Homeलेख"प्रेरणादायी निसर्ग संवर्धन"

“प्रेरणादायी निसर्ग संवर्धन”

चार वर्षांपूर्वी मला प्रथमच सुधीर थोरवे यांच्यासोबत वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तो अनुभव इतका प्रेरणादायी आणि समाधानकारक होता की, त्यानंतर त्यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा मी निश्चय केला.

मागील 14 वर्षे सुधीर आणि त्यांची पत्नी वैशाली आपल्या मित्रमंडळी समवेत हा उपक्रम राबवत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 3200 हुन अधिक झाडांची लागवड केलेली आहे. त्यांनी विभा फाउंडेशनची स्थापना केली आहे त्यामुळे यांच्या समाजकार्याला संघटित दिशा मिळाली असून विविध सामाजिक उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविले जात आहेत.

यावर्षी ४ जुलै रोजी त्यांचा पुन्हा फोन आला.त्यानुसार त्यांच्या उपक्रमात मी ही सहभागी झालो.माजी सैनिकांनी उभारलेल्या डिकसळ येथील, तसेच दहिवली ह्या छोट्या गावातील एका शाळेत शालोपयोगी साहित्याचे आम्ही वाटप केले. तसेच कोंडीवडे (कर्जत) येथे आदिवासी महिलांसाठी शिलाई मशीन देण्याचा कार्यक्रम तसेच प्रशिक्षण केंद्र उभारून दर महिन्याला ह्या आदिवासी महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देत त्यांना कायमस्वरूपी स्वावलंबी करण्याचा दूरदृष्टीचा विचार त्यामागे होता. हा उपक्रम खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाचा आदर्श ठरावा असा आहे.

याच भेटी दरम्यान २६ जुलै रोजीच्या वार्षिक वृक्षारोपण कार्यक्रमाची आखणी झाली. यंदाच्या उपक्रमात निसर्ग मित्रचे प्रवीण देशपांडे आणि गणेश कुरगोडे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रवीण देशपांडे यांच्या खड्डे खोदण्याच्या यंत्रामुळे मोठ्या प्रमाणात आणि योग्य मापाचे खड्डे अल्पावधीत तयार झाले. त्यानंतर सुमारे ८० ते ९० निसर्गप्रेमी सहभागी झाल्यामुळे खड्डे तयार करणे आणि वृक्षारोपण ही दोन्ही कामे समांतरपणे सुरू राहिली आणि अवघ्या तीन तासांत सगळ्यांनी मिळून जवळपास 250 झाडांची लागवड केली.

कर्जत वनाधिकारी श्री. निलेश भुजबळ व त्यांच्या टीमचे फार मोलाचे सहकार्य लाभले. कर्जतचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे सचिव डॉक्टर राजु थोरवे यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या प्रोत्साहन पर भाषणाने उपस्थित मित्रमंडळींच उत्साह द्विगुणीत झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुधीर थोरवे यांनी आपल्या मित्रमंडळींचा सहभाग आणि समाजाकडून मिळणारा प्रतिसाद आणि भविष्यातील उद्दिष्टे यांची माहिती दिली. सहभागी प्रत्येकाची थोडक्यात ओळख करून दिल्याने आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आणि एक प्रभावी टीम बिल्डिंग घडली.

यंदाच्या वृक्षारोपणाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक सहभागीला आपल्या घराच्या परिसरात लावण्यासाठी रोपे भेट देण्यात आली. वृक्षारोपणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा, हा त्यामागील उदात्त हेतू होता.

वृक्षारोपणानंतर वातावरण अधिक आनंदी झाले. समूहाने जवळील निसर्गरम्य धबधब्याचा आनंद घेतला. कराओकेच्या साथीने सुधीर थोरवे, दिलीप काळन आणि इतर मित्रमंडळींनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत सर्वांनी एक संस्मरणीय दिवस अनुभवला.

या प्लांटेशन ग्रुपच्या प्रमुख शिलेदारांमध्ये वृक्ष मित्र मारुती कदम, सागर म्हात्रे, डॉ. राजू थोरवे, जाग्रुती राव, हितेश भट, चेतन जलाल, राजेंद्र पटेल कुटुंबीय, माधुरी प्रभूळकर, मनीषा करणे कुटुंबीय, जे पी लबडे, नंदकुमार पावशे, सर्वेश बेनकर, जेमीन शहा व लक्ष्मी शुक्ला कुटुंबीय, भरत, मधु, योगेश कसखेडीकर, प्रसन्ना संगवार, अमित देशपांडे, रवी व प्रवीण गवळी कुटुंबीय, हेरंब प्रधान, जिया तेजूजा, पुष्पा चांदवडकर, निलेश बाबर, अजित कोपर्डे, संदीप वाणी, श्याम महामुनी, महेश आठले, अनिल चाळके, आशुतोष डबली आणि किरण भावे कुटुंबीय व सुजाता राऊत, रुपाली ज्योती काशीद, राणी थोरवे, यांच्या श्रमदानाने कार्यक्रम छान पार पडला

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर वर्षभर त्यांची नियमित देखभाल करून ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारणे हे होय. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या आणि बहरलेल्या झाडांकडे पाहिल्यावर हा प्रयत्न किती यशस्वी ठरला आहे, याची प्रचिती येते.

आजच्या काळात समाजकार्य म्हणजे केवळ मदत नव्हे, तर शाश्वत परिवर्तन घडविण्याची प्रक्रिया आहे. सुधीर थोरवे आणि वैशाली थोरवे यांचे कार्य हे याच विचाराचे जिवंत उदाहरण आहे.

पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि समाजहित यांचा सुंदर संगम त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून अनुभवायला मिळतो. अशा व्यक्ती आणि संस्थांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत राहतील, याची खात्री वाटते.

प्रशांत गायकवाड

— लेखन : प्रशांत गायकवाड लोधीवली.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on प्राणांचे झुंबर…
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on आम्ही सिद्ध लेखिका : ठाणे, पुणे वृत्तांत
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on सुभाषित विवेचन : 2
सौ श्वेता चंद्रकांत गांधी on शिक्षण : भारतीय मानसिकतेचा शोध