वंचितांना अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी नुकतेच केले
संविधान फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित संविधान शाळेच्या चौथ्या संवादात “लोकशाही, अभिव्यक्ति स्वातंत्र्य व घटनात्मक मूल्य” या विषयावर ते बोलत होते.
डॉ. गव्हाणे पुढे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात काही प्रदूषित बेटं निर्माण झाली असली तरी दुसरीकडे वंचितांचे नवीन नेतृत्व निर्माण होताना आज दिसत आहे. किड्यामुंग्यांना महत्त्व देणारी व्यवस्था माणसांना तुच्छ लेखत होती. अशा गुलामीच्या व्यवस्थेतील उपेक्षित आणि पीडित माणसांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपल्या लोकशाहीने केले आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीने, व्यापक समाज हित व राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून निर्माण केलेल्या राज्य घटनेमुळे मूठभरांना मिळणारे अधिकार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे सबलीकरण होऊन वंचित-उपेक्षितांना आत्मभान व प्रतिष्ठा मिळाली. स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या आर्थिक व सामाजिक जीवनात शांततामय मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणला हे आपल्या लोकशाहीचे मोठे द्योतक आहे.
यावेळी बोलताना माजी सनदी अधिकारी व संविधान फाऊंडेशनचे संस्थापक श्री इ. झेड. खोब्रागडे म्हणाले की, नागरिकांनी संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे. राजकीय लोकशाही ही सामाजिक व आर्थिक लोकशाहीत परावर्तित करून संविधान यशस्वी करण्यासाठी संविधानाची मूल्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. संविधान जनजागृतीचे अभियान पुढे निरंतर चालविण्यासाठी “संविधान मित्र” होण्याचे आवाहन त्यांनी केले.
महिला, युवक, वंचित, शोषित, पीडित, उपेक्षितांच्या वस्त्या, गावांपर्यंत संविधानाची मूल्ये पोहोचविण्यासाठी संविधान परिषदा, संविधान व्याख्यानमाला व संविधान संमेलनाचे आयोजन करण्याचे काम “संविधान मित्र” आपापल्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे करू शकतात. संविधानाला अपेक्षित भारत निर्माण करण्यासाठी संविधान सोप्या भाषेत समजावून सांगत लोकांना सक्षम करण्याचे, राष्ट्र निर्माणाचे कार्य करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहनही श्री खोब्रागडे यांनी केले.
यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी संवाद हा संवाद साधला. प्रारंभी निर्जरा मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. तर प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
विचारप्रवर्तक