Friday, March 14, 2025
Homeसाहित्यमाझं जीवन भाग - ३

माझं जीवन भाग – ३

बीटा केमिकल्स
दोन तीन दिवसानंतर बाजूच्या बिल्डिंग मधील एक मित्र भिमाजी कांबळे म्हणाला, उद्या शुक्रवारी मला साकीनाक्याला एका कंपनीत कामासाठी जायचे आहे. माझ्या बरोबर येतोस का? मी जाण्या येण्याचा खर्च करतो. त्याला कोणीतरी कामासाठी चिठ्ठी दिली होती. मी म्हणालो चालेल. एव्हाना मी मोकळाच होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी मित्र व मी बसने साकीनाक्याला नंदज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका गाळ्यातील बीटा केमिकल्स कंपनीत गेलो. कंपनीच्या ऑफिसमध्ये कंपनी मालकाची वाट पाहत बसलो. साधारण ११ वाजता कंपनीचे मालक / पार्टनर श्री त्रिवेदी आले. प्रथम क्लार्क श्री सावंत, टायपिस्ट मिस अनिता यांना कॅबिन मध्ये बोलावून दिवस भराच्या कामाच्या सूचना दिल्या. नंतर बाहेर बसलेल्या भिमाजी कांबळे यांना आत येण्यास सांगितले. त्याचा इंटरव्हिव झाला. बाहेर पडताना त्याला विचारले बरोबर आलेला मुलगा कोण आहे? त्यालाही काम हवे आहे का? भीमाजीने सांगितले तो माझा मित्र आहे, तो सुध्दा बेरोजगार आहे. मला पण आत बोलविले, माझे नाव, गाव विचारले. शिक्षण विचारले. मी बारावी सायन्स पास म्हणून सांगितले. श्री त्रिवेदी यांनी सांगितले, सोमवार पासून तुम्ही दोघेही कामावर या. तशा क्लार्क श्री सावंत यांना आम्हांला सूचना देण्यास सांगितले. काम सोमवार ते शुक्रवार. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. १० रुपये रोज. २२ दिवसाचे २२० रुपये मिळणार होते. सावंत यांनी आम्हांला कंपनीत आत नेले. कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. कामाचे स्वरूप समजून सांगितले. कंपनीतून बाहेर पडल्यावर मी भिमाजीला मिठी मारली. त्याला धन्यवाद दिले. त्याच्याबरोबर आल्याने मला सुध्दा नोकरी मिळाली. आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले. जाताना मी दोघांचे बसचे तिकीट काढले. आनंदाने घरी गेलो.

सोमवारी सकाळी ९ वाजता कंपनीत पोहचलो. भिमाजी दहावी नापास असल्याने त्याला हेल्परची पोस्ट दिली. मी बारावी सायन्स पास असल्याने मला मुख्य केमिस्ट श्री अय्यर व सह केमिस्ट मिस रफिका या दोघांचा लॅब असिस्टंट म्हणून पोस्ट दिली. प्रॉडक्शनला पाच सहा जण स्टाफ होता. केमिकल कंपनी होती. मुख्य उत्पादन टाटा 501 बार साबणासाठी लागणारे केमिकल, चॉकलेटसाठी लागणारे कोको, पर्फ्यूमसाठी लागणारे सुवासिक केमिकल, अगरबत्ती मसालासाठी लागणारे सुवासिक केमिकल असे होते. अनेक उत्पादन करून ऑर्डर प्रमाणे माल तयार करून कंपन्याना पुरविला जाई.

जेमतेम एक महिन्यात भिमाजी कडून निष्काळजी पणामुळे बिकर तुटणे, काचेचा मोठा फ्लास्क तुटणे, ओव्हन जळणे अशा चुका आणि नुकसान झाल्याने महिन्याभरात त्याला कामावरून कमी केले. मला फार वाईट वाटले. त्यानंतर माझी बहीण गावी गेली. त्यांच्या दोन नंबर जाऊबाई मुंबईला आल्या. गावी जाण्यापूर्वी वडिलांना सांगून माझ्या बहिणीने माझी राहण्याची व खानावळीची सोय घाटकोपरला केली होती. घाटकोपरहून साकीनाक्याला कंपनीत जाणे मला सोयीस्कर झाले.

तीन महिन्यानंतर मी श्री त्रिवेदी यांना कॅबिनमध्ये जाऊन भेटलो व जाऊन सांगितले सर माझा पगार वाढवा. महिन्याची खानावळ १५० रुपये, बसभाडे २५ रुपये,  (वास्तविक पैसे वाचविण्यासाठी सकाळी घाटकोपर ते साकीनाका व संध्याकाळी साकीनाका ते घाटकोपर मी दररोज पायी चालत जात असे) इतर खर्च २५रुपये. फक्त २० रुपये शिल्लक राहतात. गावी आजी व भावाला काय पाठवू? त्यावर ते म्हणाले कंपनीत किती महिने काम करतो आहे? मी म्हटले तीन महिने. त्रिवेदी साहेब एकदम ओरडले तीन महिन्यात पगारवाढ पाहिजे? मी घाबरत म्हटले सर परिस्थिती तशी आहे. मी राहतो एकाठिकाणी, जेवतो एकाठिकाणी. घरी कमावणारे कोणी नाही. मग ते म्हणाले एक काम कर मी एक सॅम्पल देतो, तो मला संध्याकाळ पर्यंत बनवून दे. बरोबर केला तर पगारवाढीचा विचार करीन. मी म्हटले चालेल. त्यांनी मला १० एम एल सॅम्पल पर्फ्यूम बनवायला दिला.

कंपनी एक्सिबिशन मध्ये बीटा केमिकल्स चा २ क्र. मिळाला असताना सहकारी श्री. खंदारे सह.

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर प्रिस्क्रीप्शनमध्ये दिलेल्या मटेरियल प्रमाणे थेंब थेंब मोजून अवघ्या अर्ध्या तासात सॅम्पल तयार करून दिला. संध्याकाळ पर्यंत तयार करण्याची मुदत असताना मी अवघ्या अर्ध्या तासात सॅम्पल बनवून दिला होता. तो त्यांनी चेक केला व खुश होऊन शाबासकी दिली. क्लार्क श्री सावंत यांना बोलावून सांगितले आरोटे यांना ह्या महिण्यापासून ९०० रुपये पगार देण्याची ऑर्डर काढा.

आत प्रॉडक्शन हाऊसमध्ये कळल्या बरोबर वातावरण गरम झाले. हा येऊन तीन महिने झाले नाही तरी इतकी पगार वाढ झाली. आम्ही चार पाच वर्ष काम करूनही ५०० रुपये पगार नाही. मी त्यांना म्हटले, तुम्ही त्रिवेदी साहेबांना जाऊन भेटा. त्याप्रमाणे ते जाऊन भेटले. मला जे काम सांगितले तेच काम त्रिवेदी साहेबांनी त्यांना सांगितले. एकानेही चॅलेंज स्वीकारले नाही. गपचूप त्याच पगारावर काम करीत राहिले.

मी मात्र खुश होतो. माझ्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली. मी व माझा हेल्पर सहकारी दर दिवशी किमान लाख, दिड लाख रुपये किंमतीचे 501 बार साबणाचे केमिकल तयार करीत होतो. मला महिना ९०० रुपये पगार होता. माझे भागवून वडिलांना पैसे देऊ शकत होतो. शनिवार रविवार सुट्टी असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येत होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी स्पर्धा परीक्षा असायच्या, त्यामुळे रजा घ्यावी लागत नव्हती.

नोकरीसाठी रेल्वे, पोस्ट, सरकारी बँका, स्टाफ सिकेक्शन कमिशनच्या स्पर्धा परीक्षा देत होतो. लार्सन अँड टुब्रो, गोदरेज, महिंद्रा अँड महिंद्रा, पोर्ट ट्रस्ट टेली क्लार्क सारख्या कंपनी साठी प्रयत्न करत होतो कुठे स्पर्धा परीक्षा पास होत नव्हतो, कुठे इंटरव्हिव पास होत नव्हतो. तर कुठे उंची कमी तर कुठे वजन कमी भरत होते. कुठे लाच देण्यास पैसे नव्हते. शेवटी पूर्वी मुंबईत आल्याबरोबर दि. १५ जुन १९८४ रोजी सर्वात पहिला बॉम्बे टेलिफोन साठी भरलेला अर्ज त्याची लेखी परीक्षेसाठी कॉल आला. त्याचीही लेखी परीक्षा दिली. नशिबाने त्या लेखी परीक्षेमध्ये पास झालो. नंतर इंटरव्हिव पास झालो. मेडिकल पास झालो. बॉम्बे टेलिफोनमध्ये सिलेक्शन होऊन सोमवार दि २५ नोव्हेंबर १९८५ पासून टेलिफोन ऑपरेटरच्या ट्रेनिंग साठी ऑर्डर मिळाली. मी खुप आनंदी झालो.

मध्यंतरीच्या काळात मुख्य केमिस्ट श्री अय्यर साहेब कंपनी सोडून मुकुंद कंपनीत गेले. दि.२२ नोव्हेंबर रोजी मी श्री त्रिवेदी साहेब यांना संध्याकाळी ५ वाजता कॅबिनमध्ये जाऊन सांगितले की सर मी सोमवार पासून कंपनीत कामावर येऊ शकणार नाही. ते म्हणाले काय प्रॉब्लेम आहे? गावी जाणार आहे का? मी म्हणालो, मी गावी जात नाही. मला बॉम्बे टेलिफोनमध्ये टेलिफोन ऑपरेटर ची सरकारी नोकरी मिळाली आहे. सोमवार पासून मी ट्रेनिंग जॉईन करणार आहे. त्यावर त्रिवेदी सरांनी सर्वांना लवकर सोडून दिले. कंपनीचे शटर डाऊन केले व मला म्हणाले टेलिफोन ऑपरेटरला किती पगार आहे माहित आहे? त्यापेक्षा तुला इथे त्याच्या डब्बल पगार आहे. दोन तास बसून ठेवले. ९०० रुपये पगारावरून माझा पगार वाढवत वाढवत ४ हजार रुपये केला. घाटकोपरला घर घेण्यासाठी पैसे देतो म्हणाले. दर महिन्याला माझ्या फॅमिली डॉक्टर कडून मेडिकल फॅसिलिटी देतो. मुख्य केमिस्टची पोस्ट देतो. पण माझा एकच ठेका होता, सर मला बॉम्बे टेलिफोन जॉईन करायचेच आहे. आतापर्यंत तुम्ही मला सहारा दिला, चांगला पगार दिला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे पण आता मला सरकारी नोकरी मिळते आहे. शेवटी रात्री ८ वाजता मला जाऊ दिले. जाताना सांगितले, माझ्या कंपनीचा दरवाजा तुझ्यासाठी केव्हाही उघडा आहे. केव्हाही ये. एक तारखेला येऊन पगार आणि दिवाळी बोनस घेऊन जा. मी त्यांचे आभार मानले व कंपनीचे दर्शन घेऊन निघालो..

लेखक : श्री. मोहन आरोटे.

क्रमश……..

– लेखन : मोहन आरोटे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments