Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यजीवन प्रवास - भाग - ४

जीवन प्रवास – भाग – ४

ज्ञानमंदिर
पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण, मी मुंबईला, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्या शाळा, खेतवाडी, गिरगाव येथे घेतले. या वर्गांचा अभ्यास, पाठांतर करून पास व्हायचं, एवढंच ध्येय, त्यावेळी माझ्या मनी होते.

बाबांच्या सेवानिवृत्तीनंतर गावी स्थायिक झालो. अनंत केळकर हायस्कूल, वाडा शाळेत, मोठ्या प्रयासाने मिळवलेला होकार व पायी चालत शाळेत जाण्याचा प्रवास, या दोन गोष्टींतून मला शिक्षणाचे महत्त्व कळू लागले होते. प्रत्येक गोष्टीची महत्वाकांक्षा उंचावत गेली. तसेच मला लाभलेले शिक्षक, यांनी दिलेला दूरदृष्टी ज्ञानाचा संकेत, यामुळे माझ्या जीवनी, ध्येयाचे वळण मिळाले होते.

इयत्ता आठवी पासून, इंग्रजी पुस्तकाचे दोन रीडर होते. अगदी पाचवीच्या अभ्यासापासूनची सुरुवात या रीडर मधून मला मिळाली होती.

मराठे सर, इंग्रजी विषय शिकवत असत. त्यांची शिकवण्याची खूबी दर्जेदार होती. गोरा वर्ण, सर्वसामान्य उंची, चेहऱ्यावर तेजस्वीपणा व शिक्षकी झलक लक्षात येत असे. वर्गात त्यांच्या येण्याने, शांतता पसरत असे. असा त्यांचा जबरदस्त दरारा होता.

नवीन पाठाचे इंग्रजी शब्द, स्पेलिंग सह, मराठी अर्थासोबत फळ्यावर लिहून देत असत. पाठ शिकता- शिकता शब्दांचे पाठांतर करून घेत असत. गृहपाठासाठी एक शब्द, पंचवीस वेळा लिहायला देत असत. दुसऱ्या दिवशी, त्याच शब्दांची तोंडी परीक्षा होत असे. इंग्रजी काळाची रूपे अशाच पद्धतीने त्यांनी करून घेतली होती. चुकीला मारही दणकेबाज असे. त्यामुळे भीतीपोटी, इंग्रजी शब्दांवर, पाठांतराणे वर्चस्व मिळवून, या विषयाचे आवडरुपी कुतूहल जागे झाले.

वेलणकर सर, गणित व विज्ञान असे दोन्ही महत्त्वाचे विषय शिकवत असत. ही व्यक्ती अगदी साधी, वर्ण गव्हाळ, डोळ्यावर चष्मा, उंची बेताचीच. मुद्देसूद बोलणे, पण नाकावर राग दिसे. त्यामुळे त्यांची चेहरेपट्टी पाहूनच, सगळा वर्ग मन लावून अभ्यासाला लागत असे.

बीजगणित व भूमिती म्हणजे, सुत्रांची घोकमपट्टी केल्याशिवाय सुटका नसे. प्रमेय म्हणजे भूमिती. फळ्यावर गणिते सोडवून घेणे, हाच आमच्यासाठी गृहपाठ असे. लाजेखातर पक्का अभ्यास करून येणे, अपरीहार्य होते. त्यामुळे कंटाळवाणा विषय असला तरी रुची वाढवून, मनात घर करू लागला.

विज्ञान विषयाची तीन पुस्तके जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र. प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांवर भर देऊन, या विषयाकडे माझे लक्ष केंद्रित झाले. शिवाय गावाकडे बेडूक म्हणा, गांडूळ म्हणा, असे लहान जीव, प्रयोग करताना उपयोगात येत असत.

माझा आवडता विषय मराठी. कमी बोलके, स्मितहास्य, शब्द उच्चार स्पष्ट, थोडेसे वाकलेले असे अंजरलेकर सर हा विषय शिकवत असत. व्याकरणावर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यामुळे माझे मराठी अधिकच सुयोग्य होत गेले. निबंध लेखनाचे मुद्दे लक्षात येऊ लागले. त्या गोष्टींचा मला पुढे जाऊन खूप फायदा झाला.

पायाने थोडेसे लंगडत, गोरा वर्ण व सडपातळ बांध्याचे, काळे सर हिंदी व संस्कृत या विषयास मिळाले. मुंबईकर असल्याने हिंदी भाषेवर इतर मुलांपेक्षा, माझी हिंदी भाषा चांगली होती. संस्कृत सुभाषिते व शब्दांचे अर्थ, पाठांतर करून घेण्याने संस्कृत विषय, हळूहळू आवडीचा बनला.

शारीरिक शिक्षण (पी.टी) या तासाला खूप मजा येत असे. माझी उंची चांगली असल्याने, लांब उडी व उंच उडी मध्ये, माझा नंबर ठरलेला असे. डॉज बॉल खेळताना, मोठा बॉल माझ्या, लांब पायातून अलगत न स्पर्श करता मी जाऊ देत असे.

माझ्या उंचीचा उपयोग, पळण्याच्या शर्यतीत मी चांगलाच करून घेतला. अशा स्पर्धेमध्ये मी बरीच बक्षीसेही घेतली. मैदानी खेळांचा खरा आस्वाद, शाळेच्या मागे कडेने आमराई, गर्द झाडे व मध्ये मैदान, अशा सुखद ठिकाणी मी घेतला.

त्यावेळी कार्यानुभव असा, एक विषय आम्हाला होता. या तासाला आम्ही मैदानात वाढलेले गवत, छोटी रानटी झुडपे, काढण्यास शाळेच्या आजूबाजूस जात असू, तर कधी शाळेचा टॉयलेट- बाथरूम धुण्याचे कामही करत असू.

शाळेच्या आवारात पडलेला झाडांचा पालापाचोळा, झाडून तो एका ठिकाणी ढीग करून जाळला जात असे. अशी अनेक साफसफाईची कामे या तासाला होत असत. तर कधी बल्बची जोडणी करून, बल्ब पेटवण्याचे शिक्षण देत असत. थोडक्यात, कार्य करून आलेला अनुभव असा या विषयाचा अर्थ असे.

अनंत केळकर हायस्कूल, वाडा. या शाळेत मला लाभलेले शिक्षक, मला घडविणारे शैक्षणिक कलेचे मूर्तिकार होते. शैक्षणिक रुचीला मिळालेले, आयुष्यातील महत्त्वाचे वळण होते.

दोन वर्षात माझ्या अभ्यासात खूपच प्रगती झाली होती. त्यामुळे नववी ‘ब’ मधून, मी पास होऊन, दहावी ‘अ’ तुकडीत आले. माझे सोबतीचे वर्ग मित्र मात्र ‘ब’ तुकडीच राहिले. त्यामुळे घरी जाता-येता मुलांची सोबत मिळत नसे. शेवटी अनेक प्रसंगांना झेलून मीही लाल मातीची, पाऊल वाटांची, डोंगर, ओहोळाची, झाडाझुडपांची घट्ट मैत्रिण झाले होते.

दहावीचा गणवेशही बदलला. चक्क! आम्हाला निळ्या काठाची पांढरी साडी व निळा ब्लाऊज. हा मुलींचा गणवेश होता. पावसाळ्यात या पेहरावाचा खूप त्रास होत असे. दहावीच्या जादा तासा मुळे कधीकधी एकटेच घरी यावे लागत असे. त्यामुळे घाबरून रोजच्या वाटेने न जाता, कधी नाडणच्या रस्त्याने (लांब अंतराने) जात असे. कधी माझी मैत्रीण विमल मालवणकर, माझ्यासाठी थांबून राहत असे. वाडातर हून वीरवाडीस, आमच्या गावातील कुणी माणूस जाणारा दिसला, की मी त्याच्या मागोमाग चालत जात असे. हे महत्त्वाचे दहावीचे, शाळेतील वर्ग संपले नि सुट्टी लागली.रात्री एक वाजे पर्यंत, कंदीलाच्या उजेडात, आईची सोबत घेत परीक्षेचा अभ्यास करत राहिले.

परीक्षेचे दिवस जवळ आले. परीक्षेचे सेंटर देवगड आले होते. रोज जाऊन- येऊन प्रवास करणे, कठीण होते. त्यामुळे आईने ओळखीच्या कुटुंबाची भेट घेतली, मलाही भेटवलं व माझ्या राहण्याची सोय, त्या कुटुंबाकडे केली. त्यांच्या घरापासून शाळा जवळच होती. अशी आम्ही तीन मुलं, त्यांच्या घरी राहण्यास आलो होतो. पेपर देऊन आल्यानंतर अभ्यासास भरपूर वेळ मिळत असे. परीक्षाही मनासारखी झाली होती. त्यामुळे निश्चय पक्का होता. “मी पास होणार.” मी जेथे राहत होते, त्यांनी घेतलेली काळजी, खाण्याची सोय वाखानण्याजोगी होती. कसलाही मोबदला न घेता, माझ्यावर झालेले त्यांचे उपकार, नेहमी आठवणीत राहतील !

महिन्याभरातच निकालाचा दिवस उजाडला. मन बेचैन होत होते. दुपारी शाळेत निकाल मिळणार होता. मी लवकरच घरातून निघाले. महादेवाच्या झाळी (गर्द झाडी) समोर हात जोडले, डोळे मिटले नि उघडताच चक्क समोर, ‘एक पांढरीशुभ्र गाय व तिला बिलगलेले वासरू, मला दिसले. आश्चर्य वाटले !

या तीन वर्षात, मला अशी पांढरीशुभ्र गाय कधीच दिसली नव्हती. मी पुढे निघाले. पाच दहा पावले टाकून मी पुन्हा मागे पाहिले. पण तिथे ती गाय व वासरू मला दिसली नाही. मी चारी बाजूस दूरवर नजर फिरवली. पण मला काही त्या दिसल्या नाहीत. मी मनाला समजावलं व पुढे निघाले. शाळेत पोहोचले. हाती निकाल मिळाला. आनंदाने भारावून गेले होते.

आजही तो दिवस आठवतो, कारण खऱ्या कष्टाचे फळ, माझ्या पदरी पडले होते. घरी येण्यास निघाले. ओहोळा पलीकडे आले, नि तिथे काही बायका- पुरुष मशागतीचे काम करत होते. त्यांनी मला लांबूनच आवाज दिला, “गो चेडवा, पास झालस काय ? मी ओरडून आनंदात ‘हो’ म्हणाले.

घरी येताच, आजूबाजूच्या केशव काकी, फाळके काकी, अब्याची आये, अशा बऱ्याच जणी आमच्या घरी आल्या. माझा निकाल ऐकून सर्वांनाच खूप आनंद झाला होता. तेव्हा त्या आईला म्हणाल्या, “गे बायोच्या आवशी, चेडवान, धाहवि पास होवन दाखवल्यान ! पुढे आणखी शिकव तेका.” माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

१९७९ मधे विरवाडी गावातून, प्रथमच पहिली मुलगी एस.एस.सी. पास झाली होती.**

वर्षा भाबल.

– लेखन : वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. 👍फारच सुंदर लेखन. वाचताना मजा आली. या निमित्ताने आठवी ते दहावी पर्यंत आम्हाला विषयवार शिकविणारे सर्व शिक्षक यांची आठवण झाली.
    🙏धन्यवाद

  2. गावातल्या मुलीची शिक्षणाची गोडी, प्रचंड आवड दिसून येते. हिच गावात s.s.c.झालेली मुलगी माझ्या प्रेमात पडली आणि विवाहबद्ध सुध्दा झाली. फार अभिमान वाटतो. सुंदर लेख …👍👍💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments