महाराष्ट्राचे सुपुत्र, भारतीय सेनेतील कर्नल डॉ अविनाश डुब्बेवार यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक शांती सेनेत निवड झाली असून ते आफ्रिकेतील दक्षिण सुदान या देशात त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी नुकतेच रुजू झाले आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
परिचय :- स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य स्वातंत्र्य सेनानी, राज्यातील आर्य समाजाचे प्रमुख आधारस्तंभ व ह्या माध्यमातून सुरू झालेल्या शाळेचे संस्थापक सदस्य, हिंगोली येथील कै. सखारामजी डुब्बेवार ह्यांचे नातू व प्रकाश डुब्बेवार ह्यांचे चिरंजीव डॉ. अविनाश यांचे हिंगोली येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथून विशेष प्राविण्यासह एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
आजोबा आणि वडिलांचेही राष्ट्र सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्पर्धा परीक्षेतच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलातील एएमसीमध्ये कॅप्टन म्हणून रुजू झाले.
डॉ. अविनाश ह्यांची पहिली नेमणूक २००३ मध्ये अहमदनगर येथील आर्मी हॉस्पिटल झाली. त्यानंतर लखनऊ येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.
कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटीमुळे देवलाली येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये सेवारत असतांनाच एम.डी.साठी त्यांची निवड झाली. अभिमानाची बाब म्हणजे राष्ट्रीय गुणवत्ता यादीत त्यांनी ४३ वे स्थान मिळवले. पुणे येथील आर्म्स फॉर्सेस मेडिकल कॉलेज मधून त्यांनी एम.डी. (स्त्री रोगतज्ञ ) पदवी प्राप्त केली.
काही तरी नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. अविनाश ह्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाची एम. एस. (लेप्रोस्कोपिक सर्जरी) ही विशेष पदवीही प्राप्त केली. डॉ अविनाश यांनी अहमदनगर, लखनऊ, राजौरी (जम्मू & कश्मीर), देवलाली, पुणे, जोरहाट (आसाम), पिथौरागढ़ (उत्तराखंड), व जोधपुर (राजस्थान) अशा विविध मिल्ट्री हॉस्पिटलमध्य केलेल्या उल्लेखनीय रुग्ण सेवेमुळेच त्यांची वेळोवेळी पदोन्नती होत राहली. राजौरी येथील आर्मी स्कूलचे मुख्याध्यापक पदही त्यांनी भूषविले आहे.
जोधपुर येथून हिंगोली येथे सुट्टीवर आले असतांना वाढते कोरोना संकट पाहता देवलाली हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा बजावली. त्यांच्या या सर्व गौरवशाली कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक शांतिसेनेत त्यांची निवड झाली. संपूर्ण देशातून केवळ दोन उच्च विद्याविभूषित विशेषज्ञ डॉक्टरांची निवड झाली. त्यातील एक डॉ अविनाश आहेत. कर्नल डॉ. अविनाश यांचा ३ मे हा वाढदिवस असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी, आप्तेष्टांनी, राज्यातीलच नव्हे तर देशातील आर्यवैश्य मंडळी, विविध संघटना, तसेच अन्य सर्व समाजातील देशप्रेमी व कर्नल डॉ. अविनाश आणि डूब्बेवार परिवाराच्या चाहत्यांनी त्यांच्या भावी यशासाठी, निरोगी दीर्घायुरारोग्यासाठी भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत.
डॉ अविनाश यांची हिंगोली ते दक्षिण सुदान, ही गरुड झेप नक्कीच अवघ्या महाराष्ट्राला कौतुकास्पद, प्रेरणादायी, व भूषणावह आहे. डॉ. अविनाश यांच्या पत्नी पुणे येथे फिजिओथेरपीस्ट आहेत. मोठी मुलगी आठवीत तर धाकटी ज्युनियर के.जी.त आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियाना निरोगीदीर्घायुरारोग्य लाभो हीच प्रार्थना .
– लेखन : डॉ विजय निलावार
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अभिमानास्पद व गौरवास्पद कामगिरी
सलाम सलाम सलाम