विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यासाठी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास झाला पाहिजे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून ‘भारतीय संविधानाची उद्देशिका‘ या शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मंत्रालयात करण्यात आले.
उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सामाजिक न्यायमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री पवार पुढे म्हणाले की, आदर्श नागरिक निर्माण होण्यासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्न करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेतील उद्देशिकेचा अभ्यास अधिक जागरूकपणे विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.
कोरोनाकाळातील संकट सर्वांबरोबर विद्यार्थ्यांचीही परीक्षाच पहात आहे. सर्वांसोबत विद्यार्थीही या लढाईत यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लेखक, संपादक आणि प्रकाशकांचे विशेष कौतुक केले.
प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी अतिशय कल्पकतेने या ग्रंथाची मांडणी केली असल्याचे गौरवोद्गार श्री धनंजय मुंडे यांनी काढले. प्रत्येक घराघरात हा ग्रंथ नेण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
संपादक विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. दीपक पुजारी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष तथा गटनेता कॅप्टन आशिष दामले, नगरसेवक प्रभाकर पाटील आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राम लिये उपस्थित होते.
या ग्रंथाचे लेखक प्रा.स्वप्नील सोनवणे, संपादक विठ्ठल मोरे तर प्रकाशक प्रा.संतोष राणे आहे.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.