मागच्या भागात सकाळ आणि परुळेकर यांच्याविषयीच्या आठवणीना सुरुवात केली. त्यांची शिस्त सांगितली. या महान पत्रकाराच्या स्वभावाची दुसरी बाजू आजच्या या भागात :-
शाई सुकून गेली
एखाद्या कर्मचाऱ्याची चूक झाली की नानासाहेब कोणत्या शब्दात खरडपट्टी काढतील याचा नेम नव्हता. मूर्ख आहात, गाढव आहात असे शब्द प्रहार वगैरे नेहमीचेच असत. पण विशेष प्रसंगी यापेक्षाही अधिक उग्र रूप धारण व्हायचे.
आमच्या एका जाणत्या बातमीदाराने एकदा मोठी गफलत केली होती. एका नगरसेवकाची एका समाजसेविकेशी लोकांना लक्षात येण्याजोगी जवळीक होती. खाजगीत त्या बद्दल चेष्टामस्करी चालायची. पण उघड अर्थातच कोणी बोलत नसे. ते दोघेही हजर असतानाच्या बैठकीची बातमी लिहिताना या बातमीदाराने नगरसेवकाचे आडनाव त्या समाजसेविकेला लावले. ती गफलत नकळत झाली होती, यात मला तरी शंका वाटत नाही. कदाचित त्या दोघांच्या प्रकरणाची चर्चा ऐकून ती डोक्यात असताना बातमी लिहिली गेली असावी म्हणून ती गफलत झाली असावी.
उपसंपादकांच्या लक्षात गफलत आली नाही. बातमी आहे तशीच प्रसिद्ध झाली. साधारण अकराच्या सुमाराला ही समाजसेविका सकाळ कार्यालयात तणतणत प्रवेश करताना दिसली. आणि या बातमीदाराचे धाबे दणाणले. बातमीदाराने बाईंना बाहेरच थांबवून हातापाया पडून माफी मागितली. पण व्यर्थ. नानासाहेबांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले. बातमीदाराला केबिनमध्ये बोलावून घेतले. बाहेर संपूर्ण हॉल भर शांतता पसरली. “लाज वाटत नाही तुम्हाला ? या बाईच्या जागी मी असतो तर पायातली वहाण हाणली असती” अशा आशयाचा संताप नानासाहेबांच्या मुखातून बाहेर पडत होता. हा बातमीदार सकाळमध्ये खूप ज्येष्ठ होता, वयाने आणि अनुभवाने. पण त्याला क्षमा नव्हती.
उपसंपादकांविषयी नानासाहेबांची मते काही वेगळी होती. ”बुधवार पेठेतील मोलमजुरी करणाऱ्या गड्या सारखे आहात“ अशी वागणूक या सुशिक्षित संपादकांना पूर्वी मिळायची म्हणे. प्राईस पे शेड्युल च्या केस मध्ये नानासाहेबांनी केस लढवली तेव्हा आणि इतरही अनेक ठिकाणी आणि “माझ्याकडे सबएडिटर्स नाहीत, ट्रान्सलेटर आहेत” असे ते अत्यंत कडवटपणे सांगत.
एकदा लंडन टाईम्स मध्ये आलेल्या एका लेखाचे भाषांतर थोडक्यात करून द्या म्हणून त्यांनी मला सांगितले होते. त्याप्रमाणे ते करून पाठविले. त्यात काहीतरी चूक झाली अशा अर्थाचा निरोप आला’
मी गोंधळून गेलो. टाइम्स मधला मजकूर पुन्हा वाचला. मी केलेले भाषांतर बरोबर वाटत होते. तसे त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “तपशील बरोबर आहे याची खात्री केली का संदर्भ तपासून ? नाही ना ? मग नुसते भाषांतर बरोबर असल्याचे काय सांगता ? उपसंपादक सर्व ठिकाणी सारखेच गाढव असतात ! सकाळ असो टाइम्स ऑफ इंडिया असो, किंवा लंडन टाईम्स असो. जा आता असं सांगून माझी बोळवण केली होती. या पुढे मी काय बोलणार !
आपले दैनिक टांगेवाल्यांचे
“आपले दैनिक टांगेवाल्यांचे” या नानासाहेबांच्या अट्टाहासापायी अनेक वेळा माझ्यासारख्या उपसंपादकांची तारांबळ उडे. कथा कादंबऱ्यांतून किंवा इतर दैनिकातून आत्मसात केलेले मराठी इथे उपयोगाचे नव्हते. येथे हवे सर्वसामान्यांना चटकन समजणारे मराठी.
“लष्करास पाचारण केले” असा आठ कॉलमी बॅनरचा मथळा वाचून नानासाहेबांनी रात्र पाळीच्या उपसंपादकाला बोलावून विचारले. याचा अर्थ काय ? उपसंपादकाने ”लष्कर बोलावले” असे उत्तर दिले. मग तसं का म्हणत नाही ? “पाचारण केले” कशाला ? माझ्या टांगेवाल्यांना असे मराठी समजत नाही. सोपे लिहा. शिवाय एक शब्द नाही का वाचला ?
“ध्वजारोहण केले” ऐवजी “झेंडा फडकविला” हवे असायचे.
पण अखिल भारतीय काँग्रेस ऐवजी मात्र ऑल इंडिया काँग्रेस किंवा “भारत” ऐवजी “हिंद” असे लिहावे लागे. ते तसे का याचे मला उत्तर मिळत नसे.
मजकूरासाठी जागा वाचवण्याच्या सोसापायी दैनिक सकाळची भाषा टिंगलीचा, टवाळीचा विषय बनला होता हे खरे. हेडिंग मध्ये सर्व काही तपशील आला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणून “पाक चीन मदत अशक्य: अमेरिकन लष्कर गोट अंदाज”असे एकमेकात शब्द मिसळलेले सरसकट दिसायचे.
पूर्वी सकाळमध्ये असलेले बातमीदार/उपसंपादक सुधाकर अनवलीकर संपूर्ण रामायण सकाळ स्टाईल मध्ये बसवून दाखवायचे. “मांडी फोडीन भीम प्रतिज्ञा” असे हेडिंग सकाळ मध्ये आले असते, असे ते गमतीने सांगत. ऐकणार्याला खरंच वाटायचे. आमच्या पत्रकार कंपूचा करमणुकीच्या तो एक विषय असायचा. असे असले तरी वृत्तपत्रातील नीतीच्या मूलभूत तत्त्वांची जपणूक मात्र नानासाहेब अतिशय जागरूकतेने करीत. “आपल्या” माणसाच्या विरुद्ध असलेली बातमी दडपणे असा प्रकार घडत नसे.
पत्रकाराची नीतिमत्ता
त्यांनी पायाभरणी केलेल्या एका कारखान्याच्या मालकाने वर्षभरात काही अफरातफर केली. पोलिसच ही बातमी सकाळ पर्यंत पोहोचवणार याची त्याला खात्री होती. तो सकाळ उपसंपादकाला भेटून ती बातमी देऊ नका असे सांगू लागला. नानासाहेबांचे आणि आपले संबंध किती घनिष्ट आहे याचा दाखला देऊ लागला. उपसंपादक जुमानत नाही हे बघून तो कारखानदार स्वतः नानासाहेबांना भेटायला गेला. पाच मिनिटात बाहेर आला. “बातमी छापू नका” असा निरोप द्यायला मला नानासाहेबानी सांगितले असं सांगून तो जाऊ लागला. तेवढ्यात इंटरकॉमवर नानासाहेबांनी बातमी ठळकपणे पहिल्या पानावर प्रसिद्ध करा असे उपसंपादकाला सांगितले !
कधीकधी गमतीदार प्रसंग निर्माण होत. नानासाहेब एका कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गेले होते. संपूर्ण बातमी लिहीपर्यंत रात्रीचे अकरा वाजले. इतर महत्त्वाच्या बातम्या होत्या म्हणून उपसंपादकांनी तो मजकूर “उद्या वापरा” असा निरोप लिहून फाईल मध्ये ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी शहरातील अन्य दैनिकात नानासाहेबांच्या फोटोसकट सविस्तर आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ती शिल्लक राहिली. आता बातमी खूप शिळी झाली होती. घरी जाता जाता नानासाहेब वृत्त संपादकांना एवढंच म्हणाले की माझे भाषण तुमच्या उपसंपादकाला महत्त्वाचे वाटत नसेल तर निदान कार्यक्रमाचा फोटो तरी टाका !
अमेरिका धार्जिणे, कम्युनिस्ट विरोधी धोरणे अशा त्यांच्या अनेक विचारांशी आम्ही सहमत नसू. संप विरोधी धोरण, अमेरिका धार्जिणे धोरण, दैनिकाची सजावट म्हणजे लेआउट असे अनेक विषय असायचे. पण त्याला इलाज नसतो हे देखील ठाऊक होते. शिकस्त करून सुद्धा त्यांच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असत.
पृथ्वी वर नियंत्रण असलेले रिमोट कंट्रोल चे “ल्युनोखोड” यान चंद्रावर उतरले, त्या रात्री मी रात्रपाळीला होतो. मला ती बातमी मोठी वाटली. म्हणून ज्येष्ठ सहकाऱ्याला आठ कॉलमी मथळा देऊ का असे सुचवले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या अंकात पानभर पसरणारे बॅनर मी दिले. त्यावर नानासाहेबांनी “यात रशियाने काय मोठे केले ? अमेरिकेचा माणूस चंद्रावर उतरला, हे उपसंपादकाला माहीत नव्हते का ?” असा मेमो पाठविला.
प्रखर रशिया आणि कम्युनिस्ट विरोध हे नानासाहेबांचं वैशिष्ट्य होतं. सर्वसामान्य जनतेत क्रांती करण्याचे ध्येय कम्युनिस्ट सारखेच त्यांचे देखील होते. त्यांची पद्धत मात्र पूर्णतः वेगळी होती. त्यांना सामाजिक जागृती हवी होती. सकाळ द्वारे ते राजकीय मार्गदर्शनापेक्षा सामाजिक प्रगती, अधोगती चे दर्शन समाजाला देत. आतापर्यंतच्या मराठी पत्रकारितेपेक्षा हे सर्व एकदम वेगळे होते. केसरीच्या टिळकांना “तेल्या तांबोळ्यांचे पुढारी” म्हणत. माझ्यासारख्या आधुनिक पत्रकार बनण्याची स्वप्न पाहणाऱ्याला टिळक हे पत्रकार तर होतेच पण मला ते राजकीय जागृती करणारी थोर विभूती वाटतात. लोकमान्य टिळक, आगरकर, परांजपे, खाडिलकर, केळकर, महात्मा गांधी, आंबेडकर व सरदार पटेल प्रभृतींना हवे असलेले स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेल्या मूलभूत बाबी मिळवून देण्यासाठी जीव ओतून झगडणारा पत्रकार म्हणून नानासाहेबांचे जीवन होते.
खरे तेल्या तांबोळ्यांचे पत्रकार
परुळेकरांनी टांगेवाले, भाजीवाले, हमाल, छोटे व्यापारी, शेतकरी या सारख्या सर्वानाच जवळ केले. टिळक, आगरकरांची लेखणी श्रेष्ठ मानताना नानासाहेबांची पत्रकारिता दुय्यम मानता येत नाही. यादृष्टीने ते खरे तेल्या तांबोळ्यांचे पत्रकार.
समाज सेवा करताना वर्तमानपत्राचा व्यवसाय तोट्यात चालावा असं थोडंच आहे ?
सकाळकारांनी आतापर्यंत मराठी वृत्तपत्रात अशक्य असलेली गोष्ट शक्य करून दाखवली. अमेरिकेत घेतलेले या व्यवसायाचे प्रशिक्षण असलेले व दैनंदिन जीवनाला लावून घेतलेली शिस्त असेल पण उच्चभ्रू म्हंटली जाणारी मराठी मंडळी सकाळची टिंगल करीत. या आगळ्या दैनिकाला वाचत शिकल्या-सवरल्यांना हव्या असलेल्या देशी-विदेशी बातम्या, व्यापाऱ्यांसाठी बाजार भाव, कॉलेज युवकांसाठी सदर, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, गोंधळून गेलेल्यांना उषा वहिनींचा सल्ला किंवा प्रौढ साक्षरांसाठी मोठ्या टायपात लहानसे सदर या दैनिकातच पाहालयाला मिळू लागले. सकाळचा लाखावर खपाचा म्हणजे वाचक, त्यापेक्षा त्या पटीत वाढलेला वाचक. हे सगळे तेव्हा नवीन होते.
सकाळ वाचकांना किती प्यारा होता याचे एक उदाहरण बोलकं आहे. वृत्तविक्रेत्यांनी सकाळवर बहिष्कार घातला तेव्हा परुळेकरांनी सकाळी कोपर्या कोपर्यावर टॅक्सी उभी करून वाचकांना येथून अंक विकत घ्यायचे आवाहन केले. तेव्हा खपात थोडा देखील फरक पडला नाही !
सकाळ पुरस्कृत उमेदवार
पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात नानासाहेबांनी प्रयोग केला. नागरी संघटना स्थापन केली. वेगवेगळ्या पक्षातील कर्तबगार व्यक्तींना महापालिका निवडणूकीत उभे केले. “सकाळ पुरस्कृत” केले. या एकाच संघटनेचे वेगवेगळ्या वार्डात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार उभे केल्याचे चित्र दिसले. अपेक्षेप्रमाणे थोड्या काळातच हा प्रयोग फसला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला परुळेकरांच्या या संघटनेने विरोध केला. सकाळच्या धोरणाला वाचकामधून प्रचंड विरोध झाला. ठिकठिकाणी अंक जाळले गेले. नानासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सकाळ विरोधी अंक जाळण्याच्या घटनांच्या सुद्धा बातम्या अंकात ठळकपणे येत गेल्या !
सकाळने सिनेमाच्या जाहिराती बंद केल्या. “सकाळ पुरस्कृत हमखास पराभुत” अशी टिंगल झाली. तरी सकाळचा खप कायम राहिला. याला कारण अगदी साधे आहे. बडा लोकप्रिय मंत्री शहरात येणार असताना देखील त्या कव्हरेजसाठी बातमीदार न पाठविता मंडईतल्या बाजारभावाच्या बातमीला प्राधान्य असे.कारण लोकांना या बातम्या महत्त्वाच्या, आवश्यक वाटतात असं संपादकांनी जाहीरपणे बातमीदारांच्या रोजच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं.
दैनिकाचा वाचक केंद्रस्थानी असला पाहिजे असं सांगणारा हा संपादक होता. हे सगळं त्या काळी अद्भुत होतं.
विलक्षण झपाटलेला पत्रकार
नव्या समाजाला सर्व पत्रकारांनी शिकवण्याची गरज नाही. हा पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन माझ्यासारख्या व्यावसायिक पत्रकाराला नानासाहेबांनी शिकवला. त्यांनी इतर मराठी दैनिकांसारख्या राजकीय मोहिमा लढवल्या नाहीत. पुण्यातीलच इतर स्थानिक वृत्तपत्रे त्यावेळी आपसात लढत असलेली क्षुल्लक भांडणे लढवली नाहीत. इतर वर्तमानपत्रे ‘सकाळ’ ची रेवडी उडवत असताना त्यांना भीक घातली नाही. बदलत्या काळातील हा मोठा स्वागतार्ह बदल होता.
सर्वसामान्यांचे सुखदुःख, अडचणी, गरजा, किंवा इच्छा आकांक्षांना वाट करून द्यावी या साठी सकाळने पहिल्या पानावर एखाद्या वाचकाचे बोलके पत्र प्रसिद्ध केले होते. संपूर्ण अर्ध पान वाचकांच्या पत्रव्यवहाराला राखून ठेवणारे ते त्या वेळचे एकच वर्तमानपत्र होते.
माझ्या दृष्टीने पत्रकारितेचे व्यसन लागलेला हा माणूस विलक्षण झपाटलेला असावा. स्वराज्य साप्ताहिक राज्यभर लोकप्रिय केले. सकाळचा जम इतका छान बसविला. मग राज्याच्या राजधानीत “मुंबई सकाळ” सुरू करण्याचा खटाटोप आपल्या वयाची सत्तरी उलटल्यावर करण्याचा हव्यास कशाला ? शरीर कमकुवत असूनही या दुर्दम्य आकांक्षाच्या जोरावर नवे साहस देखील अंगावर घेण्याची कुवत फक्त नानासाहेबांचा मध्येच असावी.
अंथरुणावर खिळलेल्या नानासाहेबांना भेटायला वृत्तसंपादक मुणगेकर कितीतरी वेळ त्यांच्या योजनाच ऐकत. शेवटपर्यंत त्यांच्या काहीतरी नव्या योजना तयार होत होत्या. “नानासाहेब तुमची प्रकृती कशी आहे” असं विचारावं असं कितीतरी वेळा त्यांच्या ओठावर येत होतं. पण या बहाद्दराला भान होते कुठे ? देह थकला असेल पण शाई कुठे सुकली होती ?
डॉ नानासाहेब परुळेकर यांचं निधन दिनांक ८ जानेवारी १९७३ रोजी झालं. सकाळ सोडून मला दोन वर्षे होऊन गेली होती. यु एन आय या संस्थेत मी कार्यरत होतो. त्यांच्या निधनाची बातमी कळताच हा लेख लिहायला बसलो.
“शाई सुकून गेली” या शीर्षकाचा लेख त्यावेळच्या प्रथितयश साप्ताहिक माणूस मध्ये प्रकाशनासाठी पाठवला. दिनांक २० जानेवारी १९७२ रोजी तो प्रसिद्ध झाला. त्यावर आधारित ही माझी श्रद्धांजली🙏

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.