“ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार ! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी असंख्य सुंदर सुंदर गाणी देऊन खरंतर आपलं जीवन समृद्ध केलं. आजचं गाणं आहे कविवर्य रमेश अणावकर यांचं आणि गाण्याचे शब्द आहेत –
“ते नयन बोलले काही तरी
मी खुळी हासले खुळ्या परी”
डोळे हा शरीराचा अवयव म्हणून शरीर शास्त्रात गणला जात असला तरी या डोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काही काही व्यक्तींचे डोळे फार बोलके असतात. राग आल्यावर अशा व्यक्तींनी तोंडावाटे जरी काही प्रतिक्रिया दिली नाही तरी “काही तरी बिनसलंय” हे अशा व्यक्तींच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर लगेचच आपल्या लक्षात येतं. कवीनं इथे अशाच एका युवतीच्या डोळ्यांचं वर्णन केलं आहे.
आपल्या सौंदर्याचा स्त्रियांना जेव्हढा अभिमान असतो तेव्हढंच ते कशामुळे जास्त खुलून दिसतं याचीही त्यांना जाणीव असते. म्हणूनच ही तरूणी स्वतः बद्दल सांगताना कबूल करते आहे की तुझ्याकडे पाहिल्यावर “असाच जोडीदार मला जीवनसाथी म्हणून हवा” असा विचार माझ्या मनात क्षणभरच चमकून गेला खरा, त्यामुळे मी खुळ्यासारखी स्वतःशीच हसले हे खरं असलं तरीही मी का हसले याचं खरंखुरं उत्तर मात्र माझ्या डोळ्यांनी परस्पर देवून टाकलं आणि मनातला हा वेडावाकडा विचार बहुदा माझ्याही नकळत तुझ्यापर्यंत पोचला असावा.
निळ्या नभापरी किंचित निळसर
नयन बोलके आणिक सुंदर
बघता बघता मी ही क्षणभर
झाले ग बावरी
आरशासमोर उभं राहून तासन् तास स्वतःचं सुंदर रूप न्याहाळण्याचा माझ्या मनाला छंदच जडला आहे. निरनिराळ्या पोझेस घेऊन सेल्फी काढायची, ज्या मध्ये माझ्या डोळ्यांवर मी जास्तीत जास्त फोकस करते. निळ्या रंगाच्या आकाशाची पार्श्वभूमी लाभलेले माझे हे डोळे पाहिल्यावर मला नेहमीच “नयन तुझे जादूगार”
हे नाट्यगीत आठवतं. मात्र माझ्याही नकळत ते इतके बोलके भाव प्रदर्शित करतात कि समोरच्या माणसाला माझं मन अगदी स्वच्छ वाचता येतं. अशा वेळी काय करावं ते मला समजत नाही. माझ्या मनातले विचार समोरच्या व्यक्तीला कळू नयेत म्हणून मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करते पण माझे हे बोलके आणि सुंदर दिसणारे डोळे माझ्या मनातले भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत सहजपणे पोचवतात. आत्ता तुझ्याही बाबतीत तेच झालेलं आहे. ज्या प्रेमभावना मला व्यक्त करायच्या नव्हत्या त्याच नेमक्या माझ्या या सुंदर डोळ्यांनी तुझ्यापर्यंत सहजपणे पोचल्या, त्यामुळे आता काय करावं ते समजून मी मात्र कावरीबावरी झाले आहे.
क्षण माझे मग मलाच न कळे
वसंत नयनी कधी दरवळे
तनु कोमल या वेलिवरले
फूल फुले अंतरी
डोळ्यांनी केलेल्या या खट्याळपणा मुळे मी कावरीबावरी झाले याचं कारण वसंत ऋतूनं या शरीरात कधी प्रवेश केला तेच मला कळलं नाही. त्यामुळे “आला वसंत देही मज ठावूकेच नाही” अशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. मैत्रिणींसमोरही तुझं ओठावर नाव येऊ नये असं सारखं वाटत असूनही नकळतपणे अलिकडे तुझं नाव सारखं माझ्या तोंडावर येतंय. निळ्या डोळ्यांच्या डोहात समोरचा माणूस नकळतपणे उतरतो आणि त्याला दिसतं वसंत ऋतू माझ्या शरीरावर राज्य करतोय. कस्तुरी मृगाला जसा कस्तुरीचा गंध कुठून येतोय ते समजत नाही तसाच माझ्या मनात वास करत असलेल्या या वसंत ऋतू मुळे या कोमल देहावर ही तारूण्याचं फूल उमललं आहे ज्याचा मला आत्ता शोध लागला आहे आणि त्यामुळेच तुझ्याविषयीच्या नाजूक प्रीत भावना माझ्या डोळ्यांमधून सहजपणे व्यक्त झाल्या.
मला हवे जे अती मोहक ते
कसे अचानक जुळूनी येते
सांगाया मज लाज वाटते
संभ्रमात क्षणभरी
प्रेमाची भाषा काही औरच आहे. खरंतर माझ्या डोळ्यांनी माझ्या मनातल्या प्रेमभावना व्यक्त केल्या, ही त्यांची चुगलखोरी, खरं सांगायचं तर मलाही आधी आवडली नव्हती. नंतर मी हळूच चोरून तुझ्याकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं कि माझ्या मनातलं प्रेम मला तुझ्याही नजरेत दिसून आलं आणि अनपेक्षितपणे पुन्हा एकदा माझ्याच प्रेमाचा साक्षात्कार मला झाला. इतकं अचानक मनासारखं सारं काही जुळून आलंय, मला मात्र त्याचा उच्चार करायचीही लाज वाटते आहे. या प्रेमाचा उच्चार करून आपल्या प्रेमावर शिक्कामोर्तब करावं कि करू नये अशा संभ्रमात असताना, पुन्हा एकदा मी माझ्याशीच हसले पण माझी नजर मात्र पुन्हा एकदा फितूर झाली आणि डोळ्यांनी मात्र पुन्हा एकदा मनातलं गुपित – माझं प्रेम – तुला सांगून टाकलं.
संगीतकार दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यातील तरूणीची झालेली संभ्रमावस्था, तिला झालेला आनंद हे सर्व काही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या आवाजातून आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेल्या व सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अनेक सुंदर गीतांपैकी रमेश अणावकर यांचं हे एक गीत. बोलके डोळे व त्यातून निर्माण होणारे भाव यांचं वर्णन आपण रसग्रहणामध्ये फारच सुंदर केले आहे.
कविवर्य रमेश आणावकर यांचे हे गीत भावे सरांनी अतिशय बारकाईने अभ्यास करून रसग्रहण केले आहे. नयन बोलके, जादुगार इ. शब्दांत सहजतेने उद्धृत केले आहे.
सुंदर रसग्रहण.
🌹श्री. विकास भावे खूप सुंदर कवितेच विवेचन केलंत आपण. धन्यवाद 🌹
डोळ्यातील हावभाव, प्रेम, राग सर्व खूप नयनरम्य प्रकारे व्यक्त केलं.
🌹अभिनंदन 🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ