मुंबईच्या सुजाण प्रेक्षकांनी प्रतिक्षा करावी असे जे दोन-चार महोत्सव होत असतात त्यात कला, संस्कृती आणि विज्ञान यांचे संवर्धन करणाऱ्या नेहरू सेंटरचा अंर्तभाव आहे.
नृत्य, संगीत अन्य कलांना प्राधान्य देताना या संस्थेने नाट्य चळवळीला सुद्धा तेवढेच प्राधान्य दिले आहे. ‘राष्ट्रीय नाट्य महोत्सव’ हा प्रेक्षक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यात उर्जा, चेतना वाढविणारा गौरवास्पद उपक्रम आहे.
रौप्य महोत्सवी महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या महोत्सवाचे यंदा चौवीसवे वर्ष आहे. कोविड साथीमुळे आलेल्या निर्बंधामुळे हा लौकिक प्राप्त महोत्सव होऊ शकला नाही. आता पुन्हा या महोत्सवाला प्रारंभ होत आहे.
राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम ठरलेल्या मराठी, हिंदी, गुजराती अशा पाच नाटकांचा या महोत्सवात समावेश आहे. १९ ते २३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत वरळी, नेहरू सेंटरच्या आलिशान नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे. दररोज ७ वाजता प्रेक्षकांना
विनामूल्य या दर्जेदार विविध भाषिक नाटकांचा आनंद घेता येईल. महोत्सवात साम्राज्यम्, हसता हा सवता दोन मराठी नाटकांच्यासोबत, आधे अधूरे, दृष्टी – दान या दोन हिंदी नाटकांचा समावेश आहे. ‘पप्पा मारा पुष्पराज’ हे गुजराती नाटक सुद्धा यात सादर केले जाणार आहे.
या महोत्सवात सादर होणारी नाटके व्यावसायिक, प्रायोगिक रंगमंचावर यशस्वी झालेली आहेत. त्याचा एकत्रित आविष्कार हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.
पहिल्या दिवशी सादर होणारे नाटक अभिजीत झुंजारराव यांच्या दिग्दर्शनातले असून ‘अभिनय कल्याण ‘या संस्थेच्या वतीने ते सादर केले जाणार आहे. जगदीश पवार हे त्याचे लेखक आहेत.
दुसऱ्या दिवशी मोहन राकेश लिखित ‘आधे अधूरे’ हे हिंदी नाटक सादर होणार असून विजय कुमार हे त्याचे दिग्दर्शक आहेत.
तिसऱ्या दिवशी गौरव नाईक लिखित आणि हरिकृष्ण दवे दिग्दर्शित ‘पप्पा मारा पुष्पराज’ हे गुजराती नाटक होणार आहे. या नाट्य संस्थेने तीन दक्षकाहुन अधिक काळ गुजराती रंगभूमीवर योगदान दिलेले आहे.
हिंदी नाटक सादर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर नावातलेल्या ‘ईपटा’ या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. सागर सरहद्दी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या लघु कथेचा हा दिर्घांक आहे. रमेश तलवार यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध अभिनेते अंजन श्रीवास्तव यांचा या नाटकात कलाकार म्हणून सहभाग आहे.
पाचव्या दिवशी मराठी रंगभूमीला वेगळा आयाम देणारे लेखक, दिग्दर्शक पून्हा या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. अभिराम भडकमकर यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी यांनी केले आहे. प्रियदर्शन जाधव, अमोल बावडेकर यांचा यात मुख्य भुमिकेत सहभाग आहे.
छोट्या-मोठ्या पडद्यावर गाजलेल्या कलाकारांचा सहभाग शिवाय राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विद्यार्थी यांचे या महोत्सवात असणे हे खास आकर्षण म्हणावे लागेल.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
