आम्ही नवी मुंबईतील सानपाडा येथे गेली १५ वर्षांपासून रहात आहोत. या सर्व कालावधीत आम्ही लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदान करीत आलो आहोत. अर्थात मतदान हा केवळ आपला हक्कच नाही तर जबाबदारी देखील आहे, अशी भावना या मागे होती आणि आहे. त्यामुळे वेळ प्रसंगी दोन तीन तास लागले तरी आम्ही त्रास सहन करीत आमच्या विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रात मतदान करीत आलो आहोत.
पण मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यावेळी आम्हाला नेहमी प्रमाणे विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रात न जाता मिलेनियम टॉवर्स वसाहतीत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याचा सुखद अनुभव आला. जवळपास १२०० फ्लॅट्सची सुसज्ज अशा या वसाहतीत मतदान केंद्र उभारले गेल्याने वसाहतीतील मतदार मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत होते. शाळेतील गैर सोयीच्या मतदान केंद्रापेक्षा वसाहतीत मतदान केंद्र उभारल्याने आम्हाला ही काम खूप सुसह्य झाले आहे, असे एका ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले.
वसाहती बाहेर काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी फेर फटका मारला असता, जवळील सेवेंथ डे शाळेत आणि दुसऱ्या एका मोठ्या वसाहतीत मतदान केंद्र उभारले असल्याचे दिसून आले. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रावर येणारा ताण, मतदारांना सोसावे लागणारे त्रास, लागणारा वेळ, होणारा वैताग अशा सर्व बाबी यावेळी निश्चित टळल्या. यामुळे सर्वीकडे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा होत असल्याचे दिसत होते. शिवाय जागोजागी चांगलाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाही म्हणायला, बहुतेक सर्वांच्या घरातील गृह सहायक, सहायिका यांना त्यांच्या गावाकडील उमेदवारांनी गावाकडे नेल्याने घरोघरच्या स्त्री पुरुषांवर कामाचा मात्र चांगलाच बोजा पडला. आपण लोकशाहीसाठी इतका तरी त्याग करायला हवाच ना ? तुम्हाला काय वाटते ?
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मतदान हे प्रथम कर्तव्य! ते पार पाडल्याबद्दल तुमचे संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन! निवडणूक आयोगाने करून दिलेल्या सोयी-सुविधा पाहून आनंद झाला. त्यांचेही अभिनंदन! 🙏💐
खूपच छान👍⚘️
राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.अभिनंदन.