Sunday, February 1, 2026
Homeसाहित्यडोळे : निवडक कविता

डोळे : निवडक कविता

निवडक कविता
१० जून या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त डोळे,दृष्टी, त्यांचे महत्त्व, नेत्रदान यावर आपल्या वेब पोर्टलने कविता आमंत्रित केल्या होत्या.

प्राप्त झालेल्या कवितांपैकी निवडक कविता पुढे देत आहोत. सर्व सहभागी कवींचे मनःपूर्वक आभार. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ संपादक. 9869484800
www.marathi.newsstorytoday.com

डोळे

ज्ञान देती डोळे
जाण देती डोळे
प्रेमाची निशाणी
बाण देती डोळे

सुंदर हे विश्व
सुंदर ही धरा
रंग आनंदाचे
भान देती डोळे

विश्वाचे रहस्य
सॄष्टीची गूढता
जीवन संगीता
कान देती डोळे

चांगले वाईट
सुंदर कुरूप
जाणण्या मनाला
त्राण देती डोळे

मानवी पूर्णता
डोळ्यांचे अस्तित्व
जाणीवांच्या दारा
मान देती डोळे

आईचे वात्सल्य
बाबांची ममता
ताईच्या प्रेमाला
ठाण देती डोळे

तिमीर दमणा
बुद्धीच्या चरणा
ब्रम्हांड भ्रमणा
यान देती डोळे

चांगली नजर
चांगलीच दॄष्टी
सॄष्टीच्या सौंदर्या
गाण देती डोळे

अमूल्य दागिना
काळजी घ्या त्यांची
थोरवी त्यांची जे
दान देती डोळे

दानाहुनी दान
श्रेष्ठ नेत्रदान
नाव लौकिकाची
खाण देती डोळे

– रचना : प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे

गझल : अंतरीचा दीप

आंधळ्यांचे जग कसे जाणून घेतो
मीच गांधारी क्षणी होऊन घेतो

नेत्र माझे बिघडले आता जरासे
अंतरीचे नेत्र मी उघडून घेतो

सूर्य इतका तापतो तो भरदुपारी
सावली कोठूनही मिळवून घेतो

नीलरंगी या नभी रंगांत नक्षी
मी दवाचे थेंब हे भिजवून घेतो

खेळ नियतीचे जसे बघ चाललेले
मी प्रभूंचे खेळणे बनवून घेतो

सोस तुजला लागलेला नेहमीचा
भोगणे सारेच आता भोगून घेतो

शेवटी अंधार असतो सत्य ‘सागर’
दीप माझ्या अंतरी लावून घेतो

– रचना : प्रकाश रामचंद्र क्षीरसागर.

कवयित्री भाग्यश्री खुटाळे यांनी स्वतः व मुलाचा नेत्र दानाचा फॉर्म भरून दिला आहे. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.

दृष्टीहीन मुलीचं अंतरंग

दिसेल का हो मला कधी..?

दिसेल का हो मला कधी
ही जादुई दुनिया
देवाची अन निसर्गाची
ही अदभुत किमया

उगवणारा सूर्य
अन वाहणारे नदी नाले
वेलीवरच्या नाजूक कळ्या
उमलणारी फुलें,
मन अधीर झाले हे सारे पहाया,
दिसेल का हो कधी मला ही जादुई दुनिया

उंच डोंगर,खोल दऱ्या
वाकडी तिकडी वाट
चमचमता सागर किनारा
उसळणारी लाट
आतुर मी झाले हा आनंद लुटाया
दिसेल का हो मला कधी ही जादुई दुनिया

लांबसडक रस्ते अन
धावणाऱ्या गाड्या
छोटी छोटी घरे,काही
उंच उंच माड्या
रोज मला लागले हे स्वप्न पडाया
दिसेल का हो कधी मला ही जादुई दुनिया..

तुम्ही म्हणता,अगं वेडे,
सारच छान नाही
रोज इथे घडत असतं
चांगलं वाईट काही
राजकारण, भ्रष्टाचार
बॉम्बस्फोट, घातपात
भूकंप येतो,त्सुनामी येते
रस्त्यावर अपघात
असू द्या हो, हे ही सगळं घडायचंच असतं
म्हणून काय आपण जगणं सोडायचं असतं ?
अहो, मी ही उचलीन माझा वाटा
हे सारं बदलाया
पण…दिसेन का हो कधी मला ही जादुई दुनिया

– रचना : सौ.भाग्यश्री सुधाकर खुटाळे

निर्णय नेत्रदानाचा

निर्णय आपल्या आयुष्याचा,
आपला
घ्यावा आपणच.

भरवसा नसे या जीवनाचा
वेळीच निर्णय घ्यावा
नेत्रदान करण्याचा.

नेत्र तुमचे बघतील
शिल्पकार उद्याचे
भविष्य उजळेल त्याचें.

वाट नका पाहु
नेत्रदान पेढीला कळवा
इच्छा नोंदवा तुमची
शेवटच्या क्षणाची

जाता जाता जमेल
राशी पुण्याची.

– रचना : सुरेखा तिवाटणे

अनमोल डोळे

डोळे बोलके
सर्व सांगतात
व्यक्त करतात
भाव नेटके.

निळे, करडे
काळे कधी घारे
रंग त्यांचे न्यारे
भूलही पडे.

जग दिसते
कार्य हे डोळ्याचे
किती महत्त्वाचे
भाग्य लाभते!

अश्रू रूपात
डोळ्यांतील पाणी
दुःखाची कहाणी
वदवतात.

सदा राखावे
डोळ्यांचे आरोग्य
व्यायामही योग्य
इष्ट ते खावे.

सत्कार्य व्हावे
श्रेष्ठ नेत्रदान
कृत्य हे महान
नक्की करावे.

– रचना : माधुरी मगर-काकडे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9