Tuesday, June 17, 2025
Homeलेखमाझी ऑस्ट्रेलियाची सफर : 1

माझी ऑस्ट्रेलियाची सफर : 1

अभिनेत्री, एकपात्री कलाकार, लेखिका मेघना साने या नुकत्याच ऑस्ट्रेलियात जाऊन आल्या. या बद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. त्यांनी तिथे केलेले कार्यक्रम, भटकंती, अनुभव या विषयी त्या आपल्या पोर्टलवर लिहिणार आहेत. वाचू या, आजचा पहिला भाग.
– संपादक

२८ फेब्रुवारीला सकाळी सात वाजताचे दिल्ली फ्लाईट पकडण्यासाठी माझ्या मिस्टरांनी पहाटे साडेतीन वाजता उठून मला कारने छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचवले. सामान ट्रॉलीत चढवून दिले आणि म्हणाले, “इथून पुढे तुझा प्रवास एकटीने होणार आहे, सांभाळून जा.”

मी ट्रॉली ढकलत आत गेले आणि एअर इंडियाचा बूथ शोधून काढला. मोठमोठ्या बॅगा घेतलेल्या प्रवाशांची लांबलचक लाईन होती. येथे तासभर तरी उभे राहावे लागेल असे दिसले. माझ्या अचानक लक्षात आले की स्टाफ तिकीट ची विंडो वेगळी असावी. तेथील कर्मचाऱ्याला विचारले, तेव्हा त्यांनी मला आदराने स्टाफ तिकीटच्या विंडोजवळ सोडले. तेथे एक स्त्री आणि एक पुरुष असे उभे होते. ते वेगवेगळे प्रवासी होते. तेही स्टाफ तिकीटच्या बोर्डिंग पास साठी थांबले होते. ज्याचे नातलग एअर इंडियात असतात त्यांना एअर इंडिया तर्फे असे कन्सेशन मध्ये तिकीट मिळत असते. पण विमानात जागा असेल तरच बोर्डिंग पास मिळतो. नाहीतर दुसऱ्या दिवशी या असे सांगण्यात येते.

सातच्या विमानाचा बोर्डिंग पास सहा वाजेपर्यंत मिळणार नव्हता. त्यामुळे तोवर आम्ही एकमेकांत गप्पा मारत बसलो. त्या स्त्रीचे नाव वैशाली बागुल असे होते आणि ते गृहस्थ होते प्रमोद शिंदे. दोघेही सिडनी पर्यंत प्रवास करणार असे समजले. तेव्हा आमची ओळख झाल्याबद्दल आम्ही तिघेही आनंदून गेलो. कारण दिल्लीला फ्लाईट पोचल्यावर पाच तास एअरपोर्टवर थांबावे लागणार होते, तेव्हा कुठे सिडनीची फ्लाईट मिळणार होती. आता पाच तास आम्ही एकत्र घालवावे असे ठरले. आम्हाला तिघांनाही बोर्डिंग पास मिळाले आणि आम्ही विमानात एकत्र चढलो. सीट थोड्या दूर दूर होत्या. पण दिल्लीला भेटणारच होतो.

दिल्लीच्या या फ्लाईट मध्ये बसल्यावर मी स्वतःला चिमटा काढला. खरंच का आपण ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे दोन आठवड्यांसाठी एकटेच जात आहोत ? मी परदेशी जात असल्याची बातमी कशी कोण जाणे पण मैत्रीणींमध्ये फुटलीच होती.
“काय गं एकटीच चालली आहेस म्हणे ऑस्ट्रेलियाला ? नवऱ्याला का घेऊन जात नाहीस बरोबर ?”
टिपिकल प्रश्न !
“ऑस्ट्रेलियाला चाललीस ? कोण मुलगा आहे की मुलगी आहे तिकडे ?”
माझे कोणीच नातलग तिथे नाहीत आणि मी एकटीच चालली आहे फिरायला. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे लोकांना कळत नव्हतं. बरं मी कुठल्या ट्रॅव्हल कंपनीनेही जात नव्हते.

मंडळी, कार्यक्रम सादर करणे हाच माझा व्यवसाय असल्याने निरनिराळ्या शहरांमध्येच काय, निरनिराळ्या देशांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी मी जात असते. कधी माझ्यासोबत काही कलाकार मंडळी असतात किंवा कधी कलाकारांना नेणे परवडले नाही तर मी एकटीच जाऊन येत असते.आजवर ‘कोवळी उन्हे‘ या माझ्या एकपात्री प्रयोगासाठी अमेरिका, युके, इस्रायल अशा अनेक देशांचा मी एकटीनेच दौरा केला होता. ओळखीच्या लोकांपेक्षा अनोळखी माणसांकडेच अनेकदा उतरले होते. परदेशातील मराठी माणसे चांगली असतात, प्रेमळ असतात, सज्जन असतात असाच माझा आजवरचा अनुभव आहे.

विमानाने टेक ऑफ घेतला आणि मी एका उंचीवर स्थिर झाले. ढगांच्या गाद्यांवरून हळुवार पुढे निघाले. गेल्या वर्षभरात मी विणलेला ऑस्ट्रेलियातील मराठी माणसांच्या नात्याचा पट हळूहळू माझ्या डोळ्यापुढून सरकू लागला.

तसा २००५ मध्येही माझा एक ऑस्ट्रेलिया दौरा झाला होता. ‘गप्पागोष्टी’कार जयंत ओक यांचेबरोबर मी महिन्याभराचा ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर दौरा केला होता. त्यावेळी ‘गप्पागोष्टी‘ हा आमचा विनोदी कार्यक्रम पाच वर्षे अगदी फॉर्मात होता आणि त्यामुळे मराठी असोसिएशन सिडनी इन कॉर्पोरेटेड (MASI) या महाराष्ट्र मंडळांने आणि महाराष्ट्र मंडळ, मेलबर्न यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी सिडनी आणि मेलबर्न येथील मराठी माणसांकडून पाहुणचार मी घेतला होता.

आता जवळजवळ वीस वर्षांनी माझा ऑस्ट्रेलिया दौरा होत होता. तो वेगळ्या कामाच्या निमित्ताने.
मराठी सातासमुद्रापार‘ या पुस्तकाचे लेखन करताना मला अनेक देशातील अनेक मराठी माणसांच्या कार्याबद्दल माहिती हवी होती. परदेशातील मराठी मंडळी आपली मराठी भाषा आणि संस्कार तिथे रुजवण्यासाठी किती झटतात, काय काय उपक्रम करतात, तेथे मराठी शाळा कशा निर्माण झाल्या आहेत हे सर्व संशोधन करून हे पुस्तक मी लिहीत होते. यातील काही लेख ‘न्यूज स्टोरी टुडे‘ या वेब पोर्टलवर प्रकाशित झाले होतेच. तुम्ही वाचले असतील.

याच पुस्तकाच्या संदर्भात सिडनी येथील अभिनेत्री नीलिमा बेर्डे, महाराष्ट्र मंडळ, मेलबर्नचे अध्यक्ष यशवंत जगताप, सिडनीतील सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक नेपोलियन आल्मेडा, आकाशवाणी सिडनीची तत्कालीन अध्यक्ष सुरुची लिमये अशा अनेक ओळखी झाल्या होत्या.

२०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाचे आमंत्रणही मला मिळाले होते. पण मी जाऊन शकले नाही. तेथे मी माझा संत चरित्रावरील ‘मेघमणी‘ कार्यक्रम सिंधू व्याख्यान‌मालेत ऑनलाईन केला होता.

पुढे या संमेलनासाठी आमचे ग्रंथालीचे प्रकाशक सुदेश हिंगलासपुरकर उपस्थित राहणार असल्याने माझ्या ‘मराठी सातासमुद्रापार‘ या पुस्तकाचे प्रकाशन त्या संमेलनात माननीय समाजसेविका पुष्पा कोल्हे यांचे हस्ते झाले होते. ऑस्ट्रेलियाशी अशा प्रकारचे ऋणानुबंध जुळले होते.

आता मात्र ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग निलिमा बेर्डे यांच्यामुळे आला होता. गेली दोन वर्ष तशी आमची फोनाफोनी होतीच. अनेकांच्या ओळखी करून देण्यातही तिने पुढाकार घेतला होता. तसेच “सह्याद्री सिडनी” नावाची मराठी तरुणांची संस्था सिडनी येथे शिवजयंतीच्या भव्य सोहळ्याचे आयोजन करत आहे व मी त्यांची मुलाखत घ्यावी असे तिने मला सुचवले. मी सगळी माहिती घेतली आणि मुलाखत आयोजित केली. झूमवरुन ही मुलाखत घेतल्याने माझी त्या सर्व कार्यकर्त्यांशी दुरूनच खरी, पण भेट झाली. यात कोणीही राजकारणी मंडळी सहभागी नव्हती. भव्य शिवजयंती उत्सवाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते व त्यासाठी अनेकांना एकत्र आणून व्यवस्थित आयोजन केले होते.

भारतातून लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे व त्यांच्या पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे हे निमंत्रित होते. डेकोरेशन, कार्यक्रम, आमंत्रण, नंतरच्या जेवणाची सर्व तयारी करण्यासाठी अनेक कमिट्या तयार केल्या होत्या. हे सर्व ऐकून मी भारावून गेले. हा कार्यक्रम निश्चितच सुंदर होणार होता. याची अधिक पब्लिसिटी करण्यासाठी ‘कोकण नाऊ’ चॅनलला मी मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीसाठी आम्ही वीस मिनिटांचा एक सुंदर व्हिडिओच बनवला. यासाठी सुद्धा निलीमाने खूप मदत केली. या व्हिडिओमध्ये त्यांनी समारंभासाठी केलेली तयारी स्पष्ट दिसत होती. ‘मलाही यायची खूप इच्छा होत आहे.’ असे मी मुलाखतीदरम्यानच म्हटले.
अर्थात ऑस्ट्रेलिया इतके दूर आहे की आपण हे उगाचच म्हणत आहोत असे मला वाटले. परंतु निलीमाने आग्रह केला. कार्यक्रमाला फक्त पंधरा दिवस उरलेले असताना मला व्हिसा तरी कसा मिळणार असे मी बोलून दाखवल्यावर तिने स्वतःचे इनविटेशन लेटर, पासपोर्ट तपशील वगैरे पाठवला आणि क्रॉसवर्ल्ड मधून आठ दिवसात मला व्हिसा मिळाला.

माझ्या भावाने, नितिनने एअर इंडियातून तिकिटाची व्यवस्था केली. आणि मी खरोखरीच ऑस्ट्रेलियाला निघाले होते. दोन तासाचा मुंबई- दिल्ली प्रवास अगदी अलगद झाला आणि विमान दिल्लीला पोहोचले. प्रवासात एअर इंडिया तर्फे नाश्ता मिळाला होता.

मी विमानातून उतरून लगेज बेल्ट जवळ गेले. तेथे प्रमोद आणि वैशाली भेटलेच. आमच्याजवळ आता भरपूर वेळ होता. पुढील विमान होते पाच तासांनी. गप्पा, गोष्टी, विनोद करीत, एकमेकांचे फोटो काढत आम्ही दिल्ली एअरपोर्ट वरील बाकांवर जागा शोधली आणि ट्रॉली घेऊन तिथे बसलो.

प्रमोद यांना चित्रपट गीतांची आवड होती. काही किस्सेही पाठ होते. त्यात वैशाली आणखीन साहित्यिक भर टाकत होती. एकूण साहित्य, संगीत हे विषय सुरू असल्याने माझे मन रमले. एकमेकांच्या वैयक्तिक जीवनात अजिबात न शिरता आमच्या मोकळ्या गप्पा सुरू होत्या. कॉफीपान झाले. सिडनीला जाताना मला नवीन ड्रेस घालायचा होता. सामान त्यांच्या ताब्यात देऊन बदलण्याचा ड्रेस घेऊन मी एअरपोर्टवरची एक रेस्ट रूम शोधली. तेथून छान पैकी तयार होऊन पुन्हा ग्रुप जवळ निघाले. पण वैशाली आणि प्रमोद मला दिसेनात. दोन फेऱ्या झाल्या तरी मला ते दिसले नाहीत. मग विचार केला मगाशी कोणत्या स्टॉलवर कॉफी प्यायला गेलो तेथेच ते दोघेजण बसले असतील. मी खरंतर रडकुंडीला आले होते. तेवढ्यात मला प्रमोद दिसले.
“अहो, आता मी टीव्हीवर जाहिरात द्यायला निघालो होतो. आपण यांना पाहिलंत का? नुकताच काढलेला तुमचा फोटो होता माझ्या मोबाईलमध्ये.”
मी रडता रडता हसायला लागले.
“अहो पण आपल्याला टीव्हीवाल्यांना हिच्या कपड्याचे वर्णन सांगता आलं नसतं. आता बघा ही केवढी स्मार्ट दिसते आहे.”

मी पंजाबी ड्रेस बदलून शर्ट पॅन्ट घालून आले होते. त्याचे कौतुक चालले होते.पण मला कळून चुकले होते आपण स्वतःला जेवढे स्मार्ट समजतो तेवढे आपण नाही. आता सांभाळून राहिले पाहिजे. पुढे मात्र वैशालीने मला एकटे कुठेही सोडले नाही. अगदी सिडनी एअरपोर्टवर मला घ्यायला येणारी माणसे आल्यावर त्यांच्या ताब्यात देऊनच ती घरी गेली…..
क्रमशः

मेघना साने

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. किती छान अनुभव शब्दांकन…एकेक गोष्ट बारकाईने लिहिली आहे..पूर्ण प्रवास वाचायला नक्की आवडेल..

  2. वाह खूप छान ऑस्ट्रेलिया मुबई दिल्ली to ऑस्ट्रेलिया खूप छान प्रवास वर्णन. दुसरा पार्ट वाचण्याची उत्सुकता वाढली आहे..all the best meghanatai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments