“होळी स्पेशल, भांगेची रंगत”!
होळीच्या दिवशी भांग किंवा थंडाई न पिणे हे विशेष करून उत्तर भारतात अशक्य आहे. त्याचाच एक रंगीबेरंगी किस्सा आज सांगतो.
एकदा दिल्लीतील दादासाहेब मावळणकर ऑडिटोरियम मी आत जायला लागलो. द्वारपालाने, तिकीट आहे का ? असे विचारून अडवले. ‘अरे मी मराठी बोलतो हेच आज माझं आज तिकीट आहे. सोड मला आत’, असं टेचात म्हणून मी आत गेलो.
ऑडिटोरियम गच्च भरलेले होते. तरीसुद्धा जणू काही माझ्यासाठी एक खुर्ची मोकळी होती, ती होती अगदी शेवटच्याच रांगेत कारण मी जरा उशीरा पोचलो होतो. स्टेजवर कोण असेल ? खुद्द पु. ल. देशपांडे आणि सुनीता देशपांडे. कार्यक्रम होता काव्यगायनाचा, तोही ‘बाकीबाव’ उर्फ बा. भ. बोरकर यांच्या कवितांचे काव्यवाचन खुद्द सुनीताबाई आणि पु ल देशपांडे करणार होते. अशा कार्यक्रमाला होळीच्या दिवशी न पोहचणे म्हणजे महान मूर्खपणा होता.
हा कार्यक्रम सुरू होऊन अर्धा तास झाला असावा. बोरकरांच्या कवितेतील बारकावे पु लं सांगत होते. लोकही आनंदाने टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. एकदम माझ्या तोंडून चढ्या आवाजात फारच छान, ओहो हो, मजा आया, असे प्रशंसोद्गार, दाद देणे तिथे जमलेल्या प्रेक्षकांना थोडेसे अचंब्याचे वाटले असावे. पुलंना सुद्धा माझ्यासारख्या अगदी शेवटच्या रांगेतील रसिकाने मोठ्या आवाजात दिलेली ती दाद सुरुवातीला आवडली असावी परंतु नंतर थोडासा चेहरा रागीट करून माझ्या अगांतूक मोठ्या आवाजातील कौतुकांना आता थांबावे असा हात केला !
कार्यक्रम संपल्यानंतर मी भांगेच्या तंद्रीत घरी परतलो. प्रत्येकाने भांग प्यायलाच पाहिजे असा आग्रह धरल्याने घरचेही आम्हाला प्यायची म्हणून मागे लागले. तो होता जनकपुरी मधील होळीचा दिवस. एका कोपऱ्यात भांगेच्या वाटणाला थंडाई मध्ये वाटून, घाटून वर जलेबी आणि रबडी हे पूरक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे माझी तंद्री फारच जोरात लागली होती. अंगावर रंग उडलेला, ओले कपडे रंगलेले यामधून मी घरी परतलो तेव्हा जणू काही मी हवेतच तरंगत होतो. सर्वात्मक सर्वेश्वरा नाट्य गीतातील अन्वय, अर्थ, एकनाथांची पंचरंगी गवळण, लयकारी, मुरक्या आज फारच रंगत आणत आहेत असे वाटत होते. नंतर नवे कपडे घालून त्यातच मी पु ल देशपांडे यांच्या कार्यक्रमाला जायचे ठरवले असल्यामुळे सायंकाळी गाडी काढून निघालो.
तो दिवसच मोठा आनंददायी होता. घरच्यांना सुद्धा मोठा आनंद झाला. ते म्हणाले, ‘काय ते तुमचं भांगेचे घाटण आम्हाला जरा द्या ना’. आणि तसे ठरले. आसपासचे साने कुटुंबीय, परांजपे कुटुंबीय आणि आम्ही ओक भांगेची तयारी करून एका रविवारी आमच्या घरी जमलो. त्या रविवारी सायंकाळी नंतर जंगली सिनेमा दूरदर्शनवर दाखवला होता. सान्यांची दोन मुले, माझी दोन मुले ही समवयस्क असल्यामुळे ती खेळण्यात दंग होती. तोपर्यंत आम्ही तयार केलेले वाटण ग्लासामध्ये घालून आम्हाला देण्यात आले. एक ग्लास झाला तेव्हा आता तुम्ही घ्या असं म्हणून चर्चा झाली. तेवढ्यात मुलांनी आम्हाला पण पाहिजे म्हणून हट्ट धरला आणि थोडं थोडं त्यांनाही पाजले गेले. पुन्हा एकदा ग्लास भरले गेले. आमच्या नंतर लेडीजनी ग्लासातून जरासे तिखट चवीचे दूध प्यायला पहिलीच वेळ आहे असे बोलत पुन्हा एक एक ग्लास तोंडाला लावला. मध्येच परांजपे कुटुंबीय आले. त्यांनीही फार नको, नंतर मग त्रास होतो वगैरे म्हणत एकच ग्लास दोघात घेतला. मग आमच्या गप्पा रंगल्या.
त्यावेळेला अनुप जलोटाची गझल आणि भजनांची कॅसेट खूपच लोकप्रिय होती. गेला असेल काही वेळ आणि मग आम्हाला आमचे विमान वर चाललेले आहे असे वाटायला लागले. तोपर्यंत लेडीज आतल्या बेडरूममध्ये पडल्या पडल्या तिथूनच हाका मारायला लागल्या, ‘अहो इकडे या, आम्ही आता वर चाललोय, आम्हाला लवकर पकडा! नाहीतर आम्ही आणखीन वर जाऊ ! ‘असं ? मजा आहे तुमची’ ! बोलणं ऐकत आम्ही त्यांची चेष्टा करत होतो आणि ते करत असताना, आम्ही पण मजेत आहोत काही काळजी करू नका, तुम्ही वर गेला तरी आम्ही तुम्हाला परत आणू बर का खाली ! असं म्हणून आम्ही एकमेकांची चेष्टा करत होतो. तिकडे आमची मुले अशी काही हुडदंग करायला लागली विचारू नका! आमच्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर गच्चीत जाऊन लपालपी वगैरे करत सारखी खाली आणि वर करत होती! तेही आपापल्यात आज मस्त मजा येते आहे असे म्हणत होते ! भांगेची तलफ चांगलीच रंगलेली होती.
माझ्या घरात हे सगळे सुरू असल्यामुळे मी थोडासा सिरीयसली विचार करत होतो. ह्या धुंदीमुळे समजा उद्या मला पहाटे उठून ऑफिसला जाता आले नाही तर काय करावे ? कारण आम्हा सगळ्यांचीच परिस्थिती एकदम आनंदी आणि उल्हासित होती. परांजपे लवकरच निघून गेले आणि सान्यांचे कुटुंबीय आणि आमचे कुटुंबीय एकत्र होतो. हळूहळू एक एक जण आपापल्या जागी पेंगायला लागला. मला असे करून चालणार नव्हते. माझ्यावर यजमान म्हणून जबाबदारी होती.
त्या काळात माझ्या घरासमोर एक विंग कमांडर बाबू राहत होते. त्यांच्या कानावर भांग प्यायल्याने आमची सिचुएशन टाईट आहे, आमच्याकडे आमच्या घराकडे जरा लक्ष द्या, वेळ पडली तर डॉक्टर बोलवायला सोयीचे व्हावे म्हणून सांगायला मी त्यांच्या घराची बेल दाबली. दार उघडायला वेळ लागला. मग बाबू बाहेर आले. ‘हाय… शशी कम… काय काम काढले ? म्हणून स्वागत केले गेले. मी आमच्या घरात घडत असलेल्या घटनांची कल्पना दिली. ‘डोन्ट वरी मी आहे, काही काळजी करू नकोस’! असा भक्कम भरोसा त्यांनी दिला गेला.
मी म्हटलं. ‘थँक्यू सर, लक्ष असू द्या’ आणि मी तिथून परत माझ्या घरी आलो. आणि एकदम माझ्या लक्षात आले की मी जाताना स्लीपर घालून गेलो होतो, त्या स्लीपर त्यांच्या घरातच राहिल्या आहेत म्हणून त्या स्लीपर आणण्याकरता म्हणून मी बाबूंच्या दारात पुन्हा गेलो, पुन्हा बेल वाजवली, बाबूंनी दरवाजा उघडला, त्यांना मागे सारून स्लीपर शोधत पायात घातली. तेंव्हा माझी नजर गेली तो एक जण सोफ्यामागून लपत बाहेर येताना दिसला! ‘हे कोण’ ? मी हातवारे करून विचारले, बाबू थोडासा ओशाळून म्हणाला, ‘ते आमचे घर मालक आहेत’ आम्ही बसलो होतो जरा होळीची मजा घेत’.
असं ? चकीत होत म्हणालो आणि परतलो. आता मी माझ्या घराचा दरवाजा जेव्हा बंद करायला लागलो तेव्हा मागे वळून पाहिलं तर बाबू माझ्यामागे दारात ! मला कळेना हे काय चाललंय ?
‘मी जरा रेकी करायला आलोय. काय सिच्युएशन आहे ते पाहायला!’ ते म्हणाले. आणि गेले !
सांगायची मजा अशी की त्यानंतर बाकी सगळे ठीक झाले. परंतु भांग हा प्रकार काय असतो ? ती कशी चढते ? सुरुवातीला मजा म्हणून वाटणारी मनस्थिती नंतर बऱ्याचदा थोडीशी गंभीर आणि त्रासाची वाटू लागते असा हा भांगेचा किस्सा! आता यानंतर पुन्हा कधी कधी घ्यायची नाही असं म्हणून घरच्यांनी ठरवले. मलाही त्यानंतर कधीच प्राशन केल्याचा अनुभव घ्यावासा वाटला नाही.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
…