“हरवले ते गवसले का ?”
मानवी मन हे नेहमीच दोलायमान स्थितीत असते. काल जे होते ते आज का नाही किंवा आज जे आहे ते असेच का असावे अशा नाना प्रश्नांचा अनुत्तरीत खेळ मनात सातत्याने चालू असतो जो मनाची अस्वस्थता आणि बेचैनी वाढवतो.
सुप्रसिद्ध जनकवी निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचे *हरवले ते गवसले का ?* हे भावगीत ऐकताना नेमके हेच विचार मनात घोळतात. वास्तविक लहानपणापासून या भावगीताने आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर विविध अर्थ, तत्त्वज्ञान, प्रतिमा आणि भावविश्व उलगडलेले आहे. भावगीताचे बोल असे आहेत..
हरवले ते गवसले का?
गवसले ते हरवले का?
हरवले ते गवसले का?
गवसले ते हरवले का?
मीलनाचा परिमल तोचि
फूल तेचि त्या स्वरुपी
मीलनाचा परिमल तोचि
फूल तेचि त्या स्वरुपी
पाकळ्यांच्या उघडझापी
पाकळ्यांच्या उघडझापी
हास्य उमले वेगळे का?
हास्य उमले वेगळे का?
हरवले ते गवसले का?
गवसले ते हरवले का?
पावसाळी ग्रीष्म सरिता
सागराला फिरुनि मिळता
जलाशयाची सृष्टी आता
जलाशयाची सृष्टी आता
मृगजळे ही व्यापिली का?
मृगजळे ही व्यापिली का?
हरवले ते गवसले का?
गवसले ते हरवले का?
दूर असता जवळी आले
जवळी येता दूर गेले
जो न माझे दुःख हसले
जो न माझे दुःख हसले
तोचि सुखही दुखावले का?
तोचि सुखही दुखावले का?
हरवले ते गवसले का?
गवसले ते हरवले का?
*पी. सावळाराम* (गीतकार)

मराठी भावगीतांच्या विश्वात मानवी मनाच्या सूक्ष्म भावछटांना शब्दात पकडणारे गीतकार म्हणजे पी सावळाराम
हरवले ते गवसले का
गवसले ते हरवले का…
या गीताच्या ध्रुवपदात कवी एक मूलभूत प्रश्न विचारतो. हा प्रश्न केवळ एखाद्याच्या प्रेम संबंधापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवी जीवनालाच व्यापून टाकतो. जीवनात हरवल्यानंतर काहीतरी नवे, वेगळे सापडते या शाश्वत सत्याचे सूक्ष्मदर्शन या ध्रुवपदात घडते.
*मिलनाचा परिमल तोची*
*फुल तेची त्या स्वरूपी*
*पाकळ्यांच्या उघडझापी*
*हास्य उमले वेगळे का?*
या ओळीत बदलत्या भावविश्वाचा अत्यंत सुंदर काव्यमय अविष्कार आहे. फुलांचा सुगंध, त्याची उमलण्याची प्रक्रिया हे रूपक मानून कवीने नात्यातील बदल व्यक्त केले आहेत. व्यक्ती तीच, प्रेमही तेच पण अनुभव आणि परिस्थिती बदलल्यावर त्याच नात्याचा अर्थ का बदलावा ही शंका इथे व्यक्त झालेली आहे.
*पावसाळी ग्रीष्म सरिता*
*सागराला फिरुनि मिळता*
*जलाशयाची सृष्टी आता*
*जलाशयाची सृष्टी आता*
*मृगजळे ही व्यापिली का?*
*मृगजळे ही व्यापिली का?*
दुसऱ्या कडव्यातील सरिता आणि सागराचे रूपक जीवनाच्या अखंड प्रवासाचे प्रतीक आहे. ग्रीष्मातील कोरडी नदी वर्षा ऋतू येताच वाहू लागते. ती सागराला मिळते पण त्या मिलनानेही सर्व प्रश्न संपत नाहीत. *मृगजळे ही व्यापली का* ? या प्रश्नातून मनातील भ्रम, अपेक्षा आणि अपूर्णतेची जाणीव व्यक्त होते. अंतिम ध्येय तर गाठलं पण मनाची तहान भागली नाही हा विचार इथे सूचित होतो. इतका मोठा जलाशय वास्तविक समोर दिसत असतानाही मन मात्र त्यास मृगजळ का मानत आहे ?जळाचा केवळ आभासच का वाटत आहे ? हा संभ्रम या ओळींमध्ये जाणवतो. सत्याला असत्याकडे आणि तेही केवळ कल्पनेतच नेत आहे. ही शंकेची, संशयाची सुई टोचत आहे.
*दूर असता जवळी आले*
*जवळी येता दूर गेले*
*जो न माझे दुःख हसले*
*जो न माझे दुःख हसले*
*तोचि सुखही दुखावले का?*
*तोचि सुखही दुखावले का?*
*हरवले ते गवसले का?*
*गवसले ते हरवले का?*
या शेवटच्या कडव्यात मानवी नात्यातील विरोधाभास उत्कटपणे व्यक्त होतो.
*दूर असता जवळी आले*।
*जवळी येता दूर गेले*।
या ओळी अतिशय अलवार आहेत. या शब्दांच्या गर्भात एक वास्तव सूक्ष्मपणे दडलेले आहे. अंतरामुळे, विरहामुळे नकळत ओढ वाढते पण जवळ आल्यानंतर त्यातली आर्तता विरून जाते. अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज यामुळे मनाचे अंतर वाढते. म्हणूनच या कडव्यातला शेवटचा प्रश्न अधिक वेधक ठरतो.
ज्या सुखाने एकेकाळी दुःखाला हसवलं होतं तेच सुख आज मात्र नव्या वेदनांची जाणीव का देत आहे? जे काल होतं ते आजही तसेच का नाही,आज हे वरवरचे, लवचिक पोपड्यासारखे का वाटते? हा प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाच्या अखंड शोधयात्रेचे प्रतीक आहे.
खरोखरच हे भावगीत ऐकल्यानंतर मनही हरवून जाते. या गीतातली प्रश्नात्मक शैली अत्यंत चिंतनशील आहे.यात शृंगार, करूण आणि शांत रस याचा सुंदर संगम आहे. शृंगार हा केवळ प्रेम भावनेपुरता मर्यादित राहत नाही तर तो जीवनाशी, निसर्गाशी आणि अस्तित्वाशी असलेल्या नात्याचा होऊन जातो. नात्यांच्या दुराव्यातून प्रकटतो तर शेवटी शांत रस जीवनाचे स्वीकारमूलक तत्त्वज्ञान मांडतो.
कवीने फूल, परिमल, पाकळ्या, सरिता, सागर आणि मृगजळ या निसर्ग प्रतिमांचा वापर करून जीवनातील भावविश्व अत्यंत सहजपणे उभे केले आहे. त्यामुळे हे गीत उपदेशात्मक न वाटता अनुभवात्मक बनते. अगदी सहजपणे स्वतःच्या आयुष्यातील एखाद्या प्रसंगाशी जोडते.
प्राप्ती आणि गमावणे, मिलन आणि विरह, जवळीक आणि दुरावा या विरोधाभासांचा वेध घेणारे हे चिंतनशील गीत आहे. अतिशय सुंदर असा विरोधाभास अलंकार यात अनुभवायला मिळतो. निसर्ग प्रतिमाद्वारे मानवी मनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करण्याचे *कविवर्य पी. सावळाराम* यांचे काव्य कसब अलौकिक आहे. श्रोत्याला अंतर्मुख करणारे आहे. ते एक दिशा दाखवते. या गीतांशी नकळतच श्रोत्यांचा एक आत्मसंवाद होतो.
*कवी पी सावळाराम* यांची रचना, *वसंत* *प्रभू* यांचे संगीत आणि *गानकोकिळा लता मंगेशकर* यांच्या स्वरातील कोमलता याचा अतुलनीय संयोग म्हणजे हे भावगीत.
मानवी जीवनातील विरोधाभास, नात्यांचे सूक्ष्म मानसशास्त्र आणि अस्तित्त्वाच्या शाश्वत शोधाचे काव्यमय प्रतिबिंब म्हणून हे गीत अनेक दशकांनंतरही कालातीत आहे, ताजे आहे, चिरंतन आहे.

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
