रूत आणि रसिकप्रिय ठरला.
तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या हस्ते मंत्रालयात मान्यवरांच्या हस्ते या संग्रहाचं विमोचन झालं होतं, हे विशेष.
प्रख्यात गायक सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, प्राजक्ता शुक्रे यांच्यासह ‘तेव्हा नसेन मी’ या मराठी गाण्यांच्या अल्बममध्ये सुरेशजींनी गायन केलं असून “फाऊंटन” या नामांकित म्युझिक कंपनीने काढलेल्या संग्रहाचे विमोचन ‘मनसे’ पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत झाले आहे. अनेक सांगितिक कार्यक्रमातून त्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. श्री.श्री. रविशंकर यांच्याद्वारे प्रस्तुत ‘अंतर्नाद’ आणि ‘लयतरंग’ कार्यक्रमात त्यांचा सहभाग राहिला आहे. हिंदी, उर्दू गजलचे अभ्यासक डॉ. विनय वाईकर यांच्या ‘आईना-ए-गजल’ या गझलकोषातही त्यांचा सहभाग आहे.
आंध्रप्रदेश सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या वतीने हैद्राबाद इथं झालेल्या ‘दिलकश लम्हे’ या बहुभाषिक गजल महोत्सवातदेखील त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. सीटी न्यूज, अमरावती वाहिनीच्या ‘सुरों की जंग, या सांगितिक रियलिटी शोचे ते समन्वयक तथा परीक्षक देखील होते.
सुरेशजींच्या सांगितिक कार्याची दखल घेत अनेक संस्था, संघटनांनी त्यांना सन्मानित केले आहे. ‘गोल्डन मेमरीज’, जुन्या अवीट हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम, मराठी गजलांवर आधारित ‘रंग माझा वेगळा’ तसेच ‘नॉस्टॅल्जिक’ असे विविधरंगी स्वतःचे कार्यक्रम ते सादर करत असतात. त्यांच्या या कार्यक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक तसेच संगीताचे दर्दी असलेले अरविंद इनामदार, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, गझल गायक हरीहरन, भजनसम्राट अनुप जलोटा, संगीतकार रवी दाते आदी मान्यवरांनी प्रशंसोद्गार काढले आहेत.
सुरेशजींची भव्यदिव कारकीर्द असून देश विदेशात कार्यक्रमाकरिता त्यांना निमंत्रित करण्यात येत असते.
सुरेशजींच्या सांगितिक कार्याची दखल घेत अनेक संस्था, संघटनांनी त्यांना सन्मानित केले आहे.
मध्यभारत स्तरावरील ‘नवरत्न प्रतिभा’ हा पुरस्कार तसेच प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांच्या जन्मगावी सावळापूर येथे पं. वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्काराने सुरेश दंडे यांच्या सन्मानात भर घातली आहे. औरंगाबाद येथे आयोजित द्वैभाषिक गझल संमेलनात तत्कालीन मंत्री फौजिया खान यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हैद्राबाद येथील रवींद्र भारती सभागृहात आयोजित राष्ट्रीय गजल महोत्सवात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मविभूषण डॉ. सी. नारायण रेड्डी यांच्या हस्तेदेखील त्यांचा सन्मान झालेला आहे. २०१३ साली पाँडेचरी येथे झालेल्या हिडन पोटॅन्शियल कार्यक्रमात श्री संत ज्ञानेश्वरांचं ‘पसायदान’ सादर केल्याबद्दल यू.एस.ए. येथील वर्ल्ड म्युझिक थेरपी संघटनेच्या अध्यक्षा प्रो. डॉ. अॅनी हेडलचिट यांच्या हस्तेदेखील त्यांचा सन्मान झालेला आहे.
केवळ स्वतःचीच गायन प्रतिभा न जोपासता समाजात संगीत विषयक प्रेम वाढीस लागावं यासाठी सतत प्रयत्न करत असलेल्या सुरेशजींच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
हा जीवन लेख लिहिण्यासाठी श्री संजीव वेलणकर यांच्या लिखाणाचा उपयोग झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800
सुरेश नाव असलेले सर्वांना मी उच्च पदावर विराजमान होताना पाहिले आहे .