(जनात समरा जनात समरा यमाचा लगा)
पृथ्वी
नभात उडता ढगात शिरता, विहंगा समे
तनात भरता कमाल करता, समीरा भ्रमे
विचार असला मनात उसळे, कधीपासुनी
विहार करणे असे खरच का, दिवास्वप्नी
अजून मन हे निजून उठता, खरे भासते
भिजून तन ही वरी बरसता, उभे कापते
पिसे जुळवता गमे सहजता, उडे पाखरू
तसेच घडता न ये कठिणता, सयंत्रेवरू
विमान वर जे उडाण करण्या, रची जी तनू
खगासम कला करून सकला, जुडे या घनू
गुरुत्व बल हे विरुद्ध उडण्यास, जे लागता
मशीन रुप इंजिनात, अनिलींधनापूर्तता
प्रयत्न करुनी कसे मिळवले, सुवेगा नभी
हवाइ महिला सहाय करण्या, असे ती उभी
सदा स्मित वदी करी सुकरता, प्रवासी जना
न कष्ट भय वा अधीर गमता, प्रसन्ना मना
गवाक्ष उघडे पल्याड दिसता, ढगाच्या वरी
जसा पसरला कपास सगळ्या, भुई अंथरी
शशी सह गमे निघे निळसरी, नभाच्या तळी
प्रभात उतरे प्रभाकर चढे, सुवर्णासळी
उतार करण्या विमान झुकता, भुईच्या दिशी
नदी सरवरे इमारत तळी, गिरींच्या कुशी
वरून बघता लहान ठिपका, वहाने खरी
हळूच सरती विमान उतरे, महीच्या वरी
विमानतळ मुंबईनगरचे, प्रसिद्धे अती
विहार करण्या अनेक जमती, किती धावती
प्रमोद सकला इथे मिळतसे, समाधानही
पुन्हा परतुनी सदा परतती, स्वधामी गृही

– रचना : हेमंत कुलकर्णी. मुंबई
सुंदर कविता