गावाकडच्या आठवणीत
“मुंबयत रहवलेला चेंडू इतक्या लाम्ब शाळेत कसा जायत?” बाबांच्या सेवानिवृत्तीनंतर सातवी पास होऊन, आम्ही गावी स्थायिक होण्यासाठी आलो. त्यावेळी शेजारी बायकांची कुजबुज कानी येऊ लागली होती.
आमच्या गावापासून अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा ही शाळा जवळ जवळ अंदाजे चार किलोमीटर अंतरावर होती. शिवाय शाळेच्या हया प्रवासासाठी कोणतेही साधन नव्हते. पायी जाणे व पायी येणे. शिवाय माझ्या वीरवाडी गावातून शाळेत जाणारी फक्त मुले होती. त्यामुळे आईची शाळेत जाण्यास नकार घंटा होती. पण माझ्या निश्चयाचा महामेरु ठाम होता. काही झाले तरी शाळेत जायचच. माझ्या हट्टामुळे आईचा होकार पदरी पाडून घेतला.
पुढील विषयाकडे वळण्यापूर्वी माझे मन माझ्या जन्मभूमीकडे वेध घेऊ लागले आहे. १९६३ मध्ये तालुका- देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग, मुक्काम- नाडण वीरवाडी, या छोट्याशा गावात निडर व ध्येयवादी मातेच्या उदरी माझा जन्म झाला. आम्ही तीन बहिणी व एक भाऊ. मी मात्र शेंडेफळ. त्यावेळी घडलेली सत्य घटना माझ्या आईकडून ऐकली होती.
१९६४-६५ चा काळ होता. आमचे कोयंडे घराणे म्हणजे पाटीलकीचे. त्यामुळे घरही अवाढव्य व त्यातील माणसांची वस्ती ही मोठ्या संख्येने होती. चुलत काका व सख्खे काका असे मिळून आमचे मोठे कुटुंब होते. गुरंढोरंही भरपूर होती. आंब्याच्या बागा व शेतजमिनीही भरपूर होत्या. शेवटी घराघरात मालमत्तेवरूनच वाद होण्यास सुरुवात होते.
नेमके तेच पडसाद आमच्याही घरी उमटले. चुलत काका त्यावेळी बऱ्यापैकी शिकलेले, महाडला ते शाळेवर शिक्षकही होते. त्यांच्या लोभी वृत्तीमुळे, काही ना काही कारणांवरून घरात धुसफूस होऊ लागली. शेवटी त्याचे रुपांतर मोठया वादात झाले. आमच्या कुटुंबाला चुलत काकांनी मिळून घराबाहेर काढले.
माझे बाबा त्यावेळी मुंबईला बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मधे क्रेन ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. तीन काका, त्यांच्या पत्नी व मुले, आजी व आम्ही चार भावंडे, एवढया परिवाराचा भार, थोरला मुलगा या नात्याने बाबांवर होता. कुटुंबाला कुठे ठेवायचे ? या प्रश्नात आई अडकली. तिने अचूक मार्ग काढला. तिन्ही काकांना त्यांच्या पत्नी व मुलांसह प्रत्येकाच्या सासूरवाडीस धाडले.
स्वतः,आम्हाला व आजीस घेऊन गावातील टुकरुल यांच्या पडवीत आसरा मागितला. बाबांना ही घटना आईने कळवली. आज कुणाच्या, पडवीत पंधरा दिवस तर उद्या कुणाच्या पारस दारी पंधरा दिवस, असे आमचे दिवस जात होते. तिथेही ते काका येऊन त्रास देत असत.
रात्री येऊन गोठ्याला आग लावली व आमच्या वाटणीची गुरं पळवून नेली. शेवटी दोन-चार गुरं, आईने मामाच्या गावी मोंड येथे नेऊन ठेवली. त्यावेळी ते काका माझ्या मामाकडे गेले. पण मामाने ठणकावून सांगितले, “येसूची ढोरा हत ती, हिम्मत आसात तर, दाव्या सोडून दाखवा.” पण हे काही त्यांना जमले नाही.
बाबांनी कर्ज घेऊन, बक्षीस पत्रांवर आईने आमच्याच गावात जमीन घेतली. माझी मोठी बहीण तशी पंधरा- सोळा वर्षाची. पाण्याने भरलेले हंडे डोक्यावर घेऊन घाटीने वर तिनेच चढवले. नवीन घर बांधताना कौतुकास्पद श्रमिक काम तिच्या मदतीने झाले. ती मोठ्या अभिमानाने ती गोष्ट आम्हाला सांगत असे.
गावाबाहेर काढणाऱ्या दुष्ट वृत्तीना धिटाईने व ध्येयाने सामोरी उभी राहिली, ती माझी आई व तिला साथ दिली ते माझे बाबा, श्री बाळा गोपाळ कोयंडे व सौ. भागीरथी बाळा कोयंडे. माझ्या देवरुपी माता- पित्यास शतशः प्रणाम!
सन १९७६ मध्ये मी आठवीच्या वर्गात प्रवेश घेतला. माझ्यासाठी ज्या मुलांची मला सोबत मिळाली ते, जयवंत भाबल, रवींद्र गावकर, राजाराम भाबल, अशोक कोयंडे, ज्ञानेश्वर भाबल, विश्वनाथ कोयंडे, बाळा उपरकर, माझा सख्खा आतेभाऊ आणि मी एकटीच मुलगी जनाबाई कोयंडे(लग्ना पुर्वीचे माझे नाव).
रोज सकाळी साडेआठपर्यंत घरातील धुणीभांडी करून, शाळेची तयारी आवरून अंगणाच्या पायरी वर बसायचे. घाटीवरून वर चढताना मुले दिसली की, त्या मुलांच्या पाठोपाठ चालत राहायचं. रस्ता संपला की दोन डोंगर चढावे व उतरावे लागत. थोडं पुढे गेल्यानंतर दगडी गडगा (कुंपण) पार केले की, वाड्याचा रस्ता लागत असे.
सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांपेक्षा माझा चालण्याचा वेग तसा कमीच, त्यामुळे डोंगर चढणीवर माझा चालण्याचा वेग मंदावत असे. मुलं मात्र झरझर डोंगर चढून, उतरणीला लागायचे. जेव्हा ते नजरेआड होत असत, त्यावेळी भीतीने मी पळतच डोंगर पार करण्याच्या प्रयत्नात असे. कारण त्या पूर्ण मोकळया सड्यावर सुसाट वाहणारा वारा, झाडेझुडपे, पाय वाटा, क्वचितच खूप लांबवर एखाद्या माणसाचे दर्शन होत असे. त्यामुळे जीव भीतीने धडधडत असे.
पण मुलं मात्र मला डोंगर चढेपर्यंत, पुढे जाऊन थोडे थांबून राहत असत. वाड्याचा रस्ता लागला की मुले रस्त्याच्या कडेला एक मोठे वडाचे झाड होते, त्या झाडाखाली बसत असत. मी मात्र तिथून त्यांना मागे टाकून पुढे निघून जात असे. कारण पुढे चांभार घाटीस मंगल (मैत्रीण) व पुढचा पूल पार केला कि, गुलशन (मैत्रीण) भेटत असत. त्यामुळे पुढचा प्रवास माझा मजेत जात असे.
पावसाचे दिवस आले की, खूप मजा वाटायची. गावचा पाऊस खरा नैसर्गिक नजारा असतो. त्या दिवशी शाळेत पोहोचेपर्यंत, पाऊस रिमझिम होता. तासाभरात पावसाचा जोर वाढला. काळोख दाटू लागला होता. मधल्या सुट्टीनंतर शाळा सोडण्यात आली. माझ्या सोबतच सर्व मुले बरोबरीने चालत होती.
मानातला ओहोळ(परिसराचे नाव) आला. पाणी कमरेच्या वर उंचीने धावत होते. आम्ही सगळे तिथेच थांबलो. छत्रीचा काहीच उपयोग होत नव्हता. पायातली चपला काढून बॅगेत कोंबल्या व तिथेच झाडाच्या आडोशाला थांबलो. अर्धा-एक तासातच गावातून पुरुष मंडळी दोरखंड घेऊन आले. रस्सीचे एक टोक पलीकडे बांधले. दुसरे अलीकडे बांधले. सगळे पुरुष रस्सी धरून ओहोळयात उतरले. अंतराअंतराने उभे राहिले. आम्हा मुलांच्या हाताला धरून पलीकडे आणू लागले. त्या वेळचा अनुभव जबरदस्त होता. पाय पाण्यात थांबत नव्हता. तेव्हा ते पुरुष ओरडत होते, “पाय घट दाबून आडवो ठेवा, पाण्याच्या उलट दिशेक तुमचो पाय असूक होयो.” हा असतो युक्तिवाद !
पुढचे दोन ओहळ असेच पार केले. मोठा दिव्यंगत पराक्रम केल्याचा आनंद वाटत होता. सांज होता होता सगळे घरी पोहोचलो.
त्याच दरम्यान एके दिवशी, शाळेत जाताना पावसाचा जोर काहीसा जोरदार होता. मुलं पुढे व मी मागे चालत होते. कोंडीच्या ओहळात आलो. पाण्याची पातळी वाढलेली होती पण पार करण्याइतपत होती. मागे पुढे मुलं होतीच. मीही ओहोळात उतरले. अचानक माझा पाय दगडाच्या चिरात गेला, नि पायाच्या डोळ्याजवळ (घोट्याजवळ) माझा पाय फाटला. पाण्याने लाल रंग घेतला. मुलंही थबकली. रक्त पाहून माझा जीव घाबरा- घूबरा झाला. मुलांनी मला तिथेच बसवले. बाजूलाच कांबळे यांचा मांगर होता.(शेतघर) त्यांच्याकडून चुना घेतला व तो माझ्या जखमेवर लावला. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. कुणीतरी रुमाल काढून माझ्या जखमेवर बांधला व तिघा चौघांनी मला पुन्हा मागे घरी आणून सोडले. त्यांच्यातील मैत्रीची माणुसकी आजही माझ्या मनात घर करून आहे.
शाळेच्या रजेसाठी मी मुलांकडे चिठ्ठी पाठवली. त्यावेळी मुलं व पालक यांच्यातील विश्वास मोठा होता. प्रामाणिकपणाचा दाखला होता. त्यामुळे शाळेत कधी डॉक्टरी दाखला देण्याची गरज भासली नाही. जवळ- जवळ महिनाभर मला घरी राहावे लागले. मुलांनी रोजचा शाळेचा अभ्यास आणून देण्यास, मदतीचा हातभार लावला. महिनाभर जखमेवरची मलमपट्टी, माझ्या माईने (काकी) आपलेपणाच्या प्रेमाने केली. कारण तेव्हा आई भावासोबत मुंबईला होती. आईची उणीव तिच्या मायाळू हाताने कधी जाणवू दिली नाही. आज ती या जगात नाही. मोरपंखासारखा तिचा प्रेमळ स्पर्श आजही मला जाणवतो.

– लेखन : वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.
👍👍👍👍👍👌छान शालेय आठवणी