Wednesday, March 12, 2025
Homeलेखमाझी जडणघडण : ३८

माझी जडणघडण : ३८

जात”

आयुष्याच्या प्रवासामध्ये घडणाऱ्या धक्कादायक घटनांचा परिणाम हा कायमस्वरूपी असतो का ? हा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला मिळणारं उत्तर हे अस्पष्ट असतं. त्याचं कारण असं की आठवणी जरी मागे उरलेल्या असल्या तरी काळानुसार त्या घटनेच्या वेळचा तीव्रपणा, कडवटपणा, त्यावेळी प्रत्यक्षपणे उसळलेली बंडखोरी अथवा वादळ शमलेलं असतं. सरकणाऱ्या काळाबरोबर खूप काही बदललेलंही असतं आणि या जाणिवेपर्यंत आपण पोहोचतो की आता मागचं कशाला उगाळायचं ? जे झालं ते झालं किंवा झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा एकदा नव्याने धागे विणणे जर आनंदाचे असेल तर ते का स्वीकारू नये ?

काही दिवसापूर्वीच माझी एक बालमैत्रीण मला एका समारंभात भेटली. बोलता बोलता ती म्हणाली, ”त्या दोघींना बघितलेस का ? कशा एकमेकींना प्रेमाने मिठी मारत आहेत ! एकेकाळी तलवारी घेऊन भांडत होत्या. माणसं कसं काय विसरू शकतात गं भूतकाळातले खोलवर झालेले घाव ?”

तिच्या त्या प्रश्नाने माझ्या अंतर्मनातले संपूर्ण बुजलेले व्यथित खड्डे पुन्हा एकदा ठिसूळ झाल्यासारखे भासले.

१७/१८ वर्षांचीच असेन मी तेव्हा. दोन वर्षांपूर्वीच ताईचे तिने स्वतः पसंत केलेल्या मुलाशी थाटामाटात लग्न झाले होते. मुल्हेरकरांचा अरुण हा आम्हाला केवळ बालपणापासून परिचितच नव्हता तर अतिशय आवडता आणि लाडका होता तो आम्हा सर्वांचा आणि अरुणचे काका- काकी म्हणजे बाबा- वहिनी मुल्हेरकर आमचे धोबी गल्लीतले गाढ आमने सामनेवाले. आमचे त्यांचे संबंध प्रेमाचे, घरोब्याचे आणि त्यांच्या घरी नेहमी येणारा त्यांचा गोरागोमटा, उंच, तरतरीत, मिस्कील, हसरा, तरुण पुतण्या अरुणच्या प्रेमात आमची ही सुंदर हुशार, अत्यंत उत्साही, बडबडी ताई हरवली तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीच नव्हते ! खरं म्हणजे दोघेही एकमेकांना वैवाहिक फूटपट्टी लावली असता अत्यंत अनुरूप होते. बाबा आणि वहिनी खुशच होते पण अरुणच्या परिवारात म्हणजे त्याचे आई-वडील (भाऊबहिणीं विषयी मला नक्की माहीत नाही पण आई-वडिलांच्या मतांना पाठिंबा देणारे ते असावेत.) त्यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता आणि त्याला कारण होते.. आमची जात.

मुल्हेरकर म्हणजे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी, उच्च जातीतले. ब्राह्मण जातीनंतरची दुसरी समाजमान्य उच्च जात म्हणजे सीकेपी असावी आणि आम्ही शिंपी. जरी धागे जोडणारे, फाटकं शिवणारे, विरलेलं काही लक्षात येऊ नये म्हणून सफाईदारपणे रफू करणारे वा ठिगळं लावणारे असलो तरी शिंपी म्हणजे खालच्या जातीचे. जात म्हणजे जातच असते मग तुमच्या घरातले अत्यंत उच्च पातळीवरचे संस्कार, बुद्धीवैभव, संस्कृती, जीवनपद्धती, आचार विचार यांना या पातळीवर महत्व नसते त्यामुळे हा धक्का जरा मोठाच होता आम्हा सर्वांसाठी. त्यातून पप्पांनी आमच्यावर एक मौलिक संस्कार आमच्या कोवळ्या मनावर केला होता, तो म्हणजे “जाती या मानवनिर्मित आहेत. मनुष्य कोणत्या जातीत जन्माला यावा हे केवळ ईश्वराधीन असते त्यामुळे जन्माला येणार्‍याची खरी जात एकच. “माणूस” आणि जगताना तो माणूस म्हणून कसा जगतो हेच फक्त महत्त्वाचं.” अशा पार्श्वभूमीवर ताई आणि अरुणचं लग्न या जातीभेदात अडकावं ही आमच्यासाठी फार व्यथित करणारी घटना होती पण “मिया बिबी राजी तो क्या करेगा काजी ?” कदाचित अरुण म्हणालाही असेल ताईला, ”आपण पळून जाऊन लग्न करूया” आणि ताईने त्याला ठामपणे सांगितले असेल, ”असा पळपुटेपणा मी करणार नाही कारण मी ज. ना. ढगे यांची मुलगी आहे.”

अखेर प्रीतीचा विजय झाला. अरुणने घरातल्या लोकांची समजूत कशी काढली याबाबतीत अज्ञान असले तरी परिणामी अरुणा-अरुण चे लग्न थाटामाटात संपन्न झाले. त्या रोषणाईत त्या झगमगाटात जातीची धुसफूस, निराशा, भिन्न रितीभातीचे पलिते काहीसे लोपल्यासारखे भासले, वाटले. आम्ही सारेच लग्न किती छान झाले, सगळे मतभेद विरले, आता सारे छान होईल या नशेतच होतो
पण नाही हो !
विवाहानंतरच्या काळातही त्याची झळ जाणवतच राहिली. ती आग अजिबात विझलेली नव्हती. आपली लाडकी बाबी संसारात मानसिक कलेश सोसत आहे या जाणिवेने पप्पा फार व्यथित असायचे. वास्तविक भाईसाहेब मुल्हेरकर (अरुणचे वडील) जे रेल्वेत अधिकारी पदावर होते त्यांच्याविषयी पप्पांना आदर होता पण क्षुल्लक विचारांच्या किड्यांनी ते पोखरले जावेत याचा खेद होता. त्यात आणखी एक विषय पपांना सतावणारा होता आणि तो म्हणजे “बुवाबाजी”. प्रचंड विरोध होता पप्पांचा या वृत्तीवर आणि धोबी गल्लीच्या कोपऱ्यावर राहणाऱ्या एका बाईकडे बसणार्‍या, लोकांना भंपक ईश्वरी कल्पनात अडकवून त्याच्या नादी लावणाऱ्या “पट्टेकर” नावाच्या, स्वतःला महाराज समजणाऱ्या या बुवाच्या नादी हे सारं कुटुंब लागलेलं पाहून ते संताप करायचे. त्यातून ताई आणि अरुणही केवळ घरातले सूर बिघडू नयेत म्हणूनही असेल कदाचित पट्टेकरांकडे अधून मधून जात हे जेव्हा पप्पांना कळले तेव्हा आमच्यासाठीचा हा महामेरू पायथ्यापासून हादरला आणि माझ्यात उपजतच असलेली बंडखोरीही तेव्हाच उसळली.

या सगळ्या निराशाजनक, संतापजनक दुःख देणाऱ्या पार्श्वभूमीवरही काही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले हे विशेष. आमच्या घरात कित्येक वर्षांनी तुषारच्या जन्माच्या निमित्ताने “पुत्ररत्न” प्राप्त झाले आणि त्याचा आनंद काय वर्णावा ? ताई -अरुणला पहिला पुत्र झाल्याचा आनंद समस्त धोबी गल्लीने अनुभवला. जणू काही, “राम जन्मला गं सखी राम जन्मला गं !” हाच जल्लोष होता. बाबा वहिनींना तर खूपच आनंद झाला. काय असेल ते असो, जातीभेदाच्या या युद्धात ते मात्र सदैव तटस्थ होते. त्यांचा आमचा घरोबा, प्रेम, स्नेह कधीही ढळला नाही. त्यांनी लहानपणापासून त्यांच्या प्रेमळ सान्निध्यात वाढलेल्या ताईचा सून म्हणूनही नेहमी सन्मान राखला. तिच्यातल्या गुणांचं कौतुक केलं.

आमच्या घरात तुषारचे बारसे आनंदाने साजरे झाले. अरुणचा समस्त परिवार बारशाला आला होता. त्यांनी व्यवस्थित बाळंतविडा, तुषारसाठी सुवर्ण चांदीची बालभूषणेही आणली पण इतक्या आनंदी समारंभात त्यांनी आमच्या घरी पाण्याचा थेंबही मुखी घेतला नाही. आईने मेहनतीने बनवलेल्या खाद्यपदार्थांना हातही लावला नाही. कुणाशी संवाद केला नाही. lअतिथी देवो भव। या तत्त्वानुसार आई, जीजी, पप्पा यांनी कुठलीही अपमानास्पद वागणूक अथवा तसेच शब्दही मुखातून प्रयासाने येऊ दिले नाहीत, मात्र आमच्या याही आनंदावर पार विरजण पडलं होतं.

पाळण्यात बाळ तुषार रडत होता. त्याला मी अलगद उचललं. त्याचे पापे घेतले. त्या मऊ, नरम बालस्पर्शाने माझ्या हृदयातली खदखद, माझ्यासाठी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या तीन व्यक्तींचा झालेला हा अपमान, मनोभंग आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष शांत झाला होता का ? पण मनात आले या कडवट, प्रखर आणि माणसामाणसात अंतरे निर्माण करणारे हे जातीयवादाचे बाळकडू या बाळाच्या मुखी न जावो !

पुढे अनेक क्लेशकारक घटना घडणार होत्या. एका सामाजिक अंधत्वाच्या भयाण सावलीत आमचं पुरोगामी विचारांचं कुटुंब ठेचकाळत होतं हे वास्तव होतं. त्याबद्दल मी पुढच्या भागात लिहीन. या वैयक्तिक कौटुंबिक बाबीं आपल्यापुढे व्यक्त करण्याची माझी एकच भूमिका आहे की माणसाच्या मनातले हलके विचार किंवा श्रेष्ठत्वाच्या दांभिक भावना जगातल्या प्रेमभावनेचा अथवा कोणत्याही सुंदर आत्मतत्त्वाचा किती हिणकस पद्धतीने कडेलोट करतात याविषयी भाष्य करणे. हे असं कुणाच्याही बाबतीत कधीही होऊ नये. कुठलाही इतिहास उगाळून मला आजचा सुंदर वर्तमान मुळीच बिघडवायचा नाही पण घडणाऱ्या घटनेचे त्या त्या वेळी जे पडसाद उमटतात त्याचा व्यक्तीच्या जडणघडणीवर नक्कीच परिणाम झालेला असतो..
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित