कॅनडातून प्रकाशित होण्याऱ्या “एकता” या मासिकात जुलै २००४ साली ‘घरकुल” शीर्षकाखाली पुढील लेख प्रसिद्ध झाला होता. ते प्रकाशन आता बंद पडले आहे. पण “एकता” च्या संपादकांच्या अनुमतीने लेखिकेने हा लेख आपल्याकडे पाठवला आहे. दोघांचेही मनःपूर्वक आभार
– संपादक.
मुलानं १९९८/१९९९ साली स्पेनमध्ये स्थाईक व्हायचं ठरवलं. मग आम्हीसुद्धा तिकडेच जावं असं वाटायला लागलं. तिथली सुंदर हवा, आपल्यासारखीच नाती जपणारी मनमोकळ्या स्वभावाची माणसं, खायची, प्यायची रेलचेल या सगळ्याचं आकर्षण होतं.
अर्थात भारतांतल्या पद्धतीसारखं एकत्र रहाणं या पाश्चात्य जगात असंभवनीय. नंतर वास्तवतेची जाणीव झाल्यावर तो विचार रद्द केला. पण राहाते घर सोडून जायचे या नुसत्यां विचारांनीच माझ्या मनांत काहूर उठले होते. त्याआधी नुकत्याच झालेल्या भारतभेटीत जोडलेल्या पण खुप जवळच्या वाटणाऱ्या मावशींकडून त्यांच्या मुलाजवळ कायमचे राहायला जाणार असल्याचं त्यांनी सांगीतले. त्यांच्या साश्रु नजरेआड त्यांच्या मनाची होत असलेली घालमेल मला दिसली, जाणवली. त्याचेच पडसाद या लेखांत उतरले आहेत. मावशींच्या भूमिकेतून माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. घर व कुटुंब, आप्तेष्ट, संसार हेच अखेरीस स्त्रीचं सर्वस्व असत. त्याला अगदी थोडासाहि धक्का लागायची वेळ आली की समर्थपणे संसार चालवणारी तीच स्त्री किती अस्वस्थ होते हा स्वानुभव शब्दांकित करण्याचा हा एक प्रयत्न….
जमीन, चार भिंती व वरती छप्पर अशी ही वास्तू, खूप वर्षे येथे राहिल्यामुळे तिला आपुलकीचे घुमारे फुटले आहेत. मायेची, आपलेपणाची वेलबुट्टी त्यावर चढली आहे. वेगवेगळ्या आठवणींची फुले व फळे त्यावर आलेली आहेत. अशी ही वास्तु नुसती वास्तु नाही तर आमचे ‘घरकुल’ बनली आहे.
जिथे सौख्याचा आनंद छतातून ओसंडून वहात आहे, जिथे दुःखाचे अश्रु जमिनीत झिरपले आहेत. आनंदाश्रूंचे जिथे दवबिंदु तयार झाले आहेत जिथे ताणतणावांचे आघात झेलले आहेत, ती ही वास्तु नुसती वास्तु नाही, तर आमचे ‘घरकुल’ आहे.
जिथे मुलांची खोली अजूनही त्यांच्याच नावाने ओळखली जात आहे, जिथे मी मुलांबरोबर खेळले आहे, त्यांना गोष्टी वाचून दाखवल्या आहेत, सांगितल्या आहेत, जिथे त्यांच्या आजारपणात रात्री जागून काढल्या आहेत, जिथे मुलांना माझ्याकडून जमली तितकी चांगल्या गोष्टीची शिकवण दिली आहे, त्यांना सध्याचे जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे; जिथे मुले मोठी झाल्यावर त्यांना आलेल्या अडचणीतून तरून जायला धीर दिला आहे, आधार दिला आहे, त्यांची समजूत घालून त्यांना योग्य ते करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, जिथे त्यांच्या खोलीमधून, त्यांच्या हसण्याखेळण्याचे, त्यांच्या रुसण्या-फुगण्याचे वादावादीचे, त्यांचे तिथे वावर असल्याचे पडसाद मनावर अजूनही उमटत आहेत, ती ही वास्तु नुसती वास्तु नाही, तर माझे ‘घरकुल’ आहे.
जिथे मी त्यांची सहचारिणी, मैत्रीण झाले आहे. जिथे कठीण प्रसंगातून जाताना माझ्याकडून शक्य तितके सहकार्य मी त्यांना इथेच दिले आहे, इथेच मी ह्यांना संसारातल्या आनंदात मनापासून सहभागी झाले आहे. जिथे माझीच जेव्हा कोलमडायची वेळ आली होती तेव्हा यांचा कणखर आधार मला इथेच मिळाला आहे. जिथे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी या सर्वांच्या मुलाबाळांसह खाण्यापिण्यात, खेळ खेळण्यात, हसण्याखिदळण्यात, मनसोक्त गप्पा मारण्यात आनंदाचे, मजेचे, सुट्टयांचे कितीतरी दिवस घालवले आहेत. जिथे आम्ही मैत्रिणीनी एकमेकींना मनाच्या जखमा उघडून दाखवल्या आहेत, त्यांनी त्यावर केलेली प्रेमळ, हळुवार मलमपट्टी अजून जाणवते आहे, ती ही वास्तु फक्त वास्तूच नाही तर आमचे “घरकुल’ आहे.
अशा या घरकुलात वाढलेली आमची मुले मोठी होऊन त्यांना पंख फुटले आहेत. स्वतःचे जोडीदार शोधून त्यांनी आपली स्वतःची ‘घरकुल’ थाटली आहेत. मुलगी तिच्या सहचऱ्यासह अमेरिकेत, तिच्या स्वतःच्या घरकुलात आनंदाने रममाण झाली आहे. मुलगा आणि सून दोघेही डॉक्टर, त्यांचा कोल्हापुरात चांगला जम बसू लागला आहे. ते पण त्यांच्या स्वतःच्या घरकुलात, त्यांच्या वेगळ्या विश्वात मग्न आहेत.
आतापर्यंत यजमानांच्या बदलीच्या नोकरीमुळे देशभर खूप हिंडलो. पण पुण्याचे हे घरकुल हक्काचे होते. मुलांच्या शिक्षणासाठी व इतर बऱ्याच कारणांनी माझे इथेच बरेचसे आयुष्य गेले आहे. निवृत्तीनंतर गेली सातआठ वर्षे आमचे दोघांचेही वास्तव्य येथेच आहे. खेळ खांबोळ्याच्या खेळासारखे खूप वेगवेगळ्या खांबांना हात लावून परत या हक्काच्या घराच्या भोज्याला परतत होतो. पण आता खेळ खेळायचा उत्साह संपला आहे व दमायला पण होऊ लागले आहे. म्हणूनच वाढत्या वयाचा विचार करून, म्हातारपणी आधार असावा म्हणून मुलाच्या व सुनेच्या खूप आग्रहाने त्यांच्याजवळ रहायला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय सगळ्यांनाच खूप पसंत पडला आहे. मुलीला पण त्यामुळे आमची काळजी वाटणार नाहीय. मुलाला व सुनेला झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात असलेला स्पष्ट दिसत आहे. नातवंडांकडे पहायला त्यांना आमची मदत होणारच आहे. छोट्या सानुल्यांच्या सहवासात, त्यांच्या निरागस प्रेमात आम्ही पण न्हाऊन निघणार आहोत. त्यांच्याशी खेळण्यात, त्यांना गोष्टी सांगण्यात आमचे दिवस आनंदाने भरून पावणार आहेत. त्यांच्या बाललीला पहाताना आमच्या मुलांच्या लहानपणच्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळणार आहे. या सुखाला मुकत असल्याची रुखरुख आता दूर होणार आहे. त्यांच्या विश्वात आता आम्हाला पण हक्काची जागा असणार आहे. मुलगा, सून व त्यांच्या मित्रमैत्रिणींमुळे तारुण्याचा उत्साह, जोम आजूबाजूला पसरलेला परत एकदा जाणवू लागणार आहे.
पुष्कळ जणांना मुलं परदेशी असल्याने किंवा इतर काही कारणाने या वयात वृद्धाश्रमाचा विचार करावा लागतो किंवा एकाकी जीवन कंठावे लागते. त्यापेक्षा हा निर्णय कितीतरी पटींनी सुखावह होणार आहे. दोघांपैकी शेवटी एकच उरणार हे तर कठोर सत्य आहे. पण मुलाच्या व सुनेच्या आधाराने आमची दोघांची पण ही काळजी दूर होणार आहे. असा सर्वच दृष्टीने विचार करून मुलाजवळ रहायला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणूनच भारावलेल्या मनाने, डोळे टिपत, हे काडीकाडीने गुंफलेले ‘घरकुल’ कायमचे सोडण्याच्या तयारीने आवरायला सुरुवात केली आहे.
आम्ही आता आमच्या ‘घरकुला’तून त्यांच्या ‘घरकुलात जाणार आहोत. इथल्या सगळ्या आठवणी मात्र मनात कायमच्या “घर करून राहणार आहेत.

– लेखन : सौ. लीना फाटक, वाॅरिंग्टन, यु.के.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+91 9869484800.
हृदयस्पर्शी लेख , खूप आवडला.
मनात केलेले घर- उत्तम