मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !!धृ!!
घाट पाषाणास फुटे पान्हा,
वाहती त्यातुनी जलधारा,
मिळे ओलावा तो मायेचा,
मऊ धुक्यात हर्ष गारवा ||१||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले!!धृ!!
होई पाषाणं मऊ गालीचे,
सुंदर मखमलीचे हिरवाईचे,
हरित तृणाचे वेल ,
जल शिंपण धवल फुलांचे ||२||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले!!धृ!!
भरजरी हिरवा शेला नवा,
आज पांघरला धरतीवरी,
जणू दिसे वधू परी आज,
गंध प्रमेचा लावी भाळावरी ||३||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !!धृ!!
मेघ सावळा माझा धनी,
येतो नाचत रानी, वनी,
हर्ष भरीत तो मनामधी,
नवचैतन्य येई आज मनी ||४||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !! धृ!!
थेंब थेंब पाणी मातीत जिरव
अंकुर सोनियाचा येई बाहेर,
येई हिरवी त्यास पालवी,
शिवरात शोभे तुरा दानेदार ||५||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या घेऊनी फुटले !!धृ!!

– रचना : प्रविण खोलंबे. मुरबाड, जि.ठाणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मेघ नभात दाटले श्रीयुत प्रविणजींची मनमोहक निर्व्याज देहादेहातील निसर्गावलोकन ही रचना भावली.
निसर्गाचे छान वर्णन ! 👌🏻